हातखंबा अपघात अपडेट; मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक सुरळीत

रत्नागिरी : जयगडवरून कोल्हापूरला एलपीजीची वाहतूक करणाऱ्या ८० मेट्रिक टन क्षमतेच्या खासगी कंपनीच्या टँकरचा काल (२८ जुलै) रात्री साडेअकरा-बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ हातखंबा गावात वाणी पेठ इथे अपघात झाला. हा टँकर उलटून पुलाच्या खाली गेला. त्यामुळे वायुगळती सुरू झाली. जिल्हा पोलीस दल, एमआयडीसीचं बचाव पथक, तसंच जिल्हा प्रशासनाने तातडीने बचावकार्याला सुरुवात केली. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

या बचावपथकाला वायुगळती तात्पुरती थांबवण्यात यश आलं. दरम्यानच्या काळात गावातल्या नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. अपघातग्रस्त टँकर सरळ करून त्यामधला एलपीजी दुसऱ्या टँकरमध्ये पाठवण्याचं काम करणारं विशेष वाहन आणि यंत्रणा पहाटे तीनच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. एलपीजी दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज (२९ जुलै) दुपारी साडेबाराच्या सुमारास दिली.  अपघातग्रस्त टँकर बाहेर काढल्यानंतर दुपारी सव्वादोनच्या सुमारास महामार्गावरची वाहतूक सुरळीत सुरू झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघात झाल्यानंतर लगेचच मुंबई-गोवा महामार्गावरची दोन्ही बाजूंकडची वाहतूक बंद करून अन्य मार्गाने वळवण्यात आली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातात टँकरचा चालक जखमी झाला असून, सुदैवाने अन्य जीवितहानी झालेली नाही.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply