मतदान म्हणजे तुमचा आवाज; लोकशाहीत सजगपणे सहभागी व्हा : यूथ आयकॉन कमलेश सोनावणे यांचं तरुणांना आवाहन

रत्नागिरी : ‘मतदान हे केवळ औपचारिकता किंवा बटण दाबण्यापुरतं मर्यादित नसून, देशाची धोरणं ठरवणाऱ्या प्रक्रियेत आपला आवाज पोहोचवण्याचं माध्यम आहे. युवकांनी आपले विचार निर्भयपणे मांडावेत, समाजमाध्यमांवरच्या भ्रामक माहितीची पडताळणी करावी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सजगपणे पुढाकार घ्यावा,’ असं आवाहन यूथ आयकॉन कमलेश सोनावणे यांनी केलं. केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘मेरा युवा भारत’तर्फे रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातल्या निवे बुद्रुक येथील माध्यमिक आश्रमशाळा आणि कला-विज्ञान महाविद्यालयात विकसित भारत युवा संवाद कार्यक्रम आज (२८ ऑक्टोबर) दुपारनंतर आयोजित करण्यात आला होता. ‘नो युवर व्होट’ अर्थात ‘तुमच्या मताविषयी जाणून घ्या’ ही या कार्यक्रमाची संकल्पना होती. राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेत युवा शक्तीला केंद्रस्थानी आणून सशक्त आणि समृद्ध भारताची पायाभरणी करण्याच्या उद्देशाने झालेल्या या कार्यक्रमात सोनावणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचं उद्घाटन रोपट्याला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन करण्यात आलं. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

मतदान आणि सध्याची एसआयआर प्रक्रिया यांविषयी सोनावणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं आणि विचारपूर्वक मतदान करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. मतदारयाद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर का महत्त्वाचं आहे हे सांगतानाच, ही दर ठरावीक वर्षांनी कायद्यानुसारच केली जाणारी प्रक्रिया असल्याचंही त्यांनी सांगितलं. या वेळी आश्रमशाळेचे संस्थापक चंद्रकांत यादव, कार्यवाह वैभव यादव, मुख्याध्यापक विजय पाटील, चिपळूणच्या स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्थेच्या संचालिका स्वरा सावंत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील यांनी प्रास्ताविकात ‘माय भारत’ अर्थात ‘मेरा युवा भारत’ या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. युवकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा परिचय करून देऊन त्यांनी या उपक्रमाच्या पोर्टलच्या माध्यमातून तरुणांना त्यात सक्रियपणे सहभागी होण्याचं आवाहन केलं. भारताला २०४७पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या उद्दिष्टाने २६ ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभरातली ५००हून अधिक विद्यापीठं, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ‘विकसित भारत युवा संवाद’ मोहीम राबवण्यात येत आहे. या देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला.

सोनावणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचे दाखले देऊन आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकीचं महत्त्व स्पष्ट केलं. इतिहास केवळ वाचण्यासाठी नसून, त्यातले आदर्श गुण आचरणात आणण्यासाठी आहे. उत्तर चुकण्याची भीती न बाळगता विद्यार्थ्यांनी व्यक्त होण्याचा प्रयत्न करावा, असं त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्येही शहरांमधल्या विद्यार्थ्यांइतकीच क्षमता असून, ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश मिळवता येतं, असं सोनावणे यांनी सांगितलं.

‘व्यापक समाजहिताच्या न्याय्य मागण्यांसाठी राज्यघटनेने प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा आणि उपोषण-आंदोलनाचा हक्क दिला आहे; मात्र परकीय शक्ती किंवा समाजकंटकांच्या प्रभावाखाली येऊन देशहिताला बाधा आणणारा हिंसक दबाव किंवा झुंडशाही लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही संदेशामागचा उद्देश समजून न घेता किंवा दबावाला बळी पडून भूमिका स्वीकारू नये,’ असं आवाहन त्यांनी केलं.

‘समाजमाध्यमांवर एखादी माहिती वारंवार दिसते म्हणून ती खरी ठरत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने तयार केलेली छायाचित्रं आणि व्हिडिओ दिशाभूल करू शकतात. त्यामुळे माहितीचा मूळ स्रोत तपासून पीआयबीसारखी संबंधित अधिकृत संकेतस्थळं आणि विश्वासार्ह वृत्तमाध्यमांतून खातरजमा करावी. युवकांनी स्वतःबरोबरच कुटुंबीयांमध्येही डिजिटल सजगता निर्माण करावी,’ असा संदेश सोनावणे यांनी दिला.

कार्यक्रमात तरुणांना लोकशाहीतला सहभाग, नागरी हक्क, सामाजिक जबाबदाऱ्या आणि देशाच्या विकासातील योगदान यांविषयी प्रश्न विचारण्याची आणि विचार मांडण्याचीही संधी मिळाली. उपस्थितांनी लोकशाहीची प्रतिज्ञा घेऊन राज्यघटनेतल्या लोकशाही मूल्यांप्रति आणि जबाबदार नागरिकत्वाप्रति कटिबद्धता व्यक्त केली. स्वतंत्रपणे विचार करून विकसित भारताच्या उभारणीत योगदान देण्याचा सामूहिक संकल्पही करण्यात आला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply