Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

पां. वा. काणेंच्या समग्र अभ्यासाची गरज : भिकुजी इदाते

Advertisements

दापोली : महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या समग्र अभ्यासाची गरज आहे. त्यांच्या स्मारकाकरिता स्थापन झालेल्या समितीमुळे हे काम पुढे जाईल, असा विश्वास पद्मश्री भिकूजी ऊर्फ दादा इदाते यांनी व्यक्त केला.

दापोली येथे स्थापन झालेल्या महामहोपाध्याय भारतरत्न पां. बा. काणे स्मारक समितीचा पहिला वर्धापनदिन ८ मे रोजी जालगाव येथील स्मारकाच्या परिसरात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने जालगाव येथील आम्रपालीच्या आमराईमध्ये विशेष गौरव समारंभही आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. दादा इदाते यांना पद्मश्री किताब मिळाल्याबद्दल त्यांचा तसेच अमृतमहोत्सवानिमित्त हास्यकवी अशोक नायगावकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. जालगावचे नवनिर्वाचित सरपंच अक्षय फाटक, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, देणगीदार श्रीमती जोशी आणि देवर्षि नारद पुरस्कारविजेते पत्रकार प्रमोद कोनकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

हास्यकवी अशोक नायगावकर

श्री. इदाते यांनी आपल्या भाषणात महामहोपाध्याय काणे यांच्या समग्र जीवनचरित्राचा आढावा घेतला. त्यांनी लिहिलेल्या हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र या ग्रंथासाठी त्यांना महामहोपाध्याय ही पदवी मिळाली. अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे फेलो, उपाध्यक्ष, पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशेधन मंदिराच्या नियामक मंडळाचे सदस्या, महाभारत संपादन मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष, दापोली एज्युकेशन सोसायटी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इत्यादी संस्थांचेही ते पदाधिकारी होते. मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू, राज्यसभा खासदार अशी पदेही त्यांनी भूषविली होती. पण त्यांनी सुमारे २०० ग्रंथ लिहिले, असेही श्री. इदाते यांनी सांगितले. कोकणाने आतापर्यंत एकूण सहा भारतरत्ने देशाला दिली असून त्यातील तीन रत्ने एकट्या दापोली तालुक्यातील आहेत, याचा उल्लेख श्री. इदाते यांनी केला.

काणे यांच्या स्मारकासाठी दापोली अर्बन बँकेतर्फे शक्य ती मदत करण्याचे आश्वासन श्री. जालगावकर यांनी दिले. सरपंच म्हणून आवश्यक ते सहकार्य जालगाव ग्रामपंचायतीमार्फत दिले जाईल, अशी ग्वाही सरपंच अक्षय फाटक यांनी दिली. स्मारकाला दिलेल्या देणगीविषयी श्रीमती जोशी यांनी आपली भूमिका मांडली. सोशल मीडियाच्या आजच्या युगात पां. वा. काणे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भारतरत्ने आणि नररत्नांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी योग्य ती प्रसिद्धी देणे ही माझ्यासह पत्रकारांची जबाबदारी असून ती मी स्वीकारतो, असे श्री. कोनकर यांनी सांगितले.

हास्यकवी अशोक नायगावकर यांनी सादर केलेल्या बहारदार कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. (नायगावकर यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

प्रास्ताविकात अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी स्मारक समितीच्या कार्याची तसेच भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. डिजिटल चित्ररथ, जिल्ह्यातील सर्व भारतरत्ने तसेच दहा महनीय व्यक्तींची माहिती देणारा कक्ष, शिष्यवृत्त्या, सभागृह इत्यादींचा समावेश त्यात होता.

समितीचे कार्याध्यक्ष विमलकुमार जैन, उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते, कार्यवाह रमेश जोशी, खजिनदार विनय माळी, सदस्य अॅड. नूतन परांजपे, विनायक बाळ, अमोल गुहागरकर, मनीष आपटे यांच्यासह सर्व पदाधिकारी अन्य मान्यवर समारंभाला उपस्थित होते.

पां. वा. काणे अभिवादन यात्रा

पां. वा. काणे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ८ मे रोजी स्मारक समितीतर्फे जन्मभूमी ते कर्मभूमी अशी अभिवादन यात्रा काढण्यात आली. परशुराम (चिपळूण) येथे काणे यांचा त्यांच्या आजोळी चितळे यांच्या घरी जन्म झाला. श्री क्षेत्र परशुराम मंदिरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या या जन्मघरी अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश काणे, समितीचे उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खेड तालुक्यातील मुरडे हे काणे यांचे मूळ गाव आहे. तेथे त्यांचे प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत झाले, तेथे भेट देण्यात आली. समितीचे कार्याध्यक्ष विमलकुमार जैन, खजिनदार विनय माळी यावेळी उपस्थित होते. मुरडे ग्रामस्थांनी यात्रेचे स्वागत केले.

काणे यांचे पाचवीपासूनचे माध्यमिक शिक्षण दापोलीच्या ए. जी. हायस्कूलमध्ये झाले. काणे यांच्या जन्माच्या वर्षीच १८८० साली स्थापन झालेली ही संस्था ब्रिटिशांकडून दापोली शिक्षण संस्थेकडे हस्तांतरित झाली. त्या कागदपत्रांवर पां. वा. काणे यांच्या सह्या आहेत. त्याच संस्थेत काणे यांनी मुख्य़ाध्यापक म्हणून आणि नंतर संस्थेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीने त्या शाळेत जाऊन मुख्याध्यापक आणि संस्थेच्या संचालकांच्या उपस्थितीत काणे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. दापोली शिक्षण संस्थेचे विश्वस्त समीर गांधी, गव्हर्निंग बॉडीचे प्रमुख डॉक्टर प्रसाद करमरकर, कार्यवाह डॉक्टर विनोद जोशी तसेच शाळेचे मुख्याध्यापक सतीश जोशी आदी मान्यवरांनी अभिवादन यात्रेचे स्वागत केले.

महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समिती प्रथम वर्धापनदिनाची क्षणचित्रे


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version