पर्यटन परिषदेचे फलित

पहिल्या चार वर्षांच्या परिषदांमध्ये पर्यटनाचे पर्यटनाच्या विकासाचे अनेक मुद्दे मांडले गेले असले तरी पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र आले पाहिजे, रस्त्यांसारख्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत आणि आपला व्यवसाय वाढविला पाहिजे, या विचारापलीकडे त्यातून फारसे काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही. यावर्षीची परिषद मात्र काहीशी वेगळी ठरली, असेच म्हणावे लागेल. कारण याच परिषदेत अनाहूतपणे मांडल्या गेलेल्या एका मुद्द्यावर एकदम एक कोटीच्या निधीची घोषणा झाली. तेच या परिषदेचे फलित होते.

बोलीभाषा चळवळीचे सूतोवाच

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने राजापूर तालुक्यातील तळवडे या गावी आठवे ग्रामीण साहित्य संमेलन भरविले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांनी बोलीभाषा टिकवून ठेवणे किती आवश्यक आहे, याबाबतचे विचार मांडले. बोलीभाषेतून स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडत असते. म्हणूनच बोलीभाषांचे संवर्धन म्हणजे स्थानिक संस्कृतीचे संवर्धनही असते.