मुंबई : भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) वैध असणे गरजेचे आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे. म्हणून भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या अनुषंगाने परिवहन आयुक्त कार्यालयात आज (१० सप्टेंबर) आयोजित बैठकीत परिवहनमंत्री बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव (परिवहन) राजेंद्र होळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, ‘राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला (स्कॅन करून) जाईल. त्या माध्यमातून संबंधित वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल. त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल, तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही. तथापि, त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्थादेखील केली जाईल. त्यामुळे वाहनचालकाची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटिटी (UID) असणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते.’ (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
‘भविष्यात वाहनविक्री करणाऱ्या शोरूम व वाहन दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजमध्येदेखील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे रस्त्यावर चालणारे प्रत्येक वाहन वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असलेले असेल. त्यामुळे प्रदूषण पातळी कमी करण्यास मदत होईल. त्याबरोबरच सध्या अवैध पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी मोटार परिवहन विभागाने धडक मोहीम राबवावी,’ अशा सूचनाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या वेळी दिल्या.
परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा लावणे, परिवहन भवन बांधकाम आदी बाबींचा आढावाही परिवहनमंत्री सरनाईक यांनी बैठकीत घेतला.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड






