मुंबई : एसटीचे सुमारे ८५ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा, तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१३ ऑक्टोबर २०२५) मुंबईत जाहीर केला.
एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या बैठकीस परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्त्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच सन २०२०-२४दरम्यानच्या वेतनवाढीतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून, यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत, त्यांनादेखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

