रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा पुरस्कार वितरण सोहळा २४ डिसेंबरला; वेदमूर्ती मुरवणे गुरुजींचे व्याख्यान

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण रविवारी, २४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजता शेरे नाका येथे संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार मिळालेले वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘सार्वकालीन ब्राह्मणांचा आचार आणि विचार’ या विषयावर त्यांचे या वेळी व्याख्यान होणार आहे.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने २०२३ सालचे पुरस्कार तीन महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. यामध्ये राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार निधी शरद भिडे हिला प्रदान केला जाणार आहे. तसेच उद्योजक पुरस्कार सौ. संपदा विवेक पुरोहित, उद्योगिनी पुरस्कार सौ. रश्मी विनोद प्रभुदेसाई, आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार अनिल भालचंद्र जायदे यांना देण्यात येणार आहे. आदर्श कीर्तनकार पुरस्कार ह. भ. प. कुमार विष्णू भाट्ये, आदर्श पौरोहित्य पुरस्कार वेदमूर्ती विष्णू सखाराम करंबेळकर आणि दर्पण पुरस्कार गुहागरमधील पत्रकार मयुरेश मुकुंद पाटणकर यांना प्रदान केला जाणार आहे. तसेच धन्वंतरी पुरस्कार सावंतवाडी येथील राष्ट्रीय आयुर्वेद गुरू वैद्य मुरलीधर पुरुषोत्तम प्रभुदेसाई यांना सन्मानपूर्वक दिला जाणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेल्या वेदमूर्ती मुरवणे गुरुजी यांनी पुण्यामध्ये वेदमूर्ती दिनकर फडके गुरुजी यांच्याकडे वेदाध्ययन केले. त्यानंतर नाशिक, कणकवली येथे अध्यापनही केले. त्यांचे ऋग्वेद दशग्रंथ व पद, क्रम, जटा, घनाचे संपूर्ण अध्ययन झाले आहे. वायंगणी (ता. मालवण, सिंधुदुर्ग) येथे गेल्या ३० वर्षांपासून त्यांचे गुरुकुल सुरू आहे. आतापर्यंत त्यांच्या १३ विद्यार्थ्यांनी घनान्त अध्ययन पूर्ण केले आहे. तसेच आता २५ विद्यार्थी अध्ययन करत आहेत. अशा महातपस्वी गुरुवर्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त ज्ञातीबांधव व रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये आणि सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply