रत्नागिरीच्या वकिली व्यवसायातील सुवर्णपर्वाचा अंत

रत्नागिरीमधील ज्येष्ठ आणि खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असलेले ॲ‍ड. बापूसाहेब परुळेकर यांचे वयाच्या शहण्णावाव्या वर्षी २७ जुलै २०२३ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या कार्याचा आढावा.

…..

रत्नागिरीच्या इतिहासामध्ये अनेक व्यक्तींचे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. खरे तर असे कोणतेच क्षेत्र नाही, की ज्यामध्ये रत्नागिरीचे नाव अभिमानाने घेतले जावे, अशी व्यक्ती नाही. वकिली हे असे क्षेत्र आहे की कुणालाही असा प्रश्न पडेल की यामध्ये असे काय महत्त्वाचे योगदान असू शकते? खरे आहे म्हणा ते! कारण वकील पक्षकाराकडून त्याची फी घेतो त्याची बाजू कोर्टामध्ये मांडतो, त्याचे पुरावे कोर्टासमोर ठेवतो आणि कोर्ट त्याबाबत अनुमान/निष्कर्ष काढून त्याच्या प्रकरणाचा निकाल देतो. या वकिलाने शिताफीने याला सोडवला, त्याला निर्दोष शाबित केला, अशा बातम्या आपण वृत्तपत्रातून अलीकडे वाचतच असतो. पण याही पलीकडे जाऊन वकिलीच्या क्षेत्रामध्ये काही वेगळे योगदान करण्याचे, नवीन पिढीसमोर वकिलीचा व्यवसाय कसा करावा याचा आदर्श ठेवण्याचे योगदान करणाऱ्या व्यक्तीमध्ये अग्रक्रमाने नाव घ्यायचे झाल्यास माननीय बापूसाहेब परुळेकर वकील यांचेच घ्यावे लागेल. कायद्याच्या व्यवसायातील अनेक वकील तेच नाव निर्विवादपणे घेतील, यात शंकाच नाही.

तत्कालीन रत्नागिरी जिल्हा म्हणजेच सध्याचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा एकत्रित जिल्हा यांचे मुख्य न्यायालय रत्नागिरी येथेच होते. बापूसाहेबांनी १९५१ मध्ये त्यांच्या काकांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीचा व्यवसाय सुरू केला. या क्षेत्रामध्ये त्या काळामध्ये पंडित, नानल, बर्वे, चितळे, जोशी असे मोजकेच नामांकित वकील अग्रणी होते. हे सर्व बापूसाहेबांना म्हटले तर ज्येष्ठ होते. वकिलीच्या व्यवसायामध्ये सर्वांत प्रथम बापूसाहेब यांनी पहिला कोणता आदर्श घालून दिला असेल, तर ज्येष्ठांचा मान, त्यांचा आदर, सर्वांशी नम्रपणाची वागणूक. बापूसाहेबांनी यामध्ये न्यायिक अधिकारीही वगळले नाहीत. मान ठेवावा आणि मान घ्यावा, याचा उत्तम आदर्श बापूसाहेबांनी घालून दिला आणि व्यवसायातून वार्धक्यामुळे निवृत्ती घेईपर्यंत तो जपला, हे आजही त्यांची प्रत्यक्ष भेट घेणाऱ्या वकिलांनाच नव्हे तर कोणाही सर्वसामान्य परिचित किंवा अपरिचित व्यक्तींनाही येईल, यात शंकाच नाही. कोर्टासमोर युक्तिवाद करताना किंवा पुरावा सादर करताना समोरून काही वाद निर्माण झाले, तरी भाषेमधील मृदुता कधीही सोडवायची नाही हे तत्त्व त्यांनी तंतोतंत पाळले.
एकदा असे घडले की पुराव्याच्या वेळी न्यायाधीश आणि वकील यांच्या दरम्यान काही वाद निर्माण झाला. न्यायाधीश महोदय तरुण होते. कोर्टासमोर बापूसाहेबांनी त्याबाबत चकार शब्द काढला नाही. का कोणास ठाऊक त्या न्यायाधीशांनी त्यांच्या चेंबरमध्ये बापूसाहेबांना बोलावून घेतले आणि अल्पशा प्रमाणात दिलगिरी व्यक्त केली. खरे तर हीच संधी न्यायाधीशांना सुनावण्याची होती. बापूसाहेबांनी दिलगिरी मान्य केली, पण त्याचवेळी त्यांना नम्रपणे वडिलकीच्या भावनेने सांगितले की मी व्यवसाय सुरू केला त्यावेळी तुम्ही पाळण्यात होतात आणि माझा किंवा कोणाचाही मृदुपणा हा घाबरटपणा समजू नका. कारण तुम्हाला चांगल्या आणि अधिक उच्च पदावर जायचे आहे. (I have started my practise while you were in cradle and secondly Do not take my/anybody’s softness as cowardness.) अनेक वर्षांच्या प्रॅक्टिसनंतरही ते व्यवसायामध्ये अजातशत्रू राहिले, याचे हेच गमक असावे!

वकिली हा व्यवसाय निवडल्यानंतर ते कसे घडले, हे त्यांनीच अधूनमधून त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून उलगडले आहे. त्यांच्या हाताखाली ज्युनिअर म्हणून काम केलेल्या वकिलांच्या स्वतंत्र कार्यालयात गेल्यावर तेथील कामाची पद्धत पाहिल्यानंतर आजही कोणीही हे ओळखू शकेल की हा बापूसाहेबांचा ज्युनिअर होता. पक्षकाराने बापूसाहेबांच्या ऑफिसमध्ये प्रवेश केल्यापासून त्याचे काम अंतिमत: संपेपर्यंत त्याचे सर्व रेकॉर्ड कसे ठेवावयाचे, त्याचा बापूसाहेबांनी खरेच आदर्श घालून दिला होता. पक्षकार ऑफिसमध्ये आल्यानंतर अशा विशिष्ट पद्धतीमुळे त्याचे कागद शोधणे हा प्रकार कधीच करावा लागत नसे. तारीखवार केसेस लावून ठेवणे, त्यांची अद्ययावत डायरी ठेवणे, त्यांना रजिस्टर नंबर देणे ही कामे बापूसाहेबांनी सुरुवातीच्या काळामध्ये स्वत:च केली. नंतर त्याचे अनुकरण त्यांनी त्यांचे कारकून/ज्युनिअर यांच्याकडून करवून घेतले. कोर्टाच्या तारखांचा आठवड्याचा बोर्ड/दैनंदिन बोर्ड याची सवय आणि पद्धत बापूसाहेबांनीच त्यांच्या कामामध्ये आणली. आलेल्या पक्षकाराला “अरे आज तुमची तारीख आहे वाटतं” असे म्हणणे बापूसाहेबांना अत्यंत कमीपणाचे वाटत असे. असे कधीही घडता कामा नये, असा त्यांचा सातत्याने आग्रह होता. पक्षकाराचे काम संपल्यानंतर त्याने कागदपत्रे परत घेतली, याचेसुद्धा रजिस्टर बापूसाहेबांनी स्वतंत्रपणे ठेवले असायचे. व्यवसायामध्ये प्रथम कार्यालयाचा उत्तम गृहपाठ आणि त्यानंतर वकिलीचा व्यवसाय हे सूत्र त्यांनी अत्यंत कठोरपणे आणि नित्यनेमाने पाळले आणि ते त्यांच्या प्रदीर्घ यशस्वी व्यवसायाचे एक महत्त्वाचे कारण आहे, असे ते अभिमानाने सांगत.

प्रत्यक्षात वकिली करताना तर त्यांनी घेतलेले कष्ट अफाट आहेत. त्यांच्याच शब्दांत सांगावयाचे झाल्यास पूर्वी वीज नव्हती किंवा काही पुरेशीही साधनेही नसायची. त्या काळामध्ये दिवा तेवतोय तोपर्यंत केसचा अभ्यास करावयाचा आणि मग उजाडल्यावर पुढे चालू करावयाचा, अशा प्रकारे त्यांनी काम केले. वाचन आणि वारंवार वाचन हे त्यांच्या अभ्यासाचे सूत्र होते. आजही मार्गदर्शन करताना ते सांगतात की पक्षकाराचे म्हणणे ऐकून झाल्यावर प्रथम संबंधित कायद्याचे पुस्तक काढून तरतूद वाचणे आवश्यक आहे. कायदा कितीही पाठ असला तरी त्याचे वारंवार वाचन पाहिजेच, असा त्यांचा परिपाठ होता. वेगवेगळ्या उच्च न्यायालयांचे निकाल रेफरन्ससाठी मिळावेत म्हणून त्यांनी स्वत:ची लायब्ररी उत्तम आणि अद्ययावत ठेवली. सुदैवाने जागा भरपूर होती, पण त्याचा उपयोग याच कारणासाठी करावयाचा हे त्यांनी नक्की ठरविले होते. जुन्या निकालपत्रांच्या माहितीसाठी त्यांनी त्यांचे ज्युनिअर सोडाच कोणाही सहकारी वकील मित्रालाही त्यांची लायब्ररी उपलब्ध करून दिली होती. परगावाहून येणाऱ्या अनेक वकिलांनी त्याचा खूप फायदा करून घेतला, हे विशेष.

न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना कोर्टाला प्रथम कायदा समजावून सांगायचा आणि केवळ त्याच्या पुष्ट्यर्थ उच्च न्यायालयाच्या निकालांचे दाखले द्यावयाचे, हे तत्त्व बापूसाहेबांनी आपल्या प्रॅक्टिसच्या संपूर्ण काळामध्ये पाळले आणि अनुभवलेही. त्यांच्या काळात कोर्टाचे काम इंग्रजीमधून चालायचे. भरपूर वाचनाने बापूसाहेबांनी ती भाषा आणि तिचा उपयोग समृद्धपणे न्यायालयामध्ये केला. त्यांचा युक्तिवाद ऐकताना आपला निकाल समोरील पुराव्यावर न होता युक्तिवादावर तर बदलणार नाही ना, अशी भीती तत्कालीन न्यायिक अधिकाऱ्यांना वाटत असली तर नवल नव्हे, अशी बापूसाहेबांची भाषा समृद्ध होती. यातूनच त्यांची वकिलीच्या व्यवसायामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि त्यांनी या व्यवसायातील एक नामांकित वकील म्हणून खऱ्या अर्थाने लौकिक प्राप्त केला. अर्थातच त्यांच्या या कार्यपद्धतीने बापूसाहेबांनी दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही क्षेत्रामध्ये नाव कमावले. मुंबई, कोल्हापूर इत्यादी ठिकाणाहून त्यांना कामांच्या ऑफर येत होत्या पण आपले कार्यक्षेत्र नेमके ओळखून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामधून कोठेही जाण्यास नम्रपणे नकार दिला. त्यातही त्यांची भावना अशी होती की मी बाहेरगावी गेलो, तर माझ्या येथील पक्षकारांचे नुकसान होईल. तरीही त्यांना कोल्हापूर येथे अनिवार्य आग्रहामुळे काही कामकाजासाठी जावे लागलेच, पण त्या काळामध्ये अन्य वकील उपलब्ध असल्याने त्यांना ते शक्य झाले. प्रामाणिकपणे काम करण्याच्या बापूसाहेबांच्या कार्यपद्धतीमुळेच रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन त्यांच्या केसेस सिंधुदुर्ग येथे गेल्या तरीही पक्षकार त्यांना सोडून गेले नाहीत. बापूसाहेबांनी त्यांना नम्रपणे विनंती केली की तेथे वकील उपलब्ध आहेत, मला आता वयोमानानुसार काम जमणे कठीण वाटते. तरीही पक्षकारांनी त्यांना आग्रह केला. त्यामुळे बापूसाहेबांनी त्या केसेस पूर्ण केल्या. मात्र नवीन काम मी स्वत: घेणार नाही याच अटीवर.

