Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

अधिक मासानिमित्त श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात कृष्ण यजुर्वेद संहिता स्वाहाकार

Advertisements

लांजा : पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानात कृष्ण यजुर्वेद संहिता स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले आहे. वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वाहाकार होणार आहे. गुरुवार, दिनांक २१ मे ते सोमवार, दिनांक २५ मे २०२६ अर्थात अधिक ज्येष्ठ शुद्ध पंचमी ते दशमी (शके १९४८) या कालावधीत त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
२१ मे रोजी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत प्रधान संकल्प, गणपतिपूजनपूर्वक नांदी श्राद्धान्त पुण्याहवाचन, आचार्य, ऋत्विक्वरण, देवतास्थापन, ग्रहमख आदी कार्यक्रमांनी संहिता हवनाला सुरुवात होणार आहे. २२ मे ते २५ मे या कालावधीत सर्व दिवस दररोज सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत हवन होणार असून, २३ आणि २४ मे रोजी सायंकाळी सात ते रात्री १० या वेळेत वेदमूर्ती गोडबोले गुरुजी यांचे ‘आध्यात्मिक नजरेतून नक्षत्रदर्शन’ या विषयावर प्रवचन होणार आहे. २४ मे रोजी रात्री १० वाजता प्रवचन संपल्यानंतर आरत्या-भोवत्या होणार आहेत. २५ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता पूर्णाहुती, आशीर्वाद, कर्मसमाप्ती आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. (कृष्ण यजुर्वेद स्वाहाकाराविषयीची माहिती शेवटी दिली आहे.)

तीन वर्षांपूर्वीच्या अधिक मासावेळी संस्थानात ऋग्वेद संहिता स्वाहाकार करण्यात आला होता. कुलोपासक व भक्तमंडळींचे उत्तम सहकार्य लाभल्याने तो कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला होता. यंदाही श्री लक्ष्मीपल्लीनाथाच्या कृपेने सर्वांचे तन-मन-धन रूपाने सहकार्य लाभेल आणि कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडले, असा विश्वास संस्थानाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
आर्थिक मदतीसाठी बँक खात्याचे तपशील : श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान, मठ
बँक ऑफ महाराष्ट्र, लांजा शाखा
बचत खाते क्रमांक : ६०११२६७९१५७
आयएफएससी कोड : MAHB0001382

यजुर्वेद स्वाहाकाराविषयी वेदमूर्ती गोडबोले गुरुजींनी दिलेली माहिती

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे एकूण चार वेद आहेत. ऋग्वेद संपूर्ण ऋचात्मक आहे. सर्व देवतांना पाचारण करण्याची या वेदाची भूमिका आहे. यजन म्हणजेच प्रत्यक्ष आहुती देण्याची भूमिका यजुर्वेदाची आहे. यजुर्वेदाच्या कृष्ण यजुर्वेद तैत्तिरीय शाखेचा स्वाहाकार आपण करतो. तैत्तिरीय शाखेचे एकूण ९५०० मंत्र आहेत. सर्वऋतुफल प्राप्त व्हावे हा वेद स्वाहाकाराचा उद्देश असतो. दशपूर्णमास, चातुर्मास्य, पशुबंध, अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ्य, षोडशी, अतिरात्र, वाजपेय, आप्तोर्याम या सप्त सोम संस्थांचे मंत्रभाग प्रामुख्याने या वेद स्वाहाकारात येतात. तसेच नक्षत्रेष्टी, स्वर्गसत्र, अश्वमेध, राजसूय याही यज्ञांचा हवनीय मंत्रभाग या स्वाहाकारात येतो. कोणताही श्रौतयाग चारही वेदांशिवाय पूर्ण होत नाही. परंतु आपण चारही वेदांचे स्वाहाकार केल्याने सर्व यज्ञांचे फल प्राप्त होते. शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद हे यजुर्वेदाचे दोन प्रमुख भाग आहेत. या पुरुषोत्तम मासात आपण कृष्ण यजुर्वेदाचा स्वाहाकार करणार आहोत. निसर्गचक्र उत्तम प्रकारे कार्यरत राहावे, पृथ्वी निर्भय राहावी, सत्‌धर्माचा सगळीकडे प्रसार व्हावा, जल, ओषधी, वनस्पती, पशू, पक्षी, झाडे, वेली, फुले, फळे, अन्नधान्य विपुल प्रमाणात व्हावे, देश क्षोभरहित व्हावा, घरोघरी सुप्रजा निर्माण व्हावी, आरोग्ययुक्त दीर्घायुष्य मिळावे हा या यज्ञाचा प्रमुख हेतू आहे. परमेश्वराला यज्ञ अत्यंत प्रिय आहे. पुरुषोत्तम मासात भगवान विष्णूंच्या सान्निध्यात हा यज्ञ होत आहे. ‘यज्ञौ वै विष्णुः।’ असे वेदान्तात म्हटले आहे. याचा अर्थ ‘यज्ञच विष्णू आहे.’ यज्ञनारायणाच्या कृपेने आपणा सर्वांचे क्षेमकल्याण व्हावे हीच कामना करू या. धन्यवाद!

वेदमूर्ती विवेक लक्ष्मण गोडबोले, सातारा

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version