हिंदूंची ताकद एकीमध्येच – उदय गोविलकर

रत्नागिरी : ब्राह्मण आणि समस्त हिंदूंनीही एकत्र आले पाहिजे. आपली ताकद एकीमध्येच आहे, असे प्रतिपादन दापोलीच्या ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेचे संस्थापक, ब्राह्मण हितवर्धिनी सभेचे अध्यक्ष उदय गोविलकर यांनी केले.

रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाच्या गेल्या वर्षीच्या विविध पुरस्कारांचे वितरण आज सायंकाळी संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात श्री. गोविलकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. गोविलकर पुढे म्हणाले, समाजातील चांगल्या कामाची दखल घेऊन आणि कोणतेही अर्ज, फाइल न मागता रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ पुरस्कार देत आहे. ही एक उत्कृष्ट परंपरा संघाने निर्माण केली आहे. आज ज्यांचा सत्कार झाला, ते गुणी आहेत. यामुळे सत्काराची उंची वाढली, ज्या नावाचा सत्कार घेतो, त्याचा सन्मान यानिमित्ताने झाला आहे. समाजात गुणीजनांमध्ये वाढ होण्यासाठी हे पुरस्कार महत्त्वाचे आहेत. समाजाला ज्ञान देणे, यज्ञकर्म करणे आणि करवून घेणे हे ब्राह्मणांचे काम आहे. आपण आपल्या मुलांना स्नानसंध्या, सत्यनारायण, गणपतीची पूजा शिकवली पाहिजे. पौरोहित्यामध्ये नवीन पिढी येत आहे. शेतकरी, पौरोहित्य करणाऱ्यांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत, याची समाजानेही दखल घेतली पाहिजे. विवाह जमण्यावरून समस्या पाहायला मिळतात. यावर मार्ग निघाला पाहिजे. ब्राह्मण माणूस स्वतःच्या पायावर हिमतीवर उभा राहतो. तो भीक मागत नाही.

यावेळी पुरस्कार दिलेल्या व्यक्ती अशा – (पुरस्काराचे स्वरूप- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, पुस्तक भेट आणि श्रीफळ, पुष्पगुच्छ) – राणी लक्ष्मीबाई पुरस्कार- आंतरराष्ट्रीय आर्चरी खेळाडू ईशा पवार (तिच्या वतीने आई सौ. कंचन पवार यांनी पुरस्कार स्वीकारला.), धन्वंतरी पुरस्कार- डॉ. मोहन किरकिरे, ज्येष्ठ पत्रकार दर्पण पुरस्कार- संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर, आदर्श पौरोहित्य पुरस्कार- वेदमूर्ती नारायण जोगळेकर, आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार- प्रसाद काकिर्डे, आदर्श कीर्तनकार पुरस्कार- महेश सरदेसाई, उद्योजिका पुरस्कार- सौ. पूर्वा प्रभुदेसाई, उद्योगिनी पुरस्कार- सौ. सीमा आठल्ये.

सत्कारमूर्तींनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने पुरस्काराबद्दल आभार मानताना सांगितले की, कोणत्याही अर्ज, फाइलशिवाय चांगल्या कामाबद्दल पुरस्कार दिला जातो, हे विशेष आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे आता आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. समाजात चांगले काम वाढण्यासाठी संघाला आम्ही मदत करू.

व्यासपीठावर कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे, ठाणे कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे कार्यवाह संदीप कळके होते. यावेळी पुरस्कार वितरणासह प्रमुख देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा परिचय सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, सुहास ठाकुरदेसाई, चंद्रकांत हळबे, माधव हिर्लेकर आणि मानस देसाई यांनी करून दिला. सौ. रेणुका मांदुस्कर यांनी सूत्रसंचालन केले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या सचिव सौ. शिल्पा पळसुलेदेसाई यांनी आभार मानले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या विविध पुरस्कारप्राप्त मान्यवरांसोबत मागे उभे प्रमुख पाहुणे उदय गोविलकर, माधव हिर्लेकर
यांच्यासह कार्यकारिणी सदस्य.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply