चिपळूणच्या वाचन मंदिरात पां. वा. काणे यांचा पुतळा

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांच्या जन्मदिनी त्यांच्या पुतळ्याचे अनावरण चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक प्रसाद शिंगटे यांच्या हस्ते ७ मे रोजी करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रसाद शिंगटे म्हणाले, कोकणातील प्रतिभावंतांनी आपल्या ज्ञानाने देशाला प्रगतिपथावर नेले आहे. वाचन मंदिराने उभारलेल्या कलादालनात असलेली तैलचित्रे या महापुरुषांच्या कार्याची भावी पिढीला प्रेरणा देणारी आहेत. चिपळूण परिसरात मोठा इतिहास घडला, याची ओळख करून देणारी ध्वनिचित्रफीत करायला हवी आहे. यासाठी प्रयत्न करू या. भारतरत्न पां. वा. काणे यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि पुष्पहार अर्पण करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी संस्थेच्या संचालकांना धन्यवाद देतो. चिपळूण पालिकेचे अशा चांगल्या कामाला नक्कीच सहकार्य असेल, असेही ते शेवटी म्हणाले.

प्रकाश काणे म्हणाले, माझ्या भाग्याने मला लहानपणी भारतरत्न काणे यांना पदवंदन करता आले. पां. वा. काणे यांचा जन्म चिपळूणजवळच परशुराम क्षेत्री झाला. चिपळूण आणि परशुराम अगदी जवळ आहे. त्यामुळे चिपळूणला त्यांचे एखादे स्मारक करायला हवे. चिपळूण पालिकेच्या सहकार्याने ते करता येईल. काणे यांनी मुख्याधिकारी यांना त्यासाठी मदतीचे आवाहन केले.

वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे म्हणाले, काणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास लिहिताना प्रकृतीची साथ नसताना मानसिक बळावर ग्रंथ पूर्ण केला. काणे यांच्या धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथातील उतारा त्यांनी वाचून दाखविला. असे महामानव आपल्या कोकणात जन्माला आले, याचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले.

डॉक्टर काणे यांची धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्यामागची राष्ट्रीय अभिमानाची भूमिका ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे यांनी विशद केली.

वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात चिपळूण शहरातील वाचनालयाचे महत्त्व समजून घेऊन संपूर्ण सहकार्य करणारे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या हस्ते डॉक्टर काणे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले, याचा आनंद व्यक्त केला.

अरुण इंगवले यांनी आभार मानले. पुतळा साकारणारे संदीप ताम्हणकर यांच्या कलेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

कार्यक्रमाला मसापचे चिपळूण शाखा अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, चिपळूण कोमसापचे उपाध्यक्ष कवी राष्ट्रपाल सावंत, माजी नगरसेविका सौ. माधुरी पोटे, उपाध्यक्ष सुनील खेडकर, सुधीर पोटे, कार्यवाह विनायक ओक, संचालक मधुसूदन केतकर, प्रकाश घायाळकर, संस्थेचे संचालक अभिजित देशमाने, संजय शिंदे, श्रीराम दांडेकर, सुमेध करमरकर आदी उपस्थित होते.


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply