ठाकर आदिवासी कला आंगण पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास यावे : तहसीलदार पाठक

कुडाळ : विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्टचे लोककला जपण्याचे काम स्तुत्य आहे. त्याला अधिक चालना मिळाली पाहिजे. ठाकर आदिवासी कला आंगण हे एक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास यावे, असे उद्गगार कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांनी काढले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर जमातीच्या लोककलांचे जतन आणि प्रसाराचे काम करणाऱ्या विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्टचा सोळावा वर्धापन दिन पिंगुळी येथे साजरा झाला. त्यावेळी ते बोलत होते.

संस्थेच्या लोककला जतन करण्याच्या अविरत कार्याने तसेच संस्था अध्यक्ष परशुराम विश्राम ग़ंगावणे यांना भारत सरकारच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री प्राप्त झाल्याने करोना काळानंतर हा सोळावा वर्धापन दिन भरगच्च कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने करोना योद्धा पुरस्कार सोहळा झाला. संस्थेच्या वतीने देण्यात येणारा शरद गरुड स्मृती कला पुरस्कार २०२२ समीर चांदरकर यांना तहसीलदार श्री. पाठक यांच्या हस्ते देण्यात आला. कला, रांगोळी आणि वाळूशिल्प क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना करोना योद्धा सन्मान देण्यात आला. सेवानिवृत्त व्यक्तीनाही पुरस्कार देण्यात आले.

परशुराम गंगावणे यांना पद्मश्री मिळाल्याने त्याच पुरस्काराने सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख झाल्याचे सांगून जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी आदिवासी लोककलेची ओळख सर्वांना व्हावी, यासाठी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
श्री. चांदरकर यांनी कै. शरद गरूड या अष्टपैलू व्यक्तीबाबत दिल्या जाणाऱ्या पुरस्काराबाबत संस्थेचे आभार मानले. तसेच संस्थेच्या कलाविषयक कामकाजामध्ये सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

परशुराम गंगावणे यांनी संस्थेचा कार्याची माहिती दिली. पद्मश्री पुरस्कार सोहळा झाल्यावर जिल्हा ठाकर समाज, पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळ तसेच इतरांनी स्वागतयात्रा काढल्याबद्दल विशेष आभार मानले.

यावेळी ठाकर समाज जिल्हाध्यक्ष भगवान रणसिंग, डॉ. गौरव घुर्ये, प्रेमानंद देसाई, भास्कर गंगावणे, डॉ . मीनाक्षी गंगावणे, डॉ. सुशांत रणसिंग, नीलेश ठाकूर, भरत गरूड, कृष्णा मस्के, वैभव ठाकूर, वल्लभ मसके, सुधीर गंगावणे, चेतन गंगावणे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन एकनाथ परशुराम गंगावणे यांनी केले.

सायंकाळच्या वेळी होम मिनिस्टर स्पर्धा झाली. रात्री गुरुकृपा दशावतार नाट्य मंडळ (हळवल) या संस्थेचे मायाजाल हे दशावतार नाटक झाले.

यावेळी संस्थेच्या नवीन उपक्रमांतर्गत ठाकर समाजाचा सातवा वधूवर सूचक पालक मेळावाही झाला. शालेय विद्यार्थ्यांना कलेची ओळख व्हावी, या उद्देशाने कला महोत्सव पार पडला. चित्रकथी कार्यशाळा, रांगोळी कार्यशाळा, निसर्गचित्र कार्यशाळा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्याची कार्यशाळा पार पडली.
(निकेत पावसकर)

आदिवासी कला अंगण आणि पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्याविषयी…

श्री. गंगावणे यांनी जोपासलेल्या चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्यांच्या या कलेची कीर्ती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली होती. त्यांनी ठाकर बांधवांना दरबारात बोलावले. त्यांची कला पाहिली. हाताच्या बोटांची कसरत करून कौशल्याने कळसूत्री बाहुल्या नाचवण्याचे त्यांचे कौशल्य पाहून ते भारावून गेले. या कलेचा स्वराज्यरक्षणासाठी चांगला उपयोग करून घ्यायचे त्यांनी ठरवले. चित्रकथीचे सादरीकरण करण्यासाठी गावोगावी जायचे आणि फिरताना शत्रूच्या गोटातील अनेक गुपिते आपल्यापर्यंत पोहोचवायची, अशी कामे ठाकर समाजातील मंडळींकडे त्यांनी सोपविली होती. या त्यांच्या कामगिरीसाठी ठाकर आदिवासींना शिवरायांनी जमिनी इनाम दिल्या. सादरीकरणासाठी प्रत्येक कुटुंबाला काही गावे नेमून दिली. आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड, गुळदुवे, आरोंदा, तळवडे ही गावे परशुराम गंगावणे यांच्या पूर्वजांना देण्यात आली होती. त्याकाळी कलाकारांच्या अंगावर व्यवस्थित कपडेही नसत. पण पानाच्या रसापासून झाडांच्या फुलांपासून मनमोहक रंग तयार करत चित्रे रेखाटण्यासाठी त्यांची धडपड असायची. शिवरायांच्या पश्चात संभाजीराजांनीदेखील हातभार लावला. त्यांनी प्रथम आदिवासींना सुव्यवस्थित कपडे घालायला दिले. राजांनी कठपुतळी, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ सादर करण्यासाठी काही ठरावीक मंदिरात जागा उपलब्ध करून दिली.

श्री. गंगावणे आदिवासी ठाकर समाजाच्या याच पारंपरिक लोककला जतन आणि प्रसाराचे काम गेल्या पन्नास वर्षांपासून करत आहेत. कठीण परिस्थितीतही त्यांनी ही लोककला जपून ठेवली आहे. पूर्वी मनोरंजनाची कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. याच काळात तळकोकणात कळसूत्री बाहुल्यांचा खेळ केला जात असे. तेच मनोरंजनाचे एकमेव साधन होते. ठाकर समाजाने ही कला जोपासली होती. बदलत्या काळात मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये मोठे बदल झाले. कळसूत्रीच्या खेळांकडे लोकांनी पाठ फिरविली. मात्र कलेसाठीच वाहून घेतलेल्या परशराम गंगावणे यांनी कुडाळजवळच्या पिंगुळी या गावात गुरांच्या गोठ्यात संग्रहालय सुरू केले. वडील विश्राम, आजोबा आत्माराम यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदिवासी कलेचा वारसा पुढे चालू राहावा, यासाठी परशुराम गंगावणे यांनी ही धडपड सुरू केली. त्यासाठी त्यांनी सुरू केलेले वस्तुसंग्रहालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आदिवासी लोककला संग्रहालय आहे. ते ३ मे २००६ साली सुरू झाले.

पिंगुळी येथे त्यांच्या गुरांच्या गोठ्यात या संग्रहालयाची सुरुवात झाली. त्यातूनच शिवरायांचा राजाश्रय लाभलेल्या तरीही काळाच्या ओघात नष्ट होण्याची शक्यता असलेल्या या लोककलेची जोपासना झाली. नऊ वर्षांपूर्वी विश्राम ठाकर आदिवासी कलाआंगण चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. त्यात पपेट, चित्रकथी, कळसूत्रीची अगदी शिस्तबद्ध मांडणी करण्यात आली आहे. या संग्रहालयाच्या आजूबाजूला माड, पोफळींच्या झाडांच्या खोडावरसुद्धा राजे-महाराज, द्वारपाल स्वागत करणाऱ्या पुरातन स्त्रियांची चित्रे विविध रंगात रंगविलेली आहेत.

अंगणात प्रवेश करायचे प्रवेशद्वार, कमानसुद्धा बांबूच्या डहाळ्यांपासून तयार करून त्यावर प्राणी आणि वनस्पतींची चित्र तर प्रवेशद्वाराच्या एका बाजूला हातात ढोलकी, सोबतीला नंदीबैल अशी प्लास्टरची प्रतिकृती, त्यासमोरील छोट्याशा झोपडीत घरगडी, त्याची शेतात राबणारी कारभारीण दिस. शेवगा, रोवळी, बुडकुले, डहाळी, कांबळे, टोपली (हडगी), घिरट, जू, नांगर, मासेमारी करायची शेंडी, बांबू-काठ्यांपासून बनवलेले बाक, सोरकूल, शिंके, रॉकेलचा कंदील, शेणाने सारवलेल्या भिंती, त्यावर शेडने काढलेली फुले, भिंतीवर रेखाटलेला नागोबा, झोपडीचे कौलारू छप्पर, मातीच्या भिंती असे सारे या संग्रहालयात आहे. खास आदिवासी उपकरणे, वाद्ये, पोशाख, हिरोबा, चित्रकथीसाठी वापरली जाणारी चित्रे आदींचे प्रदर्शन पिंगुळीला ठाकर आदिवासी कला केंद्रात मांडलेले आहे. अत्यल्प शुल्क देऊन हे प्रदर्शन पाहता येते. त्याचबरोबर कळसूत्री बाहुल्यांचे खेळसुद्धा दाखवले जातात.

कलेच्या जोपासनेसाठी श्री. गंगावणे यांनी देशभर भ्रमंती केली. विविध ठिकाणी लोककलांची जोपासना कशी केली, याचा अभ्यास त्यांनी केला. बडोदा, गुजरात, मुंबई, पुणे, औरंगाबाद, चेन्नई, मध्य प्रदेश, कुरुक्षेत्र, दिल्ली, बंगळूर, म्हैसूर, राजस्थान, कलकत्ता येथून जाऊन पपेट शो केले. अशा प्रकारे कळसूत्री बाहुल्यांमार्फत सुमारे १०० प्रयोग त्यांनी कोलकाता, मुंबई आणि बाहेर अनेक ठिकाणे केले. एकनाथ आणि चेतन ही त्यांची दोन्ही मुले त्यांना त्या खेळासाठी गायन आणि तबलावादन तसेच बाहुल्या नाचवून मदत करतात. कळसूत्री बाहुल्यांच्या या खेळात तीस बाहुल्या असतात. त्यांच्या माध्यमातून खेळ साकारतो. तो विषयानुरूप वेगवेगळा असतो. जतन केलेल्या १० पोथ्या सध्या आहेत. त्यांच्या आधारे खेळाचे कथानक ठरते. काही कथा साडेतीनशे वर्षांपूर्वीच्याह आहेत. बाहुल्यांचा खेळ विशिष्ट पद्धतीने सुरू असतो. त्यातील कथा गीतातून सांगितली जाते.

कुडाळपासून तीन किलोमीटरवर मुंबई-गोवा महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या या संग्रहालयात निवासी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये या कला शिकविल्या जातात. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत त्यांना चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्यांसाठी गुरू म्हणून नेमले आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या गुरू-शिष्य परंपरा योजनेद्वारे त्यांनी आठ कार्यशाळांमधून १५० हून अधिक विद्यार्थी तयार केले आहेत. दहावीच्या इतिहास या विषयात चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्यांच्या कलेचा समावेश केलेला आहे. पीएचडी करणारे अनेक अभ्यासक तसेच शाळांच्या शैक्षणिक सहली संग्रहालयाला भेट देतात. कोकण रेल्वेच्या डेक्कन ओडिसीमधील पर्यटक या संग्रहालयाला भेट देण्यासाठी येत असत. शिवाय देशी-विदेशी पर्यटकही भेटी देत असतात. अनेक शैक्षणिक सहलीसुद्धा संग्रहालयाला भेट देतात.

कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कार्यशाळासुद्धा पिंगुळीला आयोजित केल्या जातात. पुणे-मुंबईत खास खेळ आणि कार्यशाळा घेतल्या जातात. या कलेतून होत असलेल्या जनजागृतीचे संशोधन करण्यासाठी अनेक अभ्यासू येतात. आतापर्यंत फ्रान्सचे इयॉन लिंच, लंडनचे टॉम, सायमन, ऑस्ट्रेलियाची जेनीफर, अॅतलेक्समोरा, केम्ब्रिजची उमा फोस्टीस, जर्मनी-तुवाइलायन कॅरियसवायन, डॉ. सुयी लारनिंग अशा अनेक विदेशी पर्यटक, फोटोग्राफर, अभ्यासकांनी या कलेवर संशोधन केले आहे.

श्रीं. गंगावणे यांनी विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, स्वच्छ भारत अभियान, स्त्री-भ्रूण हत्या, एड्स जनजागृती अशा अनेक विषयांवर कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून कार्यक्रम केले आहेत. असेच विविध विषय घेऊनही प्रबोधन केले जाते.

श्री. गंगावणे यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सिंधुदुर्ग पर्यटन मित्र पुरस्कारासह अनेक राज्य आणि इतर पुरस्कार मिळाले आहेत. केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने त्या सर्व पुरस्कारांवर कळस चढवला आहे. श्री. गंगावणे यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून पारंपरिक लोककलांच्या जतनासाठी अनेकांनी पुढे यावे, असे आवाहनही केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply