मठ (ता. लांजा) : येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात अधिक श्रावण मासानिमित्ताने येत्या ३० जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत ऋग्वेद संहिता स्वाहाकार होणार आहे.
वायंगणी (ता. कणकवली, सिंधुदुर्ग) येथील वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वाहाकार होणार आहे. स्वाहाकारास पुण्यातील घनपाठी वेदमूर्ती गोपाळ जोशी उपस्थित राहणार आहेत. ऋग्वेदातील १० हजार ५०० मंत्रांचे हवन या सप्ताहात होणार आहे. हिंदू राष्ट्राचे सर्वतोपरी सर्व शत्रूंपासून आणि सर्व नैसर्गिक, सामाजिक आपत्तींपासून संरक्षण होणे, सनातन हिंदू धर्माचा अधिकाधिक विस्तार होणे, समाज देशभक्त, बलशाली, धैर्यशील, अपराजित असा बदलणे, सर्व समाज संघटित करणे, सर्वांना चांगल्या प्रकारचे निरोगी जीवन मिळणे, समाजातील सर्व घटकांना अधिक सुबत्ता येणे, धर्मातील भेदभाव, द्वेष समूळ नष्ट होऊन सर्वांना एकमेकांबद्दल परस्परमैत्रीची भावना निर्माण होणे इत्यादी अनेक कारणांसाठी हा स्वाहाकार केला जाणार आहे.
हिंदू धर्मशास्त्रानुसार दर तीन वर्षांनी अधिक मास येतो. या वर्षी श्रावण मास अधिक आहे. हा योगायोग १९ वर्षांनी येत आहे. यावेळी चातुर्मास पाच महिन्यांचा आहे. या काळात हिंदू धर्मांत अनेक व्रते आणि उपासना केल्या जातात. हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी शुभ कार्य केली जात नाहीत, असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे. भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे. या कालात यज्ञयाग करण्याचीही पद्धत आहे. या यज्ञामुळे अधिक फळ मिळते, , असे धर्मशास्त्र सांगते. या वर्षीचे महत्त्व लक्षात घेता श्रावण मास हा पुरुषोत्तम मास असल्याने मंदिरातही ऋग्वेद संहिता स्वाहाकार करण्यात येणार आहे.
परमात्मा हाच वेदांचा निर्माता आहे. वेदांची निर्मिती श्री परमात्याने ऋषींच्या मुखातून करून घेतली. ज्या ज्या ऋषींच्या मुखातून त्यांनी हे वेद मंत्र म्हणून घेतले, त्या ऋषींना त्याचा रचयिता असे ओळखले जाऊ लागले. वेदमंत्र लाखोंच्या संख्येने आहेत. त्या प्रत्येक मंत्राची विभागवार रचना करून, ते ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार मुख्य विभागात विभागले आहेत. या विभागांची रचना श्री महर्षी व्यासांनी केली आहे. हिंदू समाजातील प्रत्येक व्यक्ती कुठल्यातरी एका विभागाशी संबंधित आहे. श्री लक्ष्मीपल्लीनाथ कुलदैवत असणारे बहुतांश भक्त ब्राह्मण परिवारातील असून, त्यातही बहुतांश कर्हाडे ब्राह्मण आणि त्यातही शाकल शाखी आहेत. ऋग्वेदाच्या शाखांपैकी शाकल शाखा सध्या अस्तित्वात असून, या शाखेशी संबंधित असणारे एकंदर १० हजार ५०० मंत्र असून त्यातील काही मोजकेच मंत्र धार्मिक विधींसाठी उपयोगात आणले जातात. उर्वरित मंत्र लोप पावू नयेत म्हणून फक्त वैदिक ब्राह्मणांनी अध्ययन किंवा अध्यापन करून टिकवले आहेत. भगवंतांनी तर कुठलेही कर्म निष्काम भावनेने करा, असे सांगितले आहे. वेदांचे रक्षण करणे, त्यांचे संवर्धन करणे, ते टिकवून ठेवणार्या ब्राह्मणांना योग्य तो सन्मान देणे हे आद्य कर्तव्य आहेच आणि त्यात आपण फलाची अपेक्षा धरू नये. निष्काम कर्म करणार्या मनुष्याला श्रेष्ठ अशी उपमा दिली आहे. ऋग्वेदी संहिता स्वाहाकार हे कर्म निष्काम किंवा सकाम केले, तरी वेद पारायणाची अनंत फळे मिळणार आहेत. मुख्यत्वे अपमृत्यू टळतात, पूर्ण आयुष्य प्राप्ती होते, सगळ्या पापांचा नाश होतो, समाजविघातक शत्रूंचा नाश होतो, आपल्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो, पितर सद्गतीला जातात, सर्व देवता संतुष्ट होतात. या प्रकारे हे अनुष्ठान म्हणजे एक कल्पवृक्ष आहे. या अनुष्ठानरूपी कल्पवृक्षाखाली क्षणभर विसावण्याची संधी श्रीलक्ष्मीपल्लीनाथ भक्तांना उपलब्ध झाली आहे. ऋग्वेद स्वाहाकार यज्ञ सर्वांच्या घरातील कार्यक्रम आहे, अशीच भावना ठेवून सर्वांनी एकत्रित यावे आणि आपल्या धर्मासाठी, राष्ट्रासाठी संघटित व्हावे, याच अपेक्षेने आणि भावनेने या यज्ञामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या सप्ताहात दररोज सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत वेदपठण आणि यज्ञ, दुपारी १ वाजता आरती- मंत्रपुष्प होईल.
देणगीसाठी आवाहन
संहिता स्वाहाकार हे मोठे पुण्यकर्म असल्याने तसेच स्वाहाकाराने देवतेचे तेजही वाढणार असल्याने त्याचा फायदा सर्व भक्तांना होणार आहे. त्यासाठी पल्लीनाथाच्या भक्तांनी आर्थिक योगदान करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबातील व्यक्तींनुसार, व्यक्तीमागे देणगीरूपी किमान एक हजार रुपये आणि त्याहून यथाशक्ती अधिक अर्थसाह्य करावे, अशी अपेक्षा आहे. तसेच प्रत्यक्ष सेवा करण्याकरिता स्वाहाकारास उपस्थित राहून स्वयंसेवक म्हणून, प्रत्येक मंत्राला फुले, तुळशीपत्र, कुंकू अर्पण करून, अन्नदान निधी देऊन, देणगी देऊन यज्ञात सहभागी होता येईल.
बाहेरगावाहून येणार्या भक्तांनी येण्याची आगाऊ कल्पना देणे आवश्यक आहे. येण्याची खात्री होण्याकरिता आगाऊ कळविल्यास त्याप्रमाणे संस्थेस नियोजन करणे सुलभ होईल. याकरिता या श्रेयस मुळ्ये (9405917567/ 9028745038), नंदकुमार नेवाळकर (9270963574) किंवा उमेश आंबर्डेकर (9850082437) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थानाचे अध्यक्ष मंदार हळबे आणि विश्वस्त मंडळाने केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

