Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीत १५ जुलै रोजी जी-20 ची डब्ल्यू-20 परिषद

Advertisements

रत्नागिरी : शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत डब्ल्यू- २० अंतर्गत महिलांसाठी प्रशिक्षण, चर्चासत्र होणार आहे. येत्या १५ जुलैला संस्थेच्या कडवाडकर संकुलात हा कार्यक्रम होणार आहे.

भारताकडे असलेल्या जी- २० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात देशभरात विविध प्रकारच्या बैठका, प्रशिक्षणे, चर्चासत्रे, कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या अनुषंगाने महिलांची परिषद भरविण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री. सोहोनी, प्रसन्न दामले, शिल्पा पानवलकर, प्राचार्या स्नेहा कोतवडेकर यांनी ही पत्रकार परिषद घेतली.

यावेळी सांगितलेल्या माहितीनुसार भारत सरकारने एसएनडीटी महिला विद्यापीठाला शैक्षणिक भागीदार म्हणून डब्ल्यू-२० चे आयोजन करण्याची सूचना केली. त्यानुसार विद्यापीठाने काही निवडक महाविद्यालयांची निवड डब्ल्यू-२०च्या आयोजनासाठी केली आहे. एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमेनला डब्ल्यू-२० च्या आयोजनाची संधी मिळाली आहे.

वुमन लीड डेव्हलपमेंटअंतर्गत ग्रासरूट वुमन लीडरशिप या विषयाची निवड या परिषदेसाठी केली आहे. यात बीसीए कॉलेजने रत्नागिरीतील विविध बचत गटांच्या समस्या आणि सूचना एसएनडीटी विद्यापीठापर्यंत पोहोचवण्याचे ठरवले आहे. तळागाळातील महिलांचे नेतृत्व या विषयावर रत्नागिरी तालुक्यातील बचत गटाच्या सर्व १० क्लस्टर को-ऑर्डिनेटर्सचे चर्चासत्र आयोजित केले आहे. बचत गटांना भेडसावणाऱ्या समस्या यावेळी प्रामुख्याने मांडण्यात येतील. याचबरोबर डिजिटल मार्केटिंग संदर्भात कार्यशाळा आणि या १० क्लस्टर्सच्या बचतगटांचे स्टॉल मांडले जाणार आहेत. तेथील वस्तू विक्रीसाठी असणार आहेत. येत्या शनिवारी सकाळी १० वाजता एसएनडीटी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नितीन प्रभुतेंडुलकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल.

जी-ट्वेंटी म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी हा जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट आहे. या राष्ट्रगटाची स्थापना १९९९ साली झाली. गेल्या वर्षी १ डिसेंबरपासून येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे आहे. भारताच्या जी- २० अध्यक्षपदाची संकल्पना “वसुधैव कुटुंबकम् किंवा एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी आहे. याअनुषंगाने देशभरात विविध प्रकारच्या बैठका, कार्यक्रम, प्रशिक्षणे, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकीच एक बैठक डब्ल्यू २०च्या रूपाने रत्नागिरीत होत आहे.

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे (अण्णासाहेब कर्वे) यांनी स्त्री शिक्षणासाठी १८९६ मध्ये पुण्यात शिक्षण संस्थेची स्थापना केली. महिलांच्या उन्नतीसाठी व विकासासाठी, महिलांना शिक्षणातून स्वावलंबी बनवण्यासाठी कार्य करणारी एकमेव संस्था म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा नावलौकिक आहे. शिक्षणामुळे स्त्री स्वतंत्र व कर्तव्यदक्ष बनेल आणि आशाआकांक्षांचे अमर्याद क्षेत्र स्त्रियांना शिक्षणामुळे मोकळे होईल, ती अधिक सामर्थ्यवान बनेल’, हा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा ध्यास होता. त्यातून सुरू झालेल्या या संस्थेचे कार्य ५० पेक्षा अधिक शाखांमध्ये अविरतपणे चालू आहे. ही संस्था अनेक निराधार, वृद्ध स्त्रिया, अनाथ मुली यांचे आश्रयस्थान असून तेथे त्यांना शिक्षण आणि रोजगार उपलब्ध केला जातो. संस्थेचे १९९९-२००० पासून शिरगाव येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन फॉर वुमेन अत्यंत प्रभावी आणि कार्यक्षमपणे कार्यरत असून ते एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्न आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जी- २० अध्यक्षतेच्या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन, भारतात ५० हून अधिक शहरांमध्ये २०० हून अधिक बैठकांचे आयोजन करत आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हे भारताचे जी- २० प्राधान्यांपैकी एक आहे. जी- २० अंतर्गत बी- २०, सी- २०, एल- २०, एस- २०, साई- २० स्टार्टअप २०, टेक-२०, थिंक- २०, यू- २०, डब्ल्यू- २०, वाय- २० या बैठका घेतल्या जात आहेत. त्यापैकी एक बैठक रत्नागिरीत होत आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version