दरम्यानच्या काळात बापूसाहेब काम करीत असलेल्या राजकीय पक्षाच्या आग्रहामुळे त्यांनी लोकसभेचे सदस्यत्व स्वीकारून ते दोन वेळा खासदार झाले. आणीबाणीनंतर झालेल्या १९७७ च्या निवडणुकीच्या वेळी नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षातर्फे आणि त्यानंतर १९८० मध्येही त्याच पक्षातर्फे त्यांनी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. पण तेथेही कायद्यातील तरतुदीबाबतच त्यांनी विविध विषयांवर लोकसभेमध्ये विधेयकेही मांडली हे विशेष.

लोकसभेतील त्यांच्या कालावधीमधील कामकाजाच्या पुस्तकांचे जतनही त्यांनी वकिली व्यवसायामधील पुस्तकांइतकेच व्यवस्थितपणे करून ठेवले होते. अधूनमधून एकादी राजकीय घटना घडली तर बापूसाहेब त्याबाबतच्या लोकसभेमधील चर्चेची माहिती त्या पुस्तकांमधून शोधून काढून विवेचन करीत असत. वकील म्हटले म्हणजे कोणीतरी एक विरुद्ध पक्षकार असतोच, पण लोकसभेची निवडणूक लढविताना सर्वांनीच त्यांना सहकार्य केले, हेही त्यांच्या निगर्वी आणि नम्र वकिली व्यवसायाचेच फळ म्हणावे लागेल. आपल्या खासदारकीच्या काळात त्यांनी आपल्या मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लावली. रत्नागिरीच्या मुख्य टपाल कार्यालयाच्या इमारतीचे अनेक वर्षे रखडलेले काम त्यांच्या कारकिर्दीतच मार्गी लागले.

खासदारकीच्या कालावधीमध्येही त्यांनी व्यवसायाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली होती. राजकीय नेतृत्व करतानादेखील त्यांनी ते इतक्या समर्थपणे केले की त्या काळामध्ये एका मोठ्या मोर्चाच्या वेळी त्यांच्या एका शब्दावर ऐकणारे अनेक लोक होते. लोकांनी दगडफेक करू नये यासाठी एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी भीतीने बापूसाहेबांना जवळ धरून ठेवले होते, हे अनेकांनी पहिले आहे. त्यांना मानणारी माणसे त्यांना एक आदरणीय वकील म्हणूनच मानत होती, याविषयी शंकाच नाही.

तत्कालीन भारतीय जनसंघाचे अध्यक्षपद त्यांनी १९६० ते १९७० या काळात भूषविले. तत्पूर्वी १९५७ साली स्थापन झालेल्या रत्नागिरी जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचेही अध्यक्षपद तांनी सांभाळले होते. नंतर १९७५ सालच्या आणीबाणीच्या काळात त्यांना मिसाखाली अटक झाली आणि १६ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला.

बापूसाहेब परुळेकर यांनी आपल्या अपरंपार कष्टाने, मेहनतीने, प्रामाणिकपणे, शिस्तीने आपले वकिलीचे व्यवसायामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नक्कीच एक वेगवेगळा आदर्श आणि दबदबा निर्माण केला होता. अलीकडेच गेल्या ११ जुलै रोजी बापूसाहेबांनी वयाची ९५ वर्षे पूर्ण केली होती. त्यांच्या निधनाने रत्नागिरीमधील वकिलीच्या व्यवसायातील दीपस्तंभ आणि वकिलीच्याच व्यवसायातील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे, असेच म्हणावे लागेल. परमेश्वर बापूसाहेबांच्या आत्म्याला सद्गती देवो, ही प्रार्थना..

  • अॅड. धनंजय जगन्नाथ भावे, रत्नागिरी
  • (94220 52330)
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply