सुमारे तीस वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेशी आंब्याची लागवड निगडित केल्यानंतर आंब्याचे उत्पादन भरभराटीला आले; पण त्यानंतरच्या सुमारे पंधरा वर्षांमध्ये आंब्याच्या उत्पादनाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एकेकाळचा आंब्याच्या लागवडीचा बहर काहीसा ओहोटीला लागला आहे. दीड-दोन महिन्यांच्या आंब्याच्या हंगामात मिळणाऱ्या पिकावर वर्षभर प्रक्रिया होऊ शकेल, अशी कोणतीही योजना नाही. अशा अनेक प्रश्नांवर बारकाईने विचार केला गेला नाही तर आंब्यासाठी मिळालेले सुवर्णपदक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील काचपेटीत ठेवण्याएवढेच महत्त्वाचे राहील. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा फारसा उपयोग होणार नाही.