रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था, हिरवळ प्रतिष्ठान आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) रत्नागिरीत शाश्वत पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा शाश्वत पाणी परिषदेत पाणी चळवळ राबवणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना जलसेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती आयोजक राजू भाटलेकर यांनी दिली. गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पाणी परिषद आयोजित केली आहे. यासाठी जिल्ह्यातून जलप्रेमी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य, कुवारबाव येथील अनसूया महिला स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष सौ. नीलम पालव, जलवर्धिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उल्हास परांजपे, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे, दिगंत स्वराज फाउंडेशनचे संचालक राहुल तिवरेकर, झेप फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम ढेकणे, देवरूख येथील चैत्राली धस, गुहागरचे आशुतोष जोशी, दापोलीचे डॉ. प्रशांत परांजपे, चिपळूणचे शाहनवाज शहा, मजगाव येथील फैय्याज मुकादम, डोंबिवली येथील उमेश मुंडले, हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर, नगरपालिकेचे पाणी सभापती निमेश नायर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
परिषदेमध्ये दिवसभर विविध व्याख्याने, कृती आराखड्याचे नियोजन, पाणी वाचवण्यासाठीचे प्रयत्न अनुभवकथन असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये डॉ. प्रशांत परांजपे, डॉ. चंद्रशेखर निमकर, राहुल तिवरेकर, उमेश मुंडले मार्गदर्शन करणार आहेत. नंदू तांबे, शाहनवाज शहा, रोहन इंगवले, नीलम पालव, सतीश कदम मार्गदर्शन करणार आहेत.
पाणी परिषदेला पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार, सर्व आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाटबंधारे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हवामान बदलामुळे उद्भवणारे अल् निनो जलसंकट आणि भविष्यात जाणवणारी पाणीटंचाई यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी ही शाश्वत पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे. जलप्रेमी व जलदूत, जलसेवकांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित केल्याचे भाटलेकर म्हणाले.
सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीवर पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना आखणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणे, तलाव आणि विहिरींमधील पाणीपातळीत होणारी घट लक्षात घेऊन पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी, रुग्णालये व सार्वजनिक संस्था, पशुधन, घरगुती वापर, शेती आणि उद्योग या क्रमाने पाणीवाटप निश्चित केले पाहिजे. याकरिता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, ग्रामसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि जलप्रेमींनी या परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन राजू भाटलेकर यांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media

