कराड : मराठी ललित लेखनात आपल्या नितळ आणि अत्यंत संवेदनशील लेखणीने एक वेगळा मानदंड प्रस्थापित करणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे आज (६ ऑगस्ट २०२६) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शांत डोहातील पाण्यावर एखादे पान पडल्यामुळे हळुवार तरंग उमटावेत, त्याप्रमाणे त्यांचे लेखन वाचकाच्या मनाच्या डोहात वेगळ्या अनुभूतीचे तरंग तयार करते. त्याच वेळी मनाच्या तळाचा वेध घेण्याची ताकदही त्यांच्या लेखणीत होती. त्यांनी मोजकेच, मात्र अद्वितीय असे लेखन केले. डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘डोह’कार श्रीवि म्हणूनच ते प्रसिद्ध झाले.
श्रीविंचा जन्म २० नोव्हेंबर १९३६ रोजी सांगली जिल्ह्यातील औदुंबर या गावी झाला. सातवीच्या पुढील शिक्षण त्यांनी अनाथ विद्यार्थी आश्रम संस्थेत राहून पूर्ण केले. त्यांचे आजोबा आणि वडील हे दोघेही चित्रकार होते. कुलकर्णी यांनी सुरुवातीला साइन बोर्ड पेंटिंगचा व्यवसाय केला. नंतरच्या काळात त्यांच्या लेखणीने वाचकांच्या मनांवर चित्रे चितारण्याची किमया केली. त्यांनी काही काळ ओगलेवाडीच्या काच कारखान्यात हिशेब खात्यात नोकरीही केली होती. त्यानंतर ‘मौज’ या नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
त्यांनी लहानपणी कविताही केल्या होत्या. त्यांची पहिली मराठी कविता पां. ना. मिसाळ यांच्या ‘बालसन्मित्र’ मासिकात प्रकाशित झाली होती. पुढे ललित लेखक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांचा पहिला ललित लेख १९६० साली ‘सत्यकथा’ मासिकात प्रकाशित झाला. ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’, ‘कोरडी भिक्षा’ ही त्यांची तीन पुस्तके मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली. बालकवींनी कविता न करता गद्यलेखन केले असते, तर ते लेखन श्रीनिवास कुलकर्णींचे झाले असते, असे मंगेश पाडगावकरांनी म्हटले होते.
राज्य शासनाने यंदाच श्रीनिवास कुलकर्णींना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले होते. सदानंद साहित्य मंडळ (औदुंबर) या ग्रामीण परिसरात वाङ्मयीन उपक्रम करणाऱ्या संस्थेचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील बहुतांश विद्यापीठांतून त्यांच्या ‘डोह’ या ललित लेखसंग्रहाची पदवी व पदव्युत्तर अभ्यासासाठी निवड करण्यात आली आहे. धारवाड विद्यापीठातही ‘डोह’ व ‘सोन्याचा पिंपळ’ या संग्रहाची पदवी व पदव्युत्तर अभ्यासासाठी निवड झाली आहे. कोलकाता येथील ‘भारतीय भाषा परिषद’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या ‘शाळेचा दिवस’ या ‘पाण्याचे पंख’ संग्रहातील लेखनाचा ‘The day of the school’ नावाने इंग्रजीत अनुवाद झाला आहे. साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलेल्या मराठीतील निवडक ललित लेखांच्या प्रातिनिधिक संग्रहात त्यांचे लेखन समाविष्ट आहे. दूरदर्शन व अन्य अनेक वाहिन्या आणि आकाशवाणी यांवर त्यांच्या मुलाखती व भाषणे प्रसारित झाली आहेत. साहित्य अकादमीच्या ग्रंथपारितोषिक सल्लागार समितीचेही ते सदस्य होते. त्यांना महाराष्ट्र फाउंडेशन, रणजित देसाई, मृण्मयी, यशवंतराव चव्हाण कऱ्हाड, महाराष्ट्र राज्य शासन वाङ्मय पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले होते.
कवयित्री शान्ता शेळके यांनी ‘डोह’बद्दल व्यक्त केलेले विचार…
श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे ‘डोह’ हे पुस्तक वाचले म्हणजे ललित लेख या वाड्मयप्रकाराच्या किती कलात्मक संभाव्यता या लेखकाने शोधल्या आहेत हे बघून आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. हा शोध त्याने काही तरी परिणामकारक लिहून वाचकांना थक्क करायचे आहे या हेतूने घेतलेला नाही. ती त्याच्या सर्जनशील प्रतिभेची सहजस्फुरणे आहेत. बालपणी लेखक ज्या परिसरात वावरला ते जग, तिथली माणसे, तिथला निसर्ग, तिथली प्राणिसृष्टी हे सारे त्याने इथे जिवंत केले आहे. त्याबरोबरच बालपणाच्या निरागस वृत्तीने टिपलेले संस्कार आता व्यक्त करताना त्याने प्रौढ वयातल्या विश्लेषक जाणिवेचीही त्याला जोड दिली आहे. असा हा ‘तेव्हा’चा आणि ‘आता’चा दुहेरी गोफ त्याने इथे विणला आहे.
फडके-खांडेकरांच्या काळांतर ललित लेख या वाङ्मयप्रकाराला साचलेपणा आला होता. मधल्या काळात ललित लेख लिहिण्याच्या काही लेखकांनी या रूपाची झालेली कोंडी फोडून त्यात नवे चैतन्य निर्माण केले. ही जी प्रक्रिया सुरू झाली होती ती ‘डोह’ने एक प्रकारे पूर्णत्वाला नेली असे म्हणण्यास हरकत नाही.
‘डोह’ने एवढेच केले असे नाही. त्याने आणखी एक महत्त्वाचे कार्य केले : ललित लेखाचे बंदिस्त आणि सांकेतिक स्वरूप पुढील काळातल्या काही समर्थ लेखकांनी बदलले आणि त्याच्या कलात्मक प्रामाणिकपणावर आणि चैतन्यशील आविष्कारावर त्यांनी भर दिल्या. त्यामुळे या वाङ्मयप्रकाराच्या कातीव, कोरीव कडा नाहीशा झाल्या. तो अधिक लवचीक, प्रसरणशील, मोकळा बनला. इतर वाङ्मयप्रकार आणि ललित लेख यांच्यामधल्या सीमारेषा अस्पष्ट होत शेवटी पुसून गेल्या. ललित लेखांनी या इतर वाङ्मयप्रकारांना आपल्यामध्ये चपखलपणे सामावून घेतले. ही विकासाची वाट प्रथम ‘डोह’ने मोकळी करून दिली.
– शान्ता शेळके
Follow Kokan Media on Social Media

