रत्नागिरी : ग्राहक चळवळीचे काम सर्व नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहक पंचायत करीत असलेले कार्य उपयुक्त आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. रोहिणी राजपूत यांनी केले.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची स्थापना झाली आहे. रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी याबाबतची माहिती देणारे पत्र सौ. राजपूत यांना सादर केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामीण भागात आणि प्रामुख्याने शाळा- महाविद्यालयांमध्ये ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य याबाबत जागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहक पंचायतीने प्रयत्न करावेत. शिबिरे आयोजित करावीत. त्यासाठी प्रशासन आवश्यक ते सहकार्य करील, असे आश्वासनी सौ. राजपूत यांनी दिले.
पत्रात म्हटले आहे की, भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे भूतपूर्व मंत्रिस्तरीय अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शक तत्त्वांवर कार्यरत असलेली ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ ही संस्था राज्यभर ग्राहक जागृतीचे कार्य करीत आहे. या संस्थेची रत्नागिरी जिल्हा शाखा स्थापन करण्यात आली आहे. मागील अकरा वर्षात महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आणि तालुक्यांमध्ये विस्तारलेली ही चळवळ निरलस, निरपेक्ष आणि समाजशरण वृत्तीने कार्यरत असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून धरली आहे. ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, ग्राहकांच्या अडचणीवर मार्गदर्शन आणि प्रशासनाला सहकार्य करीत शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी संस्थेचे कार्यकर्ते विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्य करीत आहेत. संवाद, समन्वयात ग्राहक कल्याण आणि प्रशासनाचा सहकारी म्हणून संस्था कार्य करीत आहे. त्यामुळे २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन आणि १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन, तसेच ग्राहकांशी संबंधित कार्यक्रमांमध्ये ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेला सहभागी करून घ्यावे.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव, महावितरणचे मुख्य अभियंता श्री. भटकर, तसेच अप्पर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, एसटीचे विभाग नियंत्रक, कोकण रेल्वे इत्यादींना या पत्राच्या प्रती देण्यात आल्या असून ग्राहक पंचायतीचे काम रत्नागिरीत सुरू झाल्याचे त्यांना कळविण्यात आले आहे. सर्वच अधिकाऱ्यांनी ग्राहक पंचायतीला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांना पत्र देताना ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष श्री. सावंत, सचिव आशीष भालेकर, प्रसिद्ध प्रमुख बाळकृष्ण कोनकर, सहसंघटक उमेश आंबर्डेकर, सदस्य दिलीप कांबळे, सहसचिव श्रेया साळवी उपस्थित होते.





कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

