रत्नागिरी : राज्यात पहिल्यांदाच बीचवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन रत्नागिरीतील मांडवी बीचवर करण्यात आले आहे. येत्या २२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता महिला आणि पुरुष विभागात एकूण १० गटांत ही आगळीवेगळी कुस्ती भरवण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे कार्यवाह सदानंद जोशी यांनी पत्रकारांना दिली.
जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने १२ मे ते २१ मे दरम्यान छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर कुस्तीचे मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. कुस्तीतील सराव, नवनवीन तंत्र शिकता यावे, यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील होतकरू आणि युवा कुस्तीपटूंनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
माती, गादीवरील कुस्ती स्पर्धेबरोबर आता बीच कुस्ती स्पर्धा हा नवीन कुस्ती प्रकार समाविष्ट झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात प्रथमच मांडवी येथील जय भैरव नवरात्रोत्सव मंडळ, मांडवी पर्यटन संस्था आणि रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मांडवी येथील जोंधळ्या मारुती मंदिर परिसरात बीचवरील कुस्ती स्पर्धा होणार आहे. जिल्ह्यातील युवा कुस्तीपटूंना जास्तीत जास्त संधी मिळावी, कुस्तीची परंपरा जिल्ह्यात रुजावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती श्री. जोशी यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक गटातील विजेता आणि उपविजेता यांना रोख बक्षीस व चषक देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. स्पर्धकांना प्रवास भत्ता, जेवणाची सोय आदी व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे. या नावीन्यपूर्ण स्पर्धेला रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धक व प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतील, अशी आयोजकांना अपेक्षा आहे. यावेळी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण ऊर्फ भाई विलणकर, मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, कुस्ती असोसिएशनचे सदस्य आनंद तापेकर उपस्थित होते.
दरम्यान, स्पर्धेच्या अनुषंगाने २१ मार्च रोजी सकाळी ७ ते ८ या दरम्यान मांडवी बीचवर स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media