
रत्नागिरी : बारावीमध्ये शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी, पालकांसाठी शिरगावच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने येत्या शुक्रवारी (दि. २४ मार्च) रत्नागिरीत मोफत समुपदेशन कार्यक्रम आयोजित केला आहे.
एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने या उपक्रमांतर्गत समुपदेशन व बारावीनंतर विविध क्षेत्रातील सुवर्णसंधींवर मार्गदर्शन कार्यक्रमात करिअर पाथ निर्मितीमध्ये विश्वविक्रम करणारे प्रा. विजय नवले मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत जिल्हा परिषदेजवळील मराठा भवन मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
प्रा. विजय नवले यांनी गेल्या २३ वर्षांत राज्यभरात ३५०० हून अधिक करिअर व्याख्याने दिली आहेत. अभ्यासपूर्ण मांडणी, ओघवती वक्तृत्वशैली, रंजक किस्से ते व्याख्यानादरम्यान सांगतात. प्रा. नवले यांनी सुमारे २६०० कार्यक्षेत्रांचा सूक्ष्म अभ्यास करून ६७ हजार १०० करिअर मार्गांचे संशोधन केले. संपूर्ण जगात असा अभ्यास व करिअर मार्गांची तक्ता स्वरूपात प्रथमच निर्मिती केल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने या विक्रमाची नोंद करून त्यांना सन्मानित केले आहे.
प्रा. नवले यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये करिअरविषयक विपुल लेखन केले आहे. आकाशवाणी, दूरदर्शन आणि विविध वृत्तवाहिन्यांवरूनही ते करिअर मार्गदर्शन करतात. करिअर निर्णय या जगातील पहिल्या करिअर कॅलेंडरचे लेखन व संपादन प्रा. नवले यांनी केले आहे. असे दिग्गज व्यक्तिमत्त्व रत्नागिरीत प्रथमच येत असून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन फॉर वुमेन्सने केले आहे. अधिक माहितीसाठी 9420274119 किंवा 797297567 या क्रमांकावर संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड