नियमित योगसराव ही शतायुषी जगण्याची गॅरंटी आणि वॉरंटी : अनंत आगाशे

रत्नागिरी : ‘योगाभ्यासामध्ये आत्महत्येपासूनही परावृत्त करण्याची मोठी शक्ती आहे. मनःशांतीसाठी प्रत्येकाने दररोज नियमितपणे योगाभ्यास करावा,’ असे आवाहन पतंजली योग समितीच्या प्रांत कार्यकारिणी सदस्य रमाताई जोग यांनी केले. रत्नागिरीतील योगशिक्षक अनंत मुकुंद आगाशे यांनी लिहिलेल्या ‘मंत्र आरोग्याचा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. ‘नियमित योगसराव ही शतायुषी जगण्याची गॅरंटी आणि वॉरंटी आहे,’ असे प्रतिपादन आगाशे यांनी केले. रत्नागिरीतील ओम साई मित्र मंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या योगकक्षाच्या सभागृहात हा समारंभ (२७ जुलै) पार पडला. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी मुद्रित आणि ई-बुक स्वरूपातील पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. सत्त्वश्री प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

रमाताई जोग म्हणाल्या, की ‘धावपळीच्या आजच्या जीवनात समाजाचे मनःस्वास्थ्य हरवले आहे. ते टिकवण्यासाठी योगाभ्यासासारखा दुसरा पर्याय नाही. मी स्वतः पहाटे साडेतीन वाजता उठून योगाभ्यास करते. योगगुरू रामदेवबाबा यांनी संपूर्ण भारतभर सुरू केलेल्या योगाभ्यासाची आता चळवळ झाली आहे. गेल्या अकरा वर्षांपासून दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. संपूर्ण जगाला योगाभ्यासाचे महत्त्व कळले आहे. म्हणूनच प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाभ्यास केला पाहिजे.’ पतीच्या अर्धांगवायूच्या आणि स्वतःच्या मणक्याच्या आजारावर योगाभ्यासामुळे कसा आराम पडला, हेही त्यांनी विशद केले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

श्री. आगाशे १५ वर्षांपेक्षा अधिक काळ ॐ साई सांस्कृतिक भवनात निःशुल्क योगवर्ग घेत आहेत. त्यांच्या या पुस्तकाचे लेखन त्यांच्यासह त्यांचे सहकारी योगशिक्षक मिलिंद सरदेसाई यांनी केले आहे. त्याबाबत प्रास्ताविकात माहिती देताना श्री. आगाशे म्हणाले, ‘सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याच्या समस्या पदोपदी सर्वांनाच भेडसावत आहेत. बदलती जीवनशैली हे याचे प्रमुख कारण आहे. म्हणूनच ‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीप्रमाणे कशाला महत्त्व द्यायचे, याचा विचार प्रत्येक नागरिकाने करावा. या पुस्तकातून नवीन योग शिकू इच्छिणाऱ्या लोकांना थोडासा सराव आणि पुस्तक वाचून घरी योग, प्राणायाम करता येईल. सर्व नागरिकांनी दररोज या पुस्तकाचा संदर्भ घेऊन यौगिक जॉगिंग, योग-प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम आणि सूर्यनमस्कारांचा सराव करावा आणि निरोगी राहावे. ईश्वराने मनुष्याला शंभर वर्षांचे आयुष्य दिले आहे आणि आजच्या भाषेत सांगायचे, तर योग ही शतायुषी जगण्याची गॅरंटी आणि वॉरंटी आहे.’ श्री. आगाशे यांनी त्यांना अचानक झालेल्या मेंदूशी संबंधित आजारातून बरे होण्यासाठी योगाचा उपयोग कसा झाला, त्याचा अनुभव यावेळी सांगितला.

योगाभ्यासासाठी संदर्भपुस्तक म्हणून असलेली उपयुक्तता लक्षात घेऊन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे, असे सत्त्वश्री प्रकाशनाचे प्रमोद कोनकर यांनी सांगितले.

‘योग या विषयावरची आणखी पुस्तके श्री. आगाशे यांनी साध्या-सोप्या भाषेत लिहावीत,’ अशा शब्दांत योगशास्त्र विषयात सुवर्णपदकासह बीए पदवी प्राप्त केलेले पतंजलीचे संघटनमंत्री विनय साने यांनी श्री. आगाशे यांना शुभेच्छा दिल्या. सह-योगशिक्षिका सौ. पौर्णिमा दाते यांनीही योगवर्गाच्या वाटचालीचा आढावा घेतला.

कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे, तसेच योगाभ्यासाचा अभ्यास करणाऱ्या अनेकांनी श्री. आगाशे यांना शुभेच्छा दिल्या.

ई-बुक लिंक :
🔹 वेब ब्राउझर आणि आयफोनसाठी : https://books.google.co.in/books?id=HqpyEQAAQBAJ

🔹 अँड्रॉइडसाठी : https://play.google.com/store/books/details?id=HqpyEQAAQBAJ

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply