
रत्नागिरी : कोकणातील वैविध्यपूर्ण विषयांचं दस्तावेजीकरण करण्याच्या मुख्य उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या साप्ताहिक कोकण मीडियाचा यंदा (२०२५) दहावा दिवाळी विशेषांक प्रसिद्ध होत आहे. या अंकासाठी कोकणातील खाद्यसंस्कृती हा विषय घेण्यात आला असून, त्या विषयावर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करत आहोत. दर वर्षीप्रमाणेच यंदाही रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं असून, त्यांचं मनोगतही निकालासोबत दिलं आहे. विजेत्यांच्या लेखांबरोबरच अन्य स्पर्धकांचे निवडक लेखही अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच खाद्यसंस्कृती या विषयावरील अन्य वैविध्यपूर्ण लेख, पूर्वीच्या काळच्या पदार्थांच्या पाककृती, फोटो फीचर्स यांबरोबरच कथा, कविता, व्यंगचित्रे, अन्य लेख आदींचाही अंकातून आस्वाद घेता येईल. एकंदरीतच हा अंक म्हणजे कोकणातील समृद्ध खाद्यसंस्कृतीची शाब्दिक मेजवानीच आहे.
या दिवाळी अंकाचं प्रकाशन १८ ऑक्टोबर रोजी होणार असून, अंकाचं मूल्य १७५ रुपये आहे. २० ऑक्टोबरपर्यंत खरेदी करणाऱ्यांना टपालखर्च न आकारता १७५ रुपयांमध्ये अंक घरपोच पाठवला जाईल.
अंक घरपोच मागवण्यासाठी लिंक : https://kokanmedia.in/product/skmdiwali2025/
लेख स्पर्धेचा निकाल :
प्रथम क्रमांक : सौ. स्वानंदी स्वरूप जोगळेकर (चेतना श्रीकृष्ण धोंड्ये), साखरपा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
द्वितीय क्रमांक : भक्ती बिसुरे, पुणे
तृतीय क्रमांक : सुषमा कद्रेकर, मुंबई
उत्तेजनार्थ :
सौ. साधना उदय बोडस, रत्नागिरी
डॉ. मंगल महादेव पटवर्धन, रत्नागिरी
डॉ. रश्मी जोशी, धारगळ
(याच विषयावरील व्हिडिओ स्पर्धा मात्र पुरेशा प्रतिसादाअभावी रद्द करण्यात आली.)
परीक्षक श्री. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचं मनोगत –
स्पर्धेसाठी आलेले सर्वच लेख चांगले आहेत. विशेषतः जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा सर्वांचा प्रयत्न दिसतो. कोकणातील परंपरा आणि संस्कृतीची जपणूक करणं कोकणी माणसाला किती आवडतं, त्याचं दर्शन या लेखांतून घडतं. या लेखांमधून क्रमांक काढणं तसं अवघडच होतं. त्यातूनही जे पदार्थ अगदी विस्मरणात गेले आहेत, ज्यांच्या कृती आता कोणाला साधत नाहीत अशा पदार्थांवर आधारित लेखनाचा पारितोषिकांसाठी विचार केला. उंडे, कांडलेले पोहे वगैरे वाचताना लहानपणीच्या स्मृती जाग्या होतात. ज्याला हे ठाऊकच नाही त्याचं कुतूहल जागं होईल, नवं काही कळलं असं त्याला वाटेल. तोच मुख्य निकष लावला. कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा पाहुणचार या पदार्थांनी केला, तर पर्यटकांनाही ते आवडेल नि जुन्या वारशाचं जतनही होईल. उसासे टाकण्यापेक्षा हे करू या! सर्वच स्पर्धकांचं अभिनंदन!

