खेड : मुरडे (ता. खेड) हे महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी त्यांचे नाव खेडमधील चौकाला देण्यात यावे, अशी मागणी महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीने केली आहे.
महामोहपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांचे प्राथमिक शिक्षण मुरडे या गावी झाले. चिपळूण आणि दापोली येथेही त्यांचे वास्तव्य होते. पां. वा. काणे संस्कृत आणि संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते. त्यांच्या कार्याची नव्या पिढीला ओळख व्हावी, या उद्देशाने भारतरत्न पां. वा. काणे तसेच त्यांच्या समवेत दापोलीतील एकूण दहा महान रत्नांचे मानवंदना दालन आणि पुराण वस्तू दालन यांचा समावेश असलेले भारतरत्न पां. वा. काणे यांचे स्मारक जालगाव (ता. दापोली) येथे उभारण्यात आले आहे.
या स्मारक समितीच्या माध्यमातून खेड येथील पाथरजाई मंदिर येथील मुरडे गावाकडे जाणाऱ्या चौकाला महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे चौक असे नाव देण्यात यावे, अशी मागणी कार्याध्यक्ष विमलकुमार जैन, खजिनदार विनय माळी आणि ज्येष्ठ सदस्य राजवाडकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
पां. वा. काणे यांच्या स्मारकाला सर्वांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केले आहे.


