महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या स्मारकाचा दापोलीत शुभारंभ

महामहोपाध्याय भारतरत्न पां.वा.काणे स्मारक इमारतीचे उद्घाटन करताना नीलिमा परांजपे

दापोली: महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या १४२ व्या जयंतीचे औचित्य साधून जालगाव (ता. दापोली) येथे महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीच्या स्मारकाचा काल (दि. ७ मे) प्रारंभ झाला. जालगाव अपना स्वीट्सच्या इमारतीत मुख्य कार्यक्रम झाला.

महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीच्या वतीने जन्मभूमी ते कर्मभूमी अभिवानद संवाद यात्रा काढण्यात आली. काणे यांचे जन्मस्थळ पेढे परशुराम (ता. चिपळूण) येथे आहे. तेथे अभिवादन केल्यानंतर त्यांच्या मूळ गावी मुरडे (ता. खेड) येथील त्यांनी शिक्षण घेतलेल्या प्राथमिक शाळेत अभिवादनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ही अभिवादन संवाद यात्रा दापोली येथे काणे यांच्या कर्मभूमीत पोहोचली. काणे यांचे काही काळ दापोली येथे वास्तव्य होते. तेथेच त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. पां. वा. काणे स्मारक समितीने जालगाव (ता. दापोली) येथे स्मारक उभारायचे नक्की केले आहे. तेथे अपना स्वीट्सच्या इमारतीमध्ये एका विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत स्मारकाचा प्रारंभ झाला.

जिल्हा परिषदेच्या सदस्या चारुता कामतेकर यांच्या हस्ते काणे यांच्या स्मारकाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी दापोलीचे उपसभापती मनोज भांबीड आणि स्मारकासाठी जागा देणाऱ्या श्रीमती नीलिमा परांजपे यांच्या हस्ते फीत कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी काणे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.

पां. वा. काणे यांच्या जन्मघरी माहिती देताना प्रकाश देशपांडे

महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या अतुलनीय कार्याची ओळख सर्वांना व्हावी, या स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी दिली. स्मारकाकरिता प्रशांत परांजपे यांनी त्यांचे वडील स्व. अशोक परांजपे यांच्या स्मरणार्थ मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या परांजपे संग्रहालयाच्या पुराणवस्तू दालनातील सुमारे १५० वस्तूंचा संग्रह, दापोली तालुक्यातील नररत्नांचे कटाउट, दापोली तालुक्यातील साहित्यिकांच्या पुस्तकांचा संग्रह स्मारकासाठी दिला आहे.

स्मारकात पुराण वस्तू दालन, भारतरत्न पां. वा. काणे यांचे संदर्भ ग्रंथ, वाचनालय, जिल्ह्यातील सर्व भारतरत्नांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साहित्यिकांकरिता चिंतन, मनन आणि लेखनाकरिता स्वतंत्र दालन, ३०० व्यक्ती बसतील असे अद्ययावत वातानुकूलित सभागृह, पां. वा. काणे यांच्या जीवनावर एक लघुपटाची निर्मिती, दापोलीतील साहित्य, पर्यावरण आणि पर्यटनच्या गुंफणीतून एक लक्षवेधी लघुपट निर्मिती, संस्कृतमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती आदी अनेक प्रकल्प भविष्यात राबविण्याचा समितीचा मानस असल्याचे श्री. परांजपे यांनी सांगितले.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, माजी उपसरपंच विलास जालगावकर, जालगाव ग्रामपंचायत सदस्य मिलिंद शेठ, अंकिता जंगम, राम मांडवकर यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

कार्याध्यक्ष विमल जैन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते यांनी समारोप करताना पुण्यातील वर्षा जोशी यांनी स्मारकाकरिता एक लाख रुपयांची देणगी दिल्याचे सांगितले. तसेच स्मारकासाठी यथाशक्ती मदतीचे आवाहन केले. सूत्रसंचालन अमोल गुहागरकर यांनी केले.

महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीची कार्यकारिणी

कार्यवाह रमेश जोशी-जालगाव, खजिनदार विनय माळी-खेड, सदस्य विनायक बाळ-मुरूड, विलास राजवाडकर-खेड, बाळकृष्ण ऊर्फ प्रमोद कोनकर-रत्नागिरी, अमोल गुहागरकर-खेड, अॅड. नूतन परांजपे-जालगाव, मनीष आपटे-रत्नागिरी. सल्लागार – एस. जी. काणे (भारतरत्न पां. वा. काणे यांचे नातू, यूएस), डॉ. सागर देशपांडे-पुणे, प्रकाश देशपांडे-चिपळूण.

उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी स्मारकाला वीस पर्यटकांनी भेट दिली.
प्रथमच भेट दिलेल्या पर्यटकांनी दिलेला अभिप्राय


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply