स्तोत्र, काव्यगायनातून उलगडला आद्य शंकराचार्यांचा जीवनक्रम

रत्नागिरी : आद्य शंकराचार्यविरचित शिवपंचाक्षर स्तोत्र, नर्मदाष्टक, जागन्नाथाष्टक, भवान्याष्टक, कृष्णाष्टक आणि देव्यापराधक्षमापन स्तोत्र सादर करत आद्य शंकराचार्यांचा जीवनक्रम उलगडणारा सुरेल कार्यक्रम चिपळूणच्या कात्यायनी स्तोत्र पठण मंडळाने सादर केला. आद्य शंकराचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम झाला.

येथील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने राणी लक्ष्मीबाई सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कात्यायनी स्तोत्र पठण मंडळाच्या सौ. शीला केतकर आणि सहकाऱ्यांनी विविध स्तोत्रांतून शंकराचार्यांचे जीवनचरित्र उलगडले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, पाठशाळेच्या उपाध्यक्ष प्रतिभा प्रभुदेसाई, सचिव जयराम आठल्ये, सौ. केतकर यांनी सरस्वतीदेवी, आद्य शंकराचार्य आणि राणी लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला. स्वरूप नेने (तबला), श्रीरंग जोगळेकर (हार्मोनियम) यांनी संगीतसाथ केली.

वडील शिवगुरू व आई विशिष्टादेवी (आर्यांबा) यांच्या पोटी शंकराचार्यांचा जन्म झाला. आद्य शंकराचार्य हे अद्वैत वेदान्तमताचे उद्गाते आणि हिंदू धर्मीयांचे तत्त्वज्ञ होते. भारतभ्रमण करून त्यांनी वैदिक धर्माची पुनर्स्थापना केली. त्यांनी द्वारका, जगन्नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे निर्मून, त्यावर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली. शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर (ब्रह्मसूत्र, उपनिषदे आणि भगवद्गीता) आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले. तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली. या रचना, स्तोत्रांवर सुरेल कार्यक्रम कात्यायनी भगिनी मंडळाने सादर केला.

आद्य शंकराचार्यांनी केरळपासून काश्मीपपर्यंत हिंदु धर्म उत्थानाचे कार्य केले. त्यांच्या रचना केवळ परमेश्वर स्तुती नव्हे, त्यांचा सुधारणावादी दृष्टिकोन दाखवतात. यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रकट होते, असे कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी सांगितले. तसेच शंकराचार्यविरचित षट्पदी सादर केली.

डॉ. कल्पना आठल्ये म्हणाल्या की, पाठशाळेला १०६ वर्षांची परंपरा आहे. वेदशास्त्रसंपन्न बाळशास्त्री गाडगीळ-पुराणिक हे पहिले अध्यापक होते. त्यानंतर व्याकरण वाचस्पती दिगंबरशास्त्री जोशी, व्याकरणाचार्य पुरुषोत्तमशास्त्री फडके, व्याकरणरत्न बाळकृष्ण हर्डीकर, काव्यतीर्थ दा. गो. जोशी, काव्यतीर्थ विनायक पोखरणकर अशा आचार्यांची दीर्घ परंपरा पाठशाळेला लाभली आहे. अध्ययन-अध्यापन परंपरा पुन्हा सुरू करण्याची दृढ इच्छा आहे. पाठशाळेने अनेक विद्यार्थी घडवले असून महाराष्ट्रात विविध ठिकाणी ते कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले.

पाठशाळेचे सचिव जयराम आठल्ये यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply