रत्नागिरी : येथील महिला बचत गटांचा आवाज तीनचतुर्थांश जग व्यापणाऱ्या जी-20 परिषदेपर्यंत पोहोचला. आपल्या समस्या, मागण्या आणि भविष्यातील योजनाही महिलांनी एका परिषदेमार्फत जगाच्या व्यासपीठावर पोहोचविल्या.


एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरीतील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन फॉर वुमनची जी-20 परिषदेचा एक भाग असलेल्या डब्ल्यू – २० परिषदेचे आयोजन करण्यासाठी विद्यापीठाने निवड केली होती. त्यानुसार १५ जुलै रोजी झालेल्या या एक दिवसाच्या परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता नितीन प्रभुतेंडुलकर यांनी केले. तळागाळातल्या महिलांचे नेतृत्व हा या परिषदेचा मुख्य विषय होता. या परिषदेमध्ये रत्नागिरी तालुक्यातील निवडक १० प्रयोगशील महिला बचत गटांच्या क्लस्टर्सच्या समन्वयिका सहभागी झाल्या. त्यांनी गटांना येणाऱ्या व्यावसायिक अडचणींबद्दल मनोगत व्यक्त केले. तालुक्यातील विविध प्रभाग संघांच्या सौ. दीक्षा दिनेश निवळकर, (जीवनज्योती, वाटद), सौ. स्वरा वैभव देसाई (एकता, कोतवडे), सौ. नेहा विनोद केळकर (धनज्योती, नाचणे), सौ. पूनम विजय करंजवकर (क्रांती, शिरगाव), सौ. पूजा पांचाळ, सौ. राजश्री पानवलकर (हिरकणी, करबुडे), सौ. समीक्षा सचिन वालम (रत्नकन्या, हरचिरी), सौ. प्राची अभय सावंत (कोकणरत्न, मिरजोळे), सौ. किमया कृष्णा सुर्वे (उद्योगरत्न, गोळप), सौ. विद्या विलास बोंबले, सौ. सुमंगला सुभाष पालकर (उन्नती, हातखंबा) यांचा त्यात समावेश होता.
महिला बचत गट म्हणजे पापडलोणची आणि खाद्यपदार्थ करणाऱ्या महिलांचे संघ असा काहीसा समज असतो. त्याला छेद देणारे कार्य महिला करत असल्याचे या परिषदेत स्पष्ट झाले. कोकणातील दुर्लक्षित राहिलेल्या फणसावर प्रक्रिया, भरड धान्य वर्षात महत्त्व मिळत असलेल्या नाचणीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ, भाजीपाला, नर्सरी, मसाले तयार करणाऱ्या महिलांनी आपल्या यशोगाथा सांगितल्या. त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री, मोठ्या मॉलमध्ये वस्तूंच्या विक्रीची व्यवस्था, प्रशिक्षणासाठी ठेवलेली वयाची गैरसोयीची अट, कुटुंब सांभाळून प्रशिक्षणाच्या ठिकाणी उपस्थित राहण्यात असलेल्या अडचणी असे अनेक मुद्दे या महिलांनी मांडले. केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ बचत गटापर्यंत पोहोचत असल्याचेही या महिलांनी सांगितले.
सौ. ज्योती मुळ्ये यांनी या परिषदेचे सूत्रसंचालन केले.


