रत्नागिरी : महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचा जगभरात अभ्यासस केला जाणारा धर्मशास्त्राचा इतिहास हा ग्रंथ सर्वसमावेशक आहे, असे मत त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये व्यक्त करण्यात आले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात हा वेबिनार झाला. भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे थोर संस्कृत विद्वान होते. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले संस्कृत विद्वान ठरले. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पेढे परशुराम येथे ७ मे १८८० रोजी झाला. त्यांच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान बाळगत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राला भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र असे नाव देण्यात आले आहे. काणे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत डॉ. पां. वा. काणे यांचे योगदान या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते.
याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. लॉरा येरेकेशिवा (Facalty of history at-Farabi Kazak National University), प्रो. गौतम पटेल (संस्कृत विद्वान, गुजरात) उपस्थित होते. डॉ. कला आचार्य (संस्कृति संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा) मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कालिदास विश्वविद्यालयाचे कुलगुरू ड़ॉ. मधुसूदन पेन्ना यांनी अध्यक्षस्थान भूषविले. रत्नागिरी उपकेंद्र संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत केले.
डॉ. लॉरा येरेकेशिवा यांनी हिंदू धर्म आणि मध्य आशियाई इस्लाममधील तीर्थयात्रांचा संस्कारांपासून ते सामाजिक एकतेपर्यंतचा आढावा घेत काणे यांच्या धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथातील महत्त्वपूर्ण वचनांचा उल्लेख केला. तीर्थक्षेत्रे समाजाला एका सूत्रात जोडून ठेवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतात, असे मत त्यांनी मांडले.
प्रो. गौतम पटेल यांनी डॉ. काणे यांच्या जीवनातील अनेक अपरिचित विषयांचा उलगडा केला. काणे मला कृष्णाप्रमाणेच वाटतात, असे त्यांनी म्हटले. आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण वर्षे धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्यासाठी ज्यांनी खर्च केली, असे हे व्यक्तिमत्त्व येणाऱ्या अनंत पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, असेही ते म्हणाले.
डॉ. कला आचार्य यांनी धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथाची ठळक वैशिष्ट्ये नमूदर करत संस्कृत साहित्यातील अनेक विद्वानांच्या कृतींचा अत्यंत सूक्ष्म दृष्टीने बारकाईने अभ्यास करत काणे यांनी सर्व स्मृती ग्रंथांचे सार धर्मशास्त्राचा इतिहास ग्रंथात एकटवले आणि सर्वसमावेशक दृष्टीने या ग्रंथाची रचना केली, असे त्यांनी सांगितले. काणेंसारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा विचार करत त्यांच्याविषयी बोलण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमंत्रित करून जणू उपकेंद्राने आम्हाला ऋषी ऋणातून मुक्त होण्याची संधी दिली, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात विश्वविद्यालयाचे कुलगुरू मधुसूदन पेन्ना यांनी कार्यकर्तृत्वाने अजरामर झालेल्या विद्वानांच्या कार्याचे त्यांच्या कृतींचे कालौघात विस्मरण होऊ नये, यासाठीच विश्वविद्यालयाच्या उपकेंद्राला भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांचे नाव देण्यात आले आहे, असे सांगितले. या उपकेंद्राद्वारे या दृष्टीने भविष्यात अनेक कार्ये घडून येतील, असे त्यांनी म्हटले. काणे यांच्या धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथाचा केवळ भारतातच नव्हे तर जगभर अभ्यास होतो. याचप्रमाणे काणे यांच्या अन्य भाषांतील साहित्याचे इतर भाषांमध्येही अनुवाद करण्याचे कार्य विश्वविद्यालयाद्वारे केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सूत्रसंचालन आशीष आठवले यांनी केले. कश्मिरा दळी यांनी आभार मानले. ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाला भारतातील तसेच भारताबाहेरील अनेक विद्वान मंडळी उपस्थित होती. विविध ठिकाणांहून सहभागी झालेल्यांना ई मेलद्वारे प्रमाणपत्र पाठवण्यात आले.
ऑगस्ट महिन्यात उपकेंद्राद्वारे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांच्या संस्कृतसंबंधातील साहित्यावर आधारित एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन रत्नागिरी येथे केले जाणार आहे, असे यावेळी जाहीर करण्यात आले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड