श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात भक्तिभावाने पार पडला ऋग्वेद संहिता स्वाहाकार

मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) : येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात अधिक श्रावण मासानिमित्ताने ३० जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऋग्वेद संहिता स्वाहाकार मोठ्या भक्तिभावाने पार पडला. वायंगणी (ता. कणकवली, सिंधुदुर्ग) येथील वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वाहाकार झाला. स्वाहाकारासाठी पुण्यातील घनपाठी वेदमूर्ती गोपाळ जोशी यांच्यासह सहा घनपाठी वेदमूर्ती उपस्थित होते. ऋग्वेदातील १० हजार ५०० मंत्रांचे हवन या सप्ताहात झाले. दररोज सकाळी वेदपठण आणि यज्ञ, दुपारी आरती-मंत्रपुष्प आणि सायंकाळी अष्टावधान सेवा, मंत्रजागर, आरत्या, गायन, भजनादी कार्यक्रम झाले. अष्टावधान सेवेसाठी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले (कृष्ण यजुर्वेदी) उपस्थित होते. या सप्ताहात एके दिवशी प्रसिद्ध युवा गायक प्रथमेश लघाटे यानेही गायनसेवा केली. (या कार्यक्रमांचे काही व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिलेले आहेत.)

हिंदू राष्ट्राचे सर्वतोपरी सर्व शत्रूंपासून आणि सर्व नैसर्गिक, सामाजिक आपत्तींपासून संरक्षण होणं, सनातन हिंदू धर्माचा अधिकाधिक विस्तार होणं, समाज देशभक्त, बलशाली, धैर्यशील, अपराजित होणं, सर्व समाज संघटित करणं, सर्वांना चांगल्या प्रकारचं निरोगी जीवन मिळणं, समाजातील सर्व घटकांना अधिक सुबत्ता येणं, धर्मातील भेदभाव, द्वेष समूळ नष्ट होऊन सर्वांना एकमेकांबद्दल परस्परमैत्रीची भावना निर्माण होणं इत्यादी अनेक कारणांसाठी हा स्वाहाकार करण्यात आला.

‘या कार्यक्रमात श्री लक्ष्मीपल्लीनाथाच्या कुलोपासकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, तसंच तन-मन-धनाने सहभाग घेतलाच; मात्र अन्य भक्तही श्रद्धेने सहभागी झाले. त्यामुळेच अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं हे मोठं अनुष्ठान यथासांग पार पडणं शक्य होऊ शकलं. विश्वकल्याण आणि देवस्थानाचं तेज वाढवणं हे या अनुष्ठानाचे संकल्प होते. तेही पूर्ण झाल्याचं समाधान मिळालं,’ अशा शब्दांत श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाचे अध्यक्ष मंदार हळबे यांनी विश्वस्त मंडळातर्फे कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.

ऋग्वेद संहिता स्वाहाकार म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेण्यासाठी या स्वाहाकारात सहभागी झालेले रत्नागिरीतील वेदमूर्ती विश्वास जोशी यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी त्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. ‘मुळात वेद म्हणजे श्रुती असून, साक्षात नारायणाने तयार केलेले आहेत. कोणी ऋषी-मुनींनी लिहिलेले नाहीत. सत्ययुगात वेदांची म्हणजे तत्कालीन यजुर्वेदाची निर्मिती झाली.त्यानंतर त्रेतायुगात या यजुर्वेदाचे चार भाग झाले. त्यामध्ये अग्रभागी ऋग्वेद, नंतर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा चार वेदांची निर्मिती झाली. त्यापैकी कलियुगात ऋग्वेदातील फक्त शाकल आणि बाश्कल या दोनच शाखा शिल्लक आहेत. यापैकी शाकल शाखेचा हा ऋग्वेद स्वाहाकार होता.

युगानुसार मनुष्याचं आयुर्मान कमी होत जाणार असल्याने एकाच मोठ्या वेदाचं अध्ययन-अध्यापन करणं कठीण होईल म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा चार वेदांमध्ये त्याचं विभाजन करण्यात आलं. त्यांचं अध्ययन आणि अध्यापन करून तो वारसा पुढे आणण्यात आला. शाकल शाखेचे १० हजार ५८१ मंत्र आहेत. हे मंत्र म्हणजे औषधं आहेत, म्हणजेच त्यांचा परिणाम औषधासारखा आहे असं म्हटलं जातं. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा उपवेद आहे. प्रत्येक ऋचेचं फळ काय आहे, सूक्तांचं महत्त्व काय आहे, हे ऋग्विधान नावाच्या ग्रंथात दिलं आहे. यातलं प्रत्येक अक्षर विश्वकल्याणासाठी निर्माण झालेलं आहे, असं त्यात लिहिलेलं आहे. वेद हे साक्षात देवानेच तयार केलेले असल्याने त्या मंत्रांचा आधार घेऊन हवन, स्वाहाकार केल्यास साहजिकच ते देवतेला जास्त आवडतं. अशा मंत्रांचं हवन होणं अनेक गोष्टींना उपयुक्त ठरतं. हे जणू कल्पवृक्षासारखंच असतं. म्हणजे ज्या गोष्टीची इच्छा मनात केली जाईल, ती पूर्ण होते, इतकं याचं फळ मोठं आहे. मंत्र येत नसलेल्या व्यक्ती त्यात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नसल्याने वेगळ्या मार्गांनीही त्यात सहभागी होता येतं. प्रत्येक मंत्राच्या स्वाहाकाराला साष्टांग नमस्कार घालणं, देवतेला अभिषेक करणं, तुळशीपत्रं घालणं, सुवासिनींनी कुंकुमार्चन करणं अशा माध्यमातून सर्वांना त्यात सहभागी होता आलं,’ असं वेदमूर्ती जोशी यांनी सांगितलं.

‘या स्वाहाकारासाठी देवतेला आवाहन केलेलं असतं. त्यामुळे त्याला आनंद होईल, त्याचं मनोरंजन होईल, अशा काही गोष्टीही देवतेसमोर सादर केल्या जातात. त्यात चारही वेदांचे मंत्र देवांसमोर म्हणणं, गायन, नृत्य, वाद्य अशा १४ विद्या, ६४ कलांपैकी काही सादर करणं आदींच्या माध्यमातून अष्टावधान सेवा होऊ शकते. तशा पद्धतीची अष्टावधान सेवाही या स्वाहाकारावेळी मंदिरात करण्यात आली. कृष्ण यजुर्वेदी शाखेचे वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्यासह एकूण सात वेदमूर्ती, तसंच वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे, घनपाठी वेदमूर्ती गोपाळ जोशी यांच्यासह १० ऋग्वेदी वेदमूर्ती यांनी वेदमंत्र म्हटले. या व्यतिरिक्त काही जणांनी स्तोत्र आणि गायन सेवाही सादर केली. मंत्रजागरही करण्यात आला,’ अशी माहितीही वेदमूर्ती जोशी यांनी दिली.

महत्त्व

हिंदू धर्मशास्त्रानुसार दर तीन वर्षांनी अधिक मास येतो. या वर्षी श्रावण मास अधिक आहे. हा योगायोग १९ वर्षांनी आला. या वेळी चातुर्मास पाच महिन्यांचा आहे. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रतं आणि उपासना केल्या जातात. हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी शुभ कार्यं केली जात नाहीत, असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे. भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असुरांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काही तरी व्रत अवश्य करावं. या कालात यज्ञयाग करण्याचीही पद्धत आहे. या यज्ञामुळे अधिक फळ मिळतं, असं धर्मशास्त्र सांगते. या वर्षीचं महत्त्व लक्षात घेऊन श्रावण मास हा पुरुषोत्तम मास असल्याने मंदिरात ऋग्वेद संहिता स्वाहाकार करण्यात आला.

परमात्मा हाच वेदांचा निर्माता आहे. वेदांची निर्मिती श्री परमात्याने ऋषींच्या मुखातून करून घेतली. ज्या ज्या ऋषींच्या मुखातून त्यांनी हे वेद मंत्र म्हणून घेतले, त्या ऋषींना त्याचा रचयिता असे ओळखले जाऊ लागले. वेदमंत्र लाखोंच्या संख्येने आहेत. त्या प्रत्येक मंत्राची विभागवार रचना करून, ते ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार मुख्य विभागात विभागले आहेत. या विभागांची रचना श्री महर्षी व्यासांनी केली आहे. हिंदू समाजातील प्रत्येक व्यक्ती कुठल्यातरी एका विभागाशी संबंधित आहे. श्री लक्ष्मीपल्लीनाथ कुलदैवत असणारे बहुतांश भक्त ब्राह्मण परिवारातील असून, त्यातही बहुतांश कर्‍हाडे ब्राह्मण आणि त्यातही शाकल शाखी आहेत. ऋग्वेदाच्या शाखांपैकी शाकल शाखा सध्या अस्तित्वात असून, या शाखेशी संबंधित असणारे एकंदर १० हजार ५०० मंत्र असून त्यातील काही मोजकेच मंत्र धार्मिक विधींसाठी उपयोगात आणले जातात. उर्वरित मंत्र लोप पावू नयेत म्हणून फक्त वैदिक ब्राह्मणांनी अध्ययन किंवा अध्यापन करून टिकवले आहेत. भगवंतांनी तर कुठलेही कर्म निष्काम भावनेने करा, असं सांगितलं आहे. वेदांचं रक्षण करणं, त्यांचं संवर्धन करणं, ते टिकवून ठेवणार्‍या ब्राह्मणांना योग्य तो सन्मान देणं हे आद्य कर्तव्य आहेच आणि त्यात आपण फलाची अपेक्षा धरू नये. निष्काम कर्म करणार्‍या मनुष्याला श्रेष्ठ अशी उपमा दिली आहे. ऋग्वेदी संहिता स्वाहाकार हे कर्म निष्काम किंवा सकाम केलं, तरी वेद पारायणाची अनंत फळं मिळतात. मुख्यत्वे अपमृत्यू टळतात, पूर्ण आयुष्य प्राप्ती होते, सगळ्या पापांचा नाश होतो, समाजविघातक शत्रूंचा नाश होतो, आपल्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो, पितर सद्गतीला जातात, सर्व देवता संतुष्ट होतात. या प्रकारे हे अनुष्ठान म्हणजे एक कल्पवृक्षच.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply