Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म हा विचार रुजवायला हवा : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

Advertisements

नवी मुंबई : मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म हा विचार रुजवायला हवा. महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याने हा त्या कार्याचा गौरव आहे, असे उद्गार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांनी काढले.

राज्य शासनाच्या वतीने डॉ. धर्माधिकारी यांना गेल्या वर्षीचाच महाराष्ट्र भूषण सन्मान केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. धर्माधिकारी बोलत होते. पुरस्काराचे श्रेय सर्व श्री सदस्यांना जाते. खेडेगावातील लोकांना, त्यांच्या रीतिरिवाजांना चांगले, उत्तम वळण लागायला हवे, यासाठी कामाची सुरुवात केली. प्रसिद्धीपासून लांब राहत कार्य सुरू आहे. मानवता धर्म हा सर्वांत श्रेष्ठ आहे, या विचारांची रुजवात अंतकरणात व्हायला हवी. शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरू ठेवणार आहे. सचिनदादा हे कार्य पुढे चालविणार आहेत. कार्य श्रेष्ठ आहे. माणूस नसला तरी ते सुरूच राहणार आहे. हा पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याचा सन्मान आहे. त्यामुळे हा पुरस्कार सर्वांना समर्पित करत असल्याचे श्री. धर्माधिकारी म्हणाले.

देशाचे, आईवडिलांचे, समाजाचे ऋण फेडण्यासाठी काय सेवा केली, हे प्रत्येकाने ठरविली पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष काम केले पाहिजे. देशसेवेबरोबर समाजसेवा करण्याचे काम मंत्री करीत आहेत. समाजसेवा ही सर्वांत श्रेष्ठ आहे. त्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान उभे केले. त्यासाठी प्रत्येकाने किमान पाच पाच झाडे लावायला हवीत. प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपणाचे काम सुरू आहे. देशातील प्रत्येक मानवाचे आरोग्य सुदृढ असावे आणि प्रत्येकाने आनंदी आयुष्य जगावे, यासाठी आरोग्य शिबिर घेत आहोत. रक्तदान व थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तपुरवठा ही पण एक समाजसेवा आहे. आजपासून प्रत्येकाने ही सेवा सुरू करावी. राज्य शासनाचे जलसंधारणाचे मोठे काम सुरू आहे. त्याद्वारे पाणी जिरविण्याच्या कामातही योगदान करावे, असेही त्यांनी सांगितले.

समाजसेवेबरोबरच अंतःकरणाची स्वच्छता महत्त्वाची असून यासाठी प्रत्येकाने मन स्वच्छ करायला हवे. तसेच मनाला स्थिरता प्राप्त करण्यासाठी अंतःकरणातील अस्वच्छता बाहेर काढणे आवश्यक आहे. प्रत्येक माणसाने अंतरात्म्याला स्मरून काम केले, तरच उत्तम सामर्थ्य प्राप्त होईल. समाजसेवेचे हे काम अखंड सुरूच राहणार आहे. यासाठी प्रत्येकाने सत्कीर्ती वाढवावी, अपकीर्ती थांबवावी, असा उपदेशही श्री. धर्माधिकारी यांनी यावेळी दिला.

पुरस्कार प्रदान केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे. कोणत्याही प्रसिद्धीची आस न ठेवता समाजसेवा करणारा हा एवढा मोठा जनसमुदाय मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत आहे. या प्रकारचा मान, सन्मान, भक्तिभाव केवळ त्याग, समर्पण आणि सेवेद्वारेच मिळत असतो. आप्पासाहेबांविषयी आपले प्रेम, विश्वास, सन्मान हा त्यांच्या संस्काराचा, कर्तृत्वाचा, नानासाहेबांच्या शिकवणीचा सन्मान आहे. एकाच परिवारात अनेक वीर जन्मलेले मी पाहिले आहेत. मात्र तीन तीन पिढ्यांपर्यंत समाजसेवेचे संस्कार असलेले मी आयुष्यात प्रथमच पाहत आहे.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देऊन त्यांच्यासारखे लाखो लोकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याबद्दल त्यांचे व राज्य शासनाचे मी अभिनंदन करतो, असेही श्री. शहा यांनी यावेळी सांगितले.

महान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीने देशाला तीन मार्ग दाखविले. राष्ट्रासाठी जीवन अर्पण करण्याचा वीरतेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केला. स्वातंत्र्यवीर सावरकर, चाफेकर बंधू, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, सन्मानासाठी आपले जीवन अर्पिले. संतपरंपरेचा आध्यात्मिक मार्ग हा दुसरा मार्ग या भूमीने दिला आहे. समर्थ रामदास, संत तुकाराम महाराजांपासून नामदेवांपर्यंत या सर्वांनी महाराष्ट्रातील भक्तीच्या, अध्यात्माच्या मार्गाने देशाचे नेतृत्व करण्याचे काम केले आहे. सामाजिक चेतनेचा तिसरा मार्गही येथूनच सुरू झाला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक सामाजिक चेतनेच्या जनकांची महाराष्ट्र ही भूमी आहे. ही सामाजिक चेतना जागृत करण्याचे आणि ती पुढे नेण्याचे काम आज नानासाहेब, आप्पासाहेबांनी सुरू ठेवले आहे. समाजासाठी, दुसऱ्यांसाठी जगण्याची शिकवण देण्याचे काम या भूमीने केले आहे. कर्तृत्वाने दिलेली शिकवण चिरंजीव राहते. समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, अन्य बांधवांसाठी काम करण्याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले असल्याचेही श्री. शहा यांनी यावेळी सांगितले.

धर्माधिकारी कुटुंबीयांनी आपल्या कर्तृत्वाने समाजामध्ये सुधारणा केली. मुलांसाठी शिक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता, रक्तदान, जलसिंचन, विहिरींची सफाई, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्त समाज अशा विविध क्षेत्रात आप्पासाहेबांनी मोलाचे कार्य केले आहे.

हा तर महाराष्ट्राचा गौरव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केल्यामुळे महाराष्ट्राचा गौरव झाला आहे. धर्माधिकारी कुटुंबीय राज्यात गेल्या अनेक पिढ्यांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करत असून ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. उद्ध्वस्त कुटुंबांना सावरण्याचे काम नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले असून आता सचिनदादा धर्माधिकारी हा वारसा पुढे नेत आहेत. माणसे घडविण्याचे विद्यापीठ म्हणजे रेवदंडा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. या सोहळ्याला मी एक श्री सदस्य म्हणून उपस्थित असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनसागराला अभिवादन केले.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘पाहिला जनांचा सागर भरली ज्ञानाची घागर’ असा जनांचा महासागर या ठिकाणी लोटलेला आहे. याठिकाणी सकाळपासून भर उन्हामध्ये बसलेला एकही माणूस उठत नाही ही आप्पासाहेबांची ताकद आहे. प्रत्येक श्री सदस्य शिस्तीने काम करत असतो. राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी असते, त्याचे स्वरूप या ठिकाणी आपण पाहतोय. राजकीय शक्तीला आध्यात्मिक अधिष्ठानाची जोड, आशीर्वाद आणि प्रेरणा या ठिकाणी लाभते. त्याचे जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहतो आहोत. ही गर्दी सगळे रेकॉर्ड मोडणारी असून याचे रेकॉर्ड मोडायचा असेल तर ते फक्त आणि फक्त आप्पासाहेबांचे श्री सदस्यच मोडू शकतात.
आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा या समाजाची सेवा करायला मार्गदर्शन केले, दिशा दाखवली आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर आज मुख्यमंत्री नाही तर एक श्री सदस्य म्हणून उभा आहे. त्यामध्ये आप्पासाहेबांचे मोठे योगदान आहे. अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, हुंडा यासारख्या अनिष्ट प्रथा दूर करण्याचे काम नानासाहेबांनी, आप्पासाहेबांनी केले. मोह, माया, मत्सर याच्यापासून आपण दूर कसे जाऊ शकतो, याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली. सरकार म्हणून काम करीत असताना आम्हीदेखील आप्पासाहेबांचे विचार आचरणात आणून सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहोत. ठिपक्याठिपक्यांनी रांगोळी तयार होते, तसा माणसे जोडून माणुसकीचा महासागर आप्पासाहेबांनी निर्माण केला आहे. अरे माणसा माणसा कधी व्हशील माणूस तू.. या बहिणाबाईंना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आप्पासाहेबांच्या माणूस घडविण्याच्या याच कार्यातून मिळते. व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, आरोग्य शिबिर, जलसंधारण, ग्रामस्वच्छता, शिक्षण, मार्गदर्शन अशा सर्व मार्गांनी आप्पासाहेबांनी समाज घडविला आहे. त्यासाठी धर्माधिकारी प्रतिष्ठान हे मला एखाद्या दीपस्तंभासारखे वाटते.

आप्पासाहेबांकडे मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगात सात आश्चर्ये आहेत. मात्र श्री सदस्यांची ही अलोट गर्दी हे जगातील आठवे आश्चर्य आहे. पैशापेक्षाही खरी श्रीमंती काय, हे या श्री परिवाराकडे आणि उपस्थित श्रीसदस्यांकडे बघून समजते. निरूपणाच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा दिली जाते. मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे आहे. विविध सामाजिक कार्यांच्या माध्यमातून धर्माधिकारी कुटुंबीय आणि प्रतिष्ठान करीत असलेले कार्य महान आहे. वृक्षारोपण, स्वच्छता, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, रक्तदान अशा अनेक क्षेत्रात त्यांचे उत्तुंग काम आहे. देश-विदेशातही त्यांचे मोठे सामाजिक कार्य आहे.

आपली भारतीय संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे आप्पासाहेबांच्या माध्यमातून अद्भुतरीत्या जतन आणि संवर्धन होत आहे. आप्पासाहेबांना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे महत्त्व आज निश्चितच वाढले आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मनुगंटीवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, आप्पासाहेबांच्या निरूपणाचा भक्तिसागर पाहण्याचा योग आज आला. आप्पासाहेब धर्माधिकारी नावाचा जगातील सर्वांत मोठा चुंबक आज या व्यासपीठावर आहे. निरूपणाच्या माध्यमातून जसे आप्पास्वारी मन स्वच्छ करतात, तसेच ते परिसरही स्वच्छ ठेवतात. झाडे लावून पर्यावरणसुद्धा वनयुक्त करतात, तेव्हा असे कोटीकोटी पुरस्कार दिले तरी त्यांचा गौरव शब्दांनी होऊ शकणार नाही. हाताला सेवेचे काम देऊन भविष्य घडविणाऱ्या आप्पासाहेबांना सांस्कृतिक कार्य विभागाचा पुरस्कार देताना प्रचंड स्फूर्ती प्राप्त होत आहे.

डॉ. सचिन धर्माधिकारी म्हणाले की, मन, मानव आणि मानवता या विचारातून कार्य सुरू आहे. मनाचे विचार बदलण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून कार्य केले जाते. चांगले संकल्प केले, तर मानव व मानवतेचे विचार येऊ लागतात. सत्याचा संकल्प आला तर मानवतेचे दया, शांती, प्रेम हे विचार येऊ लागतात. हे विचार आले नाहीत, तर समाजात हिंसा होते आणि हे समाजासाठी भयानक आहे. मन, मानव आणि मानवता हे सूत्रच बैठकीत दिले जाते. प्रशासन आणि सदस्यांच्या समन्वयातून एवढा मोठा कार्यक्रम होत आहे.

रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले.

यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे उमेश धर्माधिकारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
कोकण विभागासह राज्यातील विविध भागातून आलेल्या सुमारे २० लाखाहून अधिक श्री सदस्यांच्या साक्षीने डॉ. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पंचवीस लाखांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. धर्माधिकारी यांनी पुरस्काराची पंचवीस लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द केली.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने यावेळी लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या श्री सदस्यांवर यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

भव्यदिव्य कार्यक्रम
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या उत्साहात नवी मुंबईतील खारघर येथील कॉर्पोरेट पार्कच्या मैदानावर हा भव्य समारंभ झाला. समारंभात पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा, वाहनतळ सुविधा, श्री सदस्यांची बसण्याची व्यवस्था आदींचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी शासकीय यंत्रणेसह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी व्यवस्था चोख सांभाळली.

कार्यक्रमासाठी सुमारे साडेतीनशेहून अधिक एकर मैदानात सुमारे २० लाखाहून अधिक नागरिक, श्रीसदस्य उपस्थित होते. त्यांना कार्यक्रम व्यवस्थित दिसावा यासाठी एकूण ५८ भव्यदिव्य एलईडी स्क्रीन उभारण्यात आले होते. त्याचबरोबर प्रत्येक सदस्यापर्यंत कार्यक्रमाचा आवाज पोहोचावा, यासाठी ध्वनिक्षेपण यंत्रणा उभारण्यात आली होती.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे लेखन प्राची गडकरी यांनी केले होते. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यावर आधारित ध्वनिचित्रफित यावेळी दाखविण्यात आली.

कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version