महर्षी कर्वेंचे महिला सक्षमीकरणाचे कार्य आजही सुरू
बचत गट प्रतिनिधींच्या या चर्चासत्रापूर्वी सकाळी बीसीए महाविद्यालयाच्या कडवाडकर संकुलात डब्ल्यू – २० परिषदेचे उद्घाटन झाले. एसएनडीटी विद्यापीठाचे असिस्टंट डीन ऑफ स्टुडंट आणि एनएसएस समन्वयक डॉ. नितीन प्रभुतेंडुलकर यांनी उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, भारतरत्न महर्षी तथा अण्णा कर्वे यांचे कार्य संस्था आज पुढे अविरत सुरू आहे. जी २० अंतर्गत डब्ल्यू ट्वेंटीच्या परिषदेचे आयोजन हा त्याचाच एक भाग आहे. अण्णा कर्वेंच्या कार्याला तोड नाही. त्यांनी प्रसिद्धीपराङमुख राहून काम केले. १९०० च्या शतकात त्यांनी जपानला भेट दिली. तेथे महिला विद्यापीठ होते. महिलांसाठी शिक्षणाची वेगळी सोय आहे, ते पाहून त्यांनी भारतात तसे का का असू नये या विचारातून अण्णांनी १९०५ मध्ये संस्था सुरू केली. सामाजिक जबाबदारी, महिला सक्षमीकरणाचे काम संस्था करत आहे. डब्ल्यू-२० अंतर्गत महिला बचत गटांचे मार्केटिंग, सक्षमीकरणाचे काम सुरू झाले आहे. आज महिला बचत गटांनी त्यांची उत्पादने आणली आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत. या परिषदेचा अहवाल केंद्र शासनापर्यंत पोहोचेल. एसएनडीटी महिला विद्यापीठ लवकरच सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणून घोषित होईल. राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे प्रस्ताव गेला असून वर्षभरात सेंट्रल युनिव्हर्सिटीची घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष शिल्पा पानवलकर यांनी सांगितले की, महिला ही एक शक्ती आहे. महिलांची निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे महत्त्वाचे आहे. फक्त ऐकून नव्हे तर कृतीत आणणे गरजेचे आहे. त्याकरिता डब्ल्यू-२० चे आयोजन केले आहे. याचे आयोजन करण्याची संधी संस्थेला मिळाल्याचा अभिमान वाटतो.
योजक फूड्सच्या उद्योजिका सौ. दया भिडे यांनी सांगितले की, माझ्याकडे महिला कर्मचारी आहेत. तरुणी ते ज्येष्ठ महिला अत्यंत धडाडीने काम करते. संसारासाठी काही करायचे आहे म्हणून ती नेटाने करते. डिजिटलचे ज्ञान तिच्याकडे आहे. काही वेळेला नक्की कुठच्या दिशेने जावे हे कळत नाही, मार्ग मिळत नाही. आज डब्ल्यू- २० अंतर्गत हे ज्ञान मिळेल. पुढच्या वेळेस आणखी मोठ्या संख्येने महिला येतील. स्वतःचा विकास करताना राष्ट्राचा, समाजाचा विकास करतील.
आयएमए रत्नागिरी शाखाध्यक्ष, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे म्हणाल्या की, भारताच्या जी- २० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात देशभरात विविध प्रकारचे उपक्रम होत आहे. या अनुषंगाने महर्षी कर्वे संस्थेला डब्ल्यू- २० आयोजनाचा मान मिळाल्याबद्दल अभिमान वाटत आहे. काही वर्षांपूर्वी कोकणचे लोक मुंबईत चाकरमानी होते. त्यामुळे त्यांची पत्नी गावी राहून घरसंसार चालवते. या कोकणी महिलेकडे मॅनेजमेंट स्किल मोठे आहे. कारण ती असलेल्या पैशांत घर चालवते, मुलांना शिक्षण देते. जास्त महिला महिलांनी तब्बेतीकडे पाहिले पाहिजे. आर्थिक सुबत्ता येत राहते पण तब्बेत सुधारणे शक्य नसते.
सरपंच फरिदा काझी यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या. प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचे स्वागत पुष्परोपटे देऊन केले. शाल आणि अण्णा कर्वे यांचे चरित्र देऊन सत्कार केला.
परिषदेमध्ये महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे (उमेद) समन्वयक नीलेश धमाले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
डिजिटल मार्केटिंगसंदर्भात रसिका पालकर यांनी आणि बीसीए कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मार्गदर्शन केले.
डब्ल्यू-20 परिषदेच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केंद्र शासनाच्या ‘सुगम्य भारत’ अभियानाविषयीचे पथनाट्य सादर केले. त्याचा व्हिडिओ
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

