Description

बखर कर्ल्याची
लेखक : राजीव लिमये, कर्ले, रत्नागिरी
प्रकाशक : सत्त्वश्री प्रकाशन, रत्नागिरी
पृष्ठे : १०८
मूल्य : १५० रुपये
…………..
पुस्तकाविषयी लेखकाचे मनोगत…
काजळीच्या तीरावरून…!
काजळी नदीच्या समुद्राजवळच्या मुखापाशी, शांत, निसर्गरम्य खाडीच्या काठावर असलेलं छोटंसं असं कर्ले गाव. त्यामध्ये लहानाचा मोठा झालेला, कनिष्ठ मध्यमवर्गीय, निमशेतकरी, लिमये कुटुंबात जन्मलेला मी फेसबुकवर दैनंदिन मनोगतातून व्यक्त व्हायला लागलो. अर्थात मी हे ‘स्वांतसुखाय’च लिहीत होतो; पण परिचयातल्या, तसंच अपरिचित वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांनी लेखनाला ऊर्जा मिळत होती. लहानपणच्या अनेक आठवणी तर होत्याच. त्या आठवणींमध्ये माडा-पोफळीवर चढणं, शेत नांगरणं यांसह गाई-म्हशींच्या गोष्टींबरोबरच त्या काळची ठळक व्यक्तिमत्त्वं समोर यायला लागली. त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांसह दिसायला लागली. आजी-आजोबांच्या, वडलांच्या समवयस्क मंडळींबद्दल लिहिताना एक वेगळीच अनुभूती झाली. अनेक बहुढंगी विविध व्यक्तिमत्त्वं आठवू लागली. मनाच्या खोल कप्प्यात दडलेला त्या काळाचा आनंददायी पटच माझ्यासमोर उलगडू लागला. त्यातूनच जन्माला आली ही कर्ल्याची बखर! पण हा काही कर्ल्याचा इतिहास नव्हे. या बखरीत आहे पिढ्यानपिढ्या इथेच राहिल्यामुळे निर्माण झालेली कर्ल्याविषयीची गाढ आपुलकी! आधुनिक काळात हरवणारी ती विलोभनीय ग्रामीण संस्कृती, आपुलकीची नाती, सुखद ग्रामीण जीवनाच्या पाऊलखुणा! हे मला जसं जाणवलं, आठवलं, तसंच तुमच्यासमोर ठेवलंय. हे पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्याचा आग्रह जवळच्या नातेवाईकांनी प्रेमापोटी धरला. वाचक म्हणून तुम्हाला हे लेखन कसं वाटेल हे माहीत नाही; पण हे वाचून तुम्हाला तुमचं मूळ गाव, तुमची माणसं आठवली तरीही मला ते आनंददायी आहे, पुरेसं आहे.
– राजीव नरसिंह लिमये
(हे पुस्तक गुगल प्ले बुक्सवर ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहे.)
📲 ई-बुक लिंक :
🔹 अँड्रॉइडसाठी : https://play.google.com/store/books/details?id=kVFgEQAAQBAJ
🔹 वेब ब्राउझर आणि आयफोनसाठी : https://www.google.co.in/books/edition/_/kVFgEQAAQBAJ












Reviews
There are no reviews yet.