Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

हातखंबा-निवळीत टँकरचे पुन्हा दोन अपघात; ग्रामस्थांनी काळ रोखली मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक

Advertisements

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातल्या हातखंबा गावात आज (४ ऑगस्ट) सकाळी एलपीजी वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला. नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यावरून खाली येऊन हा टँकर शाळेजवळच्या एका टपरीत घुसला आणि त्याने दोन-तीन दुचाकींना धडक दिली. सुदैवाने, या अपघातात जीवितहानी झाली नाही. टँकरचा चालक जखमी झाला आहे. जवळच शाळा असून, सुदैवाने त्या शाळेची मुलं बाहेर नसल्याने मोठा अपघात टळला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक रोखून धरली होती. महामार्ग चौपदरीकरणाचं काम सुरू असून, त्या संदर्भातलं नियोजन चुकल्यामुळे अपघात होत असल्याचं, तसंच ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या टँकरचे या भागात वारंवार अपघात होत असल्यामुळे परिसरातल्या नागरिकांच्या जीविताला धोका असल्याचं म्हणणं त्यांनी मांडलं. पोलिसांसह नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं. महामार्ग कामाचा ठेकेदारही या वेळी उपस्थित होता. या समस्येवर उपाययोजनेसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

त्या व्यतिरिक्त आज सकाळी हातखंब्याजवळच्या निवळी गावातही एक एलपीजी टँकर उलटून अपघात झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी हातखंबा आणि निवळी या दोन्ही अपघातस्थळी तातडीने भेट देऊन पाहणी केली.

चार-पाच दिवसांपूर्वीच हातखंबा या गावात टँकर उलटून झालेल्या अपघातामुळे वायुगळती झाली होती आणि वाहतूक १५ तास बंद होती. तसंच, दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात टँकर आणि मिनीबसची धडक होऊन अनेक शिक्षक जखमी झाले होते आणि आगही लागली होती.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version