राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने राजापूर तालुक्यातील तळवडे या गावी आठवे ग्रामीण साहित्य संमेलन भरविले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांनी बोलीभाषा टिकवून ठेवणे किती आवश्यक आहे, याबाबतचे विचार मांडले. श्री. देशपांडे यांच्याच पुढाकाराने कोकणातील बोलीभाषांविषयीचे संमेलन काही वर्षांपूर्वी चिपळूणमध्ये झाले होते. याच तऱ्हेचे संमेलन पालघर जिल्ह्यातही दरवर्षी होते. त्याचे स्वरूप भव्य नसले तरी कोकणातल्या बोलीभाषांसाठी आणि बोलीभाषांच्या संवर्धनासाठी चालविले गेलेले ते आश्वासक प्रयत्न आहेत. ग्रामीण संस्कृती जोपासण्याच्या उद्देशानेच भरविल्या गेलेल्या संमेलनाच्या व्यासपीठावरून श्री. देशपांडे यांनी मांडलेल्या विचारांमुळे बोलीभाषांच्या संवर्धनाच्या विषयाचे औचित्य साधले गेले आहे.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या वार्षिक ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये स्थानिक साहित्यिक, कलाकार, शेतकरी, शिक्षक, सामाजिक जाण असलेले शासकीय कर्मचारी अशा साहित्यमूल्य निर्माण करणाऱ्या समाजातील घटकांचा सन्मान केला जातो. त्याचबरोबर संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचा धागा पकडून यापुढील संमेलनामध्ये स्थानिक बोलीभाषांच्या संवर्धनासाठी काय करता येईल, याचा विचार करायला हवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी बोलीचा विचार केला, तरी गोव्याच्या सीमेवर असलेल्या सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात बोलली जाणारी मालवणी भाषा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या देवगड तालुक्यात बोलली जाणारी मालवणी भाषा यामध्ये फरक आहे. त्याच पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्यात बोलली जाणारी संगमेश्वर बोलीभाषासुद्धा विविध आविष्कारांमधून प्रकट होत असते.
राजापूरकडची संगमेश्वरी बोलीभाषा आणि कातकरी समाज अधिक असलेल्या मंडणगड तालुक्यातील संगमेश्वर बोलीभाषा यामध्ये फरक आहे. तळवडे येथील संमेलनात ज्यांची मुलाखत घेतली गेली, ते साहित्यिक अरुण इंगवले यांनी तिल्लोरी कुणबी बोली भाषेविषयी संशोधन केले आहे. त्याचा एक शब्दकोशही त्यांनी तयार केला आहे. याच पद्धतीने ठिकठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील म्हणी, वाक्प्रचार, विशिष्ट लकबी यांचाही अभ्यास करून तो संकलित करायला हवा. असा अभ्यास करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना ग्रामीण साहित्य संमेलनात व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. तसेच त्यांच्या अभ्यासाला आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
ग्रामीण साहित्य संमेलनाचे यजमान राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांचा स्वतःचा मोडी लिपीचा अभ्यास आहे. मोडी लिपीच्या अभ्यासासाठी अधिकाधिक लोकांनी प्रवृत्त व्हावे, यासाठी त्यांनी गेल्या काही वर्षांपासून चळवळ चालविली आहे. मोडी लिपी याच विषयाला वाहिलेला दिवाळी वार्षिकांक प्रसिद्ध केला जातो. मोडी भाषा समजावी, यासाठी त्याचा देवनागरी लिपीतील अनुवादही सोबत दिला जातो. मोडी लिपीची मुळाक्षरेही दिली जातात. याच पद्धतीने कोकणातील बोलीभाषांसाठी स्वतंत्रपणे काही गोष्टी करणे आवश्यक आहे. आता स्थिरावलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनातच त्या दृष्टीने पावले उचलली गेली पाहिजेत. कारण संमेलनाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे बोलीभाषा हेच मूळ मराठी भाषेचे सौंदर्य आहे. ते जपले आणि जोपासले गेले नाही, तर मराठी भाषेलाही काही अर्थ राहणार नाही. बोलीभाषा संवर्धनाच्या चळवळीचे सूतोवाच श्री. देशपांडे यांनी केले आहे. बोलीभाषेतून स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडत असते. म्हणूनच बोलीभाषांचे संवर्धन म्हणजे स्थानिक संस्कृतीचे संवर्धनही असते. त्याच उद्देशाने भरविल्या जाणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये पुढच्या काळात आणखी व्यापक स्वरूपाची चळवळ निर्माण होण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आयोजित केले गेले पाहिजेत. त्यातून खराखुरा ग्रामीण स्वाद असलेल्या साहित्याचीही निर्मिती व्हायला मदत होणार आहे.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ३ मार्च २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – ३ मार्च २०२३ रोजीचा अंक

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia3march
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : बोलीभाषा चळवळीचे सूतोवाच <a href="https:/…
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

