Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कवींनी स्मरणरंजनापेक्षा वर्तमानावर कविता लिहावी – राजीव जोशी

Advertisements

डोंबिवली : कवींनी स्मरणरंजनात किंवा प्रेमरंगात न रमता वर्तमानावर कविता लिहावी, असे आवाहन प्रसिद्ध कवी, लेखक राजीव जोशी यांनी काव्यरसिक मंडळाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात केले.

येथील काव्यरसिक मंडळाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. केवळ काव्याला वाहिलेल्या काव्यरसिक मंडळाचे ५९ वे वार्षिक स्नेहसंमेलन डोंबिवली येथील गणेश मंदिरात झाले. वार्षिक स्नेहसंमेलनाचे अध्यक्षस्थान यापूर्वी कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, बाकीबाब बोरकर, कवी ग्रेस, दत्ता हलसगीकर, दासू वैद्य, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, वैभव जोशी, किशोर पाठक, प्रवीण दवणे आदी नावाजलेल्या कवींनी भूषविले आहे. यावर्षीच्या राजा मंगळवेढेकर विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी राजीव जोशी यांनी भूषविले.

कार्यक्रमात मृणाल केळकर, स्वाती भाट्ये आणि वैदेही जोशी यांनी कार्यक्रम आकाशवाणीचा वाटावा, इतका उंचीवर नेला. ‘अभिजात मराठी’ हे सत्र माहितीपर असूनही उत्कंठावर्धक होते. विजय जोशी यांनी या कार्यक्रमाची धुरा उत्तमरीत्या सांभाळली. प्रवीण दामले यांनी अनुवादावर बोलताना सांगितले की, मराठी कशी समृद्ध आहे, नेमका भाव कसा टिपता येतो, हे अनुवाद करताना जमले पाहिजे. योगेश वैद्य यांनी आद्य कवींच्या रचनेतील छंदांची अभ्यासपूर्वक माहिती दिली. अनुराधाताई कुलकर्णी यांनी नवीन शब्दकोश कसे तयार होत आहेत आणि मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचेल का, याविषयी आशावाद निर्माण केला.

‘मानाचे कवी’ कार्यक्रमात १० कवींनी सहभाग घेतला. त्यातील मृणाल केळकर यांची कोकणातील खाद्यपदार्थांची यादी ऐकताना गदिमांच्या कवितेची आठवण आली. उज्ज्वला लुकतुके यांनी झाड ही कविता म्हणून सगळ्यांना अंतर्मुख केले, झाड बांडगुळालासुद्धा, स्वतःचा हिरवा रंग देते आणि आपण आपला आधार घेतलेल्या वेलींना अवेळी दूर करतो, माणसाने आजवर झाडे हजारो तोडली, माणसाला सावलीची ओढ लागली पुन्हा, असे सांगणाऱ्या महेश देशपांडे यांनी तरन्नुमध्ये गझल गाऊन मंत्रमुग्ध केले. जयंत कुलकर्णी, हेमंत राजाराम, विजय जोशी, अजित महाडकर, अंजली बापट, दया घोंगे इत्यादी कवींचाही सहभाग होता. सम्राज्ञी उटगीकर यांनी खुसखुशीत सूत्रसंचालन केले.

सभासदांच्या काव्य स्पर्धेमध्ये ‘शिलालेख’ या अनघा तांबोळी यांच्या कवितेला प्रथम, सम्राज्ञी उटगीकर आणि मेघना पाटील यांना अनुक्रमे पहिली तीन पारितोषिके मिळाली. त्यानंतर शालेय स्पर्धा आणि दोन खुले गट, तसेच पुस्तक पुरस्कार अशा बक्षिसांचे वितरण झाले.

मंडळाचा अहवाल सचिव दयाताई घोंगे यांनी सादर केला. अध्यक्ष उज्ज्वला लुकतुके म्हणाल्या की मंडळ पंजीकृत व्हावे आणि समोर काव्यरसिकांची समृद्धी दिसावी. आगामी वर्षासाठी मंडळाचे अध्यक्षपद मेघना पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. समारंभाची सुरुवातीची शारदा वंदना निशा काळे यांनी लिहिली होती. संमेलन गीत उज्ज्वला लुकतुके यांचे होते, आणि संगीत स्वरसाज मृणाल केळकर हिचा होता. सानिका गोडसे हिच्या कवितेइतकेच सूत्रसंचालन चांगले झाले. मेघना पाध्ये यांच्या रांगोळीने कार्यक्रमाला शोभा आली. वर्षा पाटील यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावर्षी अरुण म्हात्रे, किरण येले, सुलभा कोरे, प्रभु कापसे, श्रीपाद जोशी, मनीषजी पाटील आदी मान्यवर कवी समारंभाला उपस्थित होते. श्रोत्यांचा उत्साहवर्धक सहभाग होता.

स्पर्धेतील विजेते

समारंभात बक्षीस वितरण झालेले स्पर्धेचे गटनिहाय गुणानुक्रमे विजेते असे – खुला गट (१८ ते ४५ वर्षे) – अनुकूल माळी, डोंबिवली, भाग्यश्री कुलकर्णी, पुणे, आसावरी जाधव, विरार. खुला गट (वय ४५ च्या पुढे) – देवेंद्र जोशी, यवतमाळ, स्मिता शिंदे, बदलापूर, मृदुला कुलकर्णी, पुणे. उत्तेजनार्थ – पांडुरंग ठाकूर, पनवेल, नितिन बळवल्ली, वाशी.

दरवर्षीप्रमाणे कवयित्री, प्रायोजक सौ. अंजली बापट यांनी शालेय मुलांच्या कविता स्पर्धा घेतल्या. या स्पर्धेतील गटनिहाय गुणानुक्रमे विजेते असे – गट १ (पाचवी ते सातवी) – गाथा अतिश कुलकर्णी, डोंबिवली, वरदा देवधर, डोंबिवली. गट २ (आठवी ते दहावी) – रश्मी मधुकर भगत, मठ, वेंगुर्ले, समृद्धी किरण स्वाती दामले, डोंबिवली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version