रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (१७ एप्रिल) जिल्हा नियोजन समिती सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात २५ विभागांशी संबंधित १२३ अर्ज आले होते. त्यांपैकी ९० टक्के अर्ज जागेवरच निकाली निघाले. ‘काही अधिकारी वगळता बहुतांश अधिकारी सक्षमपणाने काम करत आहेत. जनतेच्या कामापेक्षा कोणतंही काम मोठं असू नये, या दृष्टीने अधिकाऱ्यांनी शिस्तबद्ध कामकाज करावं,’ अशी सूचना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी केली. आता दर महिन्याला जनता दरबार होणार असून, आज जे प्रश्न प्रलंबित राहिले असतील, ते पुढच्या जनता दरबारापर्यंत निकाली निघाले पाहिजेत, असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं.
या जनता दरबारावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. रस्ता डांबरीकरणापासून प्रधानमंत्री आवास योजना, जमिनीचे प्रश्न, बीएसएनएल टॉवर, वीज, नळपाणी, शाळा, नुकसानभरपाई असे अनेक प्रश्न घेऊन नागरिक या वेळी आले होते. बहुतांश प्रश्नांचा जागेवरच निकाल लागल्याने समाधानाची भावना व्यक्त झाली.
Follow Kokan Media on Social Media




