रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील हातखंब्यात आज सकाळी पुन्हा एका गॅस टँकरचा अपघात झाला. तसेच, निवळीजवळही एक टँकर उलटला. हातखंबा-निवळी परिसरात गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या या चार अपघातांमुळे आज संतप्त ग्रामस्थांनी काही वेळ मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला होता. त्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्या बैठकीला गॅस, कंपन्यांचे प्रतिनिधी, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचा कंत्राटदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते. गॅस टँकरच्या अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित यंत्रणांना योग्य त्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचना पुढीलप्रमाणे.
गॅस टँकरचालकांची वैद्यकीय तपासणी नियमितपणे केली जावी.
चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.
वाहन चालवताना मोबाइलचा वापर न करण्याच्या नियमाची कडक अंमलबजावणी करावी.
दारू पिऊन वाहन चालवण्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
टँकर्सचा ताफा एकत्रितपणे, सुरक्षित अंतर राखून न्यावा. कमाल वेग ताशी २० किमी असावा.
सर्व चालकांना गणवेश बंधनकारक करण्यात यावा. प्रत्येक टँकरसोबत एक सहायक असणे अनिवार्य करावे.
चालकाची थकवा चाचणी घेतली जावी.
टँकरचे सेफ्टी व्हॉल्व्ह आणि आणि युटिलिटी व्हॉल्व्हच्या रचनेत आवश्यक बदल करावेत.
व्हेसल फ्रेमच्या रचनेत सुधारणा कराव्यात.
हातखंब्यात बचावकार्यासाठी वाहन (रेस्क्यू व्हेइकल) कायम तैनात ठेवावे.
बचाव पथकाला योग्य प्रशिक्षण दिले जावे.
महामार्ग प्राधिकरण आणि आरटीओ अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना :
महामार्गावर सुरक्षाविषयक चिन्हे स्पष्टपणे दिसतील अशी लावावीत.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे.
योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावेत.
चालकांसाठी जागृती शिबिरे आणि प्रशिक्षण कार्यक्रम नियमितपणे आयोजित करावेत.
टँकर्सची वेळोवेळी अचानक तपासणी करण्यात यावी.
क्षमतेपेक्षा जास्त भार (ओव्हरलोडिंग) वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी.
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

