सावंतवाडीचे वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांना धन्वंतरी पुरस्कार
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केली आहे. येत्या डिसेंबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
धन्वंतरी, राणी लक्ष्मीबाई, उद्योजक, उद्योगिनी, आचार्य नारळकर आदर्श शिक्षक, आदर्श कीर्तनकार, आदर्श पौरोहित्य आणि दर्पण पुरस्कारार्थींची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. रोख रक्कम, सन्माचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. समाजातील चांगल्या व्यक्तींची माहिती मिळवत आणि कोणत्याही अर्ज, प्रस्तावांशिवाय हे पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. त्यामुळे या पुरस्कारांमुळे चांगल्या व्यक्तींचे समाजात कौतुक होत आहे.
धन्वंतरी पुरस्कारार्थी वैद्य मुरलीधर पुरुषोत्तम प्रभुदेसाई (कोलगाव, सावंतवाडी) आयुर्वेद पारंगत असून उच्चशिक्षित आहेत. त्यांनी देवरूखमधील मातृमंदिर आणि वरळीच्या पीपल्स मोबाइल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सुरवातीला सेवा बजावली. १९८६ पासून सिंधुदुर्ग येथे पत्नी डॉ. माधुरी यांच्यासोबत संशोधन व पंचकर्म प्रॅक्टिस करतात. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून शेकडो व्याख्याने दिली आहेत. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठातर्फे राष्ट्रीय गुरू म्हणून त्यांना मान्यता मिळाली असून गेली तीन वर्षे त्यांच्याकडे विविध राज्यांमधील आयुर्वेदाचे पदवीधर पदव्युत्तर विशेष शिक्षण घेत आहेत. आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये संशोधन लिखाण प्रसिद्ध झाले आहे. कोटकामते (ता. – देवगड) येथे सुमारे तीस वर्षांपूर्वी वैयक्तिक ओळखीद्वारे त्यांनी हायस्कूल सुरू केले. त्यामुळे ग्रामस्थांच्या मुलांना हायस्कूलसाठी दुसरीकडे जावे लागत नाही.
राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार जलतरणपटू निधी शरद भिडे हिला जाहीर झाला आहे. आतापर्यंत तिने एकूण ३८ पदके पटकावली आहेत. रत्नागिरीच्या महेश मिलके स्विमिंग ग्रुपमध्ये ती प्रशिक्षण घेत आहे. जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदके मिळवली आहेत. विजयदुर्ग, कोल्हापूर येथे वीर सावरकर जलतरण स्पर्धा, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अमृत महोत्सवी वर्ष, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे. मॉडर्न पेंटथेलॉन (रन, शूट, स्वीम, रन शूट रन, रन स्विम रन) या स्पर्धा प्रकारामध्ये पुण्यात बालेवाडी येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत निधीने दोन सुवर्णपदके आणि एक कास्यपदक पटकावले आहे. पुणे येथे महिला दिनानिमित्त खेलो इंडिया स्पर्धेत ब्रॉन्झपदक पटकवले आहे. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निधी हिची भुवनेश्वर, ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सौ. संपदा विवेक पुरोहित (कांटवली, देवरूख) यांना दिला जाणार आहे. १९९० पासून घरगुती स्वरूपात त्यांनी व्यवसायाची सुरवात केली. २००१ पासून स्वाद पेप्सीला सुरवात केली. २३ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात त्याचे वितरण सुरू आहे. यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
हरचेरी येथील सौ. रश्मी विनोद प्रभुदेसाई यांना उद्योगिनी पुरस्कार देण्यात येणार आहे. त्या पर्यावरणपूरक आणि रसायनविरहित सॅनिटरी नॅपकिन्स निर्मितीचा व्यवसाय करतात. ग्रामीण भागातील महिलांसाठी हे खूप उपयुक्त आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात, अनाथाश्रमामध्ये हे नॅपकिन्स वितरित केले जातात. रत्नागिरी, पुणे, कराड, कोल्हापूरपर्यंत पुरवठा केला जात आहे.
आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राथमिक शिक्षक अनिल भालचंद्र जायदे (पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, गुजराळी, राजापूर) यांना जाहीर झाला आहे. दुर्गम भागात त्यांनी ३६ वर्षे शिक्षणसेवा केली आहे. राजापूर तालुक्यात प्रथमच जी प्लस १ शाळा इमारत बांधकाम, पेंडखळे क्र. २ इमारत बांधकाम व १०० टक्के डिजिटल शाळा, सलग ३ वर्षे चौथी, सातवी शिष्यवृत्ती परीक्षा, बीडीएस, एमटीएस, गणित संबोध परीक्षांचा निकाल १०० टक्के लागला. त्यांच्या शाळेला उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार, आदर्श शाळा पुरस्कार, इन्स्पायर अॅवॉर्ड मिळाले आहे. त्यांना गायन, वादन, नाट्यसंगीताची आवड आहे.
आदर्श कीर्तनकार पुरस्कार देवरूखमधील हभप कुमार विष्णू भाट्ये यांना देण्यात येणार येणार आहे. त्यांनी कीर्तनाविषयी प्रचंड आवड, आस्था यातून कीर्तनात संवादिनी साथ करायला सुरवात केली. त्यानंतर कीर्तन करायला लागले. काका विश्वनाथ भाट्ये, महेश सरदेसाई, दत्तराज वाडदेकर बुवा यांचे मार्गदर्शन लाभले.
आदर्श पौरोहित्य पुरस्कार (आंब्रड, कुडाळ) वेदमूर्ती विष्णु सखाराम करंबेळकर यांना देण्यात येणार आहे. ण्यातील वेदशास्त्रोत्तेजक सभा, वेदमूर्ती दिनकरगुरू फडके गुरुजी यांच्याकडे त्यांनी ऋग्वेद अध्ययनाला सुरवात केली. ऋग्वेदाचे आणि षडंगाचे अध्ययन झाल्यावर पुण्याच्या वेद पाठशाळेत स्मार्त याज्ञिक शिक्षण घेतले. २००० साली स्वतः घरी मुलांना शिक्षण देण्यास सुरवात केली. भगवती देवी माध्यमिक विद्यालयात कोषाध्यक्ष, तर शालेय शिक्षण समितीवर कार्य करत आहेत. दरवर्षी काही गरीब विद्यार्थ्यांना दानशूर मित्रांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करतात. महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ (कुडाळ) मार्फत कार्य सुरू आहे. वागदे (कणकवली) येथील श्री दुर्गोपासक ऐक्यवर्धक संघाचे ते अध्यक्ष आहेत. वेद, वेदांगे यांचे शिक्षण घेतलेल्यांचे अध्ययन निरंतर पाठ राहावे आणि त्यांच्या परीक्षा, पारायण, शिष्यवृत्त्या देण्याचा दृष्टिकोन ठेवून वेमू मुरवणे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली वेदवेदांग प्रतिष्ठान न्यासाची स्थापना त्यांनी केली. त्याचे सहसचिव आहेत.
दर्पण पुरस्कार गुहागरचे पत्रकार मयूरेश मुकुंद पाटणकर यांना दिला जाणार आहे. ते १९९९ पासून बातमीदार म्हणून दै. तरुण भारत, रत्नागिरी टाइम्स, पुढारीमध्ये काम केले, तर २००५ पासून ते सकाळमध्ये कार्यरत आहेत. गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. साप्ताहिक सकाळ, साप्ताहिक विवेक, लोकराज्य, महिला उद्योजक विशेषांक अशा अंकांतूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. सागरी सीमा मंचचे विभाग संयोजक, श्री देव कोपरी नारायण देवस्थानचे विश्वस्त, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम ते पाहत आहेत. गुहागरचे पर्यटन वाढण्यासाठी सातत्याने ते लिखाण करतात. सामाजिक प्रश्नांवर लढा देत अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. करोना काळात परप्रांतीयांना अन्नधान्य वाटप, कॅन्सरग्रस्तांना उपचारांसाठी बाहेरगावी जाण्यासाठी मदत केली. रक्तदान शिबिरांचे आयोजन केले असून चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

