स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या आढाव्यातील प्रत्येक बाबीचा ऊहापोह करणे शक्य आहे. पिण्याचे पाणी, कचरा, गटारे अशा सर्वसामान्यांच्या मूलभूत समस्या सोडविल्याचे चित्र त्यात दिसत नाही. कोट्यवधींचा खर्च होत असताना लाखाच्या किंवा केवळ काही हजारांच्या खर्चाच्या तरतुदीची अपेक्षा असणाऱ्या सुविधा दुर्लक्षित राहतात. किंबहुना हजार आणि लाखातल्या योजना आखायच्याच नाहीत, असे ठरवून टाकले असावे. त्यामुळे अशा समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भारतीय स्वातंत्र्याचा उद्घोष करताना सर्वसामान्य जनता अशा छोट्या छोट्या गैरसोयींच्या पारतंत्र्यातून सुटकेची वाट पाहत असते.
