जगातील आठवे आश्चर्य असलेल्या अंगकोरवाटमध्ये विष्णू भागवतकथा आणि धर्मयात्रा; अंगकोरवाट भारत फाउंडेशन संस्थेचा शुभारंभ

जगातील आठवे आश्चर्य आणि सर्वांत मोठे मंदिर असलेल्या कंबोडियातील अंगकोरवाट परिसरामध्ये नुकतेच विश्व मंदिर परिषदेद्वारे पहिल्यावहिल्या विष्णू भागवतकथेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामजन्मभूमी न्यास अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या अमृतमय वाणीने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर यादरम्यान विश्व मंदिर परिषदेने आयोजित केलेल्या अंगकोरवाट कंबोडिया धर्मयात्रेमध्ये भारत, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, युरोप आदी ठिकाणांहून सुमारे २१०हून अधिक बंधू-भगिनी सहभागी झाले होते.

या धर्मयात्रेदरम्यान दिवसभरामध्ये अंगकोर स्थापत्याच्या विविध मंदिरांना आणि वारसास्थळांना भेटी देणे आणि संध्याकाळी विष्णुकथा श्रवण असा संपूर्ण कार्यक्रम होता. या यात्रेमध्ये अंगकोरवाट विष्णुधाम या मंदिराबरोबरच बयॉन, ता प्रोम, अंगकोर थॉम, फिमेनकस, एलिफंट टेरेस, लेपर्ड टेरेस, बांटी श्राई, प्रीह खा, निक पियान, स्रा स्रांग, बाखेंग, कबाल स्पियान, थाऊजंड लिंगा, बांटी कडाई, आदी ठिकाणांना सहभागी यात्रेकरूंनी भेटी देऊन प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचा एक उत्कट आविष्कार अनुभवला.

या वेळी प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहिलेल्या “अंगकोरवाट विष्णुधाम” या ग्रंथाचे मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, तमिळ, गुजराथी आणि उडिया अशा तब्बल सात भाषांमध्ये एकाच वेळी प्रकाशन झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सर-कार्यवाह भैयाजी जोशी उपस्थित होते. तसेच स्वराधीश भरत बलवल्ली, शैलजाताई अंधारे (राष्ट्रीय अध्यक्ष – भारतीय स्त्री शक्ती), राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्तबुवा आफळे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राच्यविद्या विभागाचे संचालक डॉ. अंबरीश खरे, सोमयाजी सुहोता आपटे, भास्कराचार्य प्रतिष्ठानचे डॉ. रवींद्र कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी अंगकोरवाट भारत फाउंडेशन या संस्थेच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. आजचे कंबोडिया म्हणजे प्राचीन कम्बुज देश आहे. दक्षिण भारतातील कौंडिण्य नावाच्या तरुणाने तेथे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये प्राचीन भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांचे बीजारोपण केले. त्यानंतर तेथे हिंदू शैव, वैष्णव, बौद्ध, महायान, थेरवाद इ. भारतीय संप्रदायांचा विकास झाला आणि शेकडो वर्षे तेथे हे संप्रदाय गुण्यागोविंदाने नांदत होते. यादरम्यान ख्मेर राजवटीमध्ये सूर्यवर्मन दुसरा याने अंगकोरवाट या अद्भुत वास्तुस्थापत्याची उभारणी केली. नुकतेच अंगकोरवाट मंदिर हे जगातील आठवे आश्चर्य म्हणून जाहीर झाले आहे. अंगकोरवाट मंदिर हे विष्णुमंदिर असून, तेथे ते परमविष्णुलोक या नावाने ओळखले जाते. याचे औचित्य साधून विश्व मंदिर परिषदेने तेथे स्वामी गोविंददेवगिरी यांच्या विष्णुकथेचे आयोजन केले होते.

भारत सरकारची अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसी आणि मेकाँग गंगा को-ऑपरेशन अंतर्गत भारत आणि कंबोडिया देशांमधील सहकार्य आणि व्यापार पर्यटन वृद्धी याचे एक सामरिक महत्त्वही आहे. यासाठी अंगकोरवाट भारत फाउंडेशन अर्थपूर्ण योगदान करू शकेल असे प्रतिपादन या प्रसंगी भैयाजी जोशी यांनी केले.

युनेस्कोने अंगकोरवाट मंदिराला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिल्याने दर वर्षी तिथे जगभरातून ५० ते ६० लाख पर्यटक भेट देतात; मात्र भारतातून पाच हजारही पर्यटक तेथे जात नाहीत. म्हणूनच विश्व मंदिर परिषदेने येत्या १० वर्षांमध्ये एक कोटी भारतीयांना अंगकोरवाट विष्णुधामाचे दर्शन घडविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अंगकोरवाट विष्णुधाम हा ग्रंथ सर्व भारतीय भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगकोरवाट राजदूतांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच www.angkorwatbharat.org हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.

संपूर्ण विष्णुकथा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुषार जाधव आणि प्रा. अनिकेत पाटील यांनी केले. कंबोडिया हा देश अखंड भारताच्या सांस्कृतिक राष्ट्र संकल्पनेचा एक अविभाज्य भाग आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा आता संपूर्ण विश्वामध्ये प्रसरण पावत आहे. अशा वेळी अधिकाधिक भारतीयांनी कंबोडियाला भेट द्यावी, असे आवाहन विश्व मंदिर परिषदेचे मार्गदर्शक स्वामी गोविंददेवगिरी यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply