रत्नागिरी : ‘अन्य दोषांच्या निवारणासाठी प्रायश्चित्त किंवा काही उपाय असतात; मात्र पैसा चुकीच्या मार्गाने आपल्याकडे आलेला असेल, तर त्याचा दोष दूर होत नाही. तो साचत राहतो. त्यामुळे आपले आचरण शुद्ध हवे. आपल्या उत्पन्नातील काही वाटा योग्य रीतीने समाजासाठी दिला पाहिजे. विचारांची शुद्धता हवी. त्यासाठी उपासना आवश्यक असून, महत्त्वाचे म्हणजे त्यात सातत्य हवे. अलीकडच्या काळात कुटुंबातील सदस्यांचा संवाद आणि प्रेम कमी झालेले दिसते. ते वाढण्यासाठी घरात दररोज सामूहिक उपासनाही करायला हवी. ती सर्वांना एका सूत्रात बांधून ठेवायला मदत करील,’ असे प्रतिपादन महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार विजेते वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी यांनी केले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘ब्राह्मणाचा आचार आणि विचार’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. २४ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम झाला. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)
‘आचार व विचार शुद्ध ठेवण्यासाठी प्रत्येकाने उपासना करणे आवश्यक आहे. घरामध्ये सामूहिक उपासनाही झाली पाहिजे, जेणेकरून घरात चांगला संवाद राहतो. स्तोत्रपठण, सूर्यनमस्कार, नामस्मरण आदी गोष्टी करायला हव्यात. लहान मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी मोठ्यांनी तसे वागायला हवे, तरच मुले ते करतील. अन्न परमेश्वराला अर्पण करून प्रसाद म्हणून घ्यावे. आपण काहीही उद्योग-व्यवसाय करत असलो, तरी त्या सांभाळून एवढ्या किमान गोष्टी करणे शक्य आहे. नियमितपणे संध्या आणि उपासना करून ऑफिसच्या कामाला जाणाऱ्या किती तरी मोठ्या व्यक्तींची उदाहरणे पाहण्यात आहेत. भगवंताचे अधिष्ठान असल्याशिवाय कोणतीही गोष्ट यशस्वी होत नाही. उपासनेमुळे आपण सक्षम होतो व सुखसंपदा प्राप्त होते. नुसती संपत्ती आणि सुखसंपदा यांमध्ये फरक असतो. घरातील प्रत्येकाने स्वतःची सर्व कामे स्वतः करण्याची सवय लावून घेतली, तर घरातील कर्त्या स्त्रीवरचा मोठा भार कमी होऊ शकतो. काहीही करताना समर्पणाची भावना असेल, तर आचारात आणि विचारात शुद्धता येते,’ असे वेदमूर्ती मुरवणे गुरुजी म्हणाले. या वेळी मुरवणे गुरुजींनी काही सत्यघटनांची उदाहरणे देऊन उपासनेचे महत्त्व सांगितले.
राणी लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ब्रह्मवृंदाने वेदमंत्रांचे पठण केले. व्यासपीठावर वेदमूर्ती मुरवणे गुरुजी यांच्यासह रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये व पुरस्कारप्राप्त व्यक्ती होत्या. कोणतेही अर्ज मागवून पुरस्कार न देता कार्यकारिणी सदस्यांकडून माहिती गोळा करून त्या आधारे सत्कारमूर्ती निवडले जातात, असे या वेळी अध्यक्ष हिर्लेकर यांनी सांगितले. संघाचा शतक महोत्सव पाच वर्षांवर आला असल्याचे सांगून, संघाला अनेक दात्यांची मदत मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. वेदमूर्ती मुरवणे गुरुजी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान झाल्यानंतर देणगीदारांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.
पुरस्कार विजेते
सावंतवाडी येथील राष्ट्रीय आयुर्वेद गुरू वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांना धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योगिनी पुरस्कार हरचिरी (ता. जि. रत्नागिरी) येथील सौ. रश्मी प्रभुदेसाई यांना देण्यात आला. आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार अनिल जायदे यांना, आदर्श कीर्तनकार पुरस्कार ह. भ. प. कुमार भाट्ये यांना, आदर्श पौरोहित्य पुरस्कार कुडाळचे वेदमूर्ती विष्णू करंबेळकर यांना आणि दर्पण पुरस्कार गुहागरचे पत्रकार मयुरेश पाटणकर यांना देण्यात आला. राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्काराने जलतरणपटू निधी भिडे हिला गौरविण्यात आले. उद्योजक पुरस्कार सौ. संपदा पुरोहित यांच्या वतीने त्यांच्या मुलाने स्वीकारला.
सत्कारमूर्तींनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विशेष आभार मानले. कामाची स्वतःहून दखल घेऊन, कोणताही अर्ज न मागवता संघाने दिलेला हा पुरस्कार लाखमोलाचा असल्याची प्रातिनिधिक भावना या वेळी व्यक्त झाली. श्री. हिर्लेकर यांनी वेदमूर्ती मुरवणे गुरुजी यांचा सत्कार केला. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन जानेवारी महिन्यात होणार आहे. त्या औचित्याने या कार्यक्रमात ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा जपही करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी केले, तर आभारप्रदर्शन अतुल आंबेकर यांनी केले. संघाच्या कार्यकारिणी सदस्य, तसेच सचिव शिल्पा पळसुलेदेसाई, प्रीती टिकेकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

