चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तुसंग्रहालयात चारशे वर्षांपूर्वीची एक मूर्ती दाखल झाली आहे. त्यामुळे वस्तुसंग्रहालयात मोलाची भर पडली आहे.

चारशे वर्षांपूर्वीची श्रीलक्ष्मीनारायणची ही मूर्ती ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील सुभाष अनंत काळे यांच्या अनेक पिढ्या पूजेत होती. मनुष्यरूपी गरुडावर आरूढ असलेल्या चतुर्भुज भगवान श्रीविष्णू आणि वामांगी बसलेली लक्ष्मी अशा प्रतिमेला या ‘लक्ष्मीनारायण’ अशी संज्ञा आहे.
काळे यांनी ही मूर्ती वाचनालयाच्या वस्तुसंग्रहालयाला देण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती समजल्यानंतर वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे आणि मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांनी बदलापूरला जाऊन काळे कुटुंबीयाची भेट घेतली. धनंजय चितळे यांनी मूर्तीची पंचोपचार उत्तरपूजा करून ही मूर्ती स्वीकारली. या मूर्तीमुळे संग्रहालयाची समृद्धी वाढली असल्याच्या भावना संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
चारशे वर्षांपूर्वीची गंडकी शिळेतील ही मूर्ती ५५ सेंटीमीटर उंच आणि ३५ सेंटीमीटर रुंद आहे. गरूडावर बसलेल्या विष्णूच्या डाव्या बाजूला लक्ष्मी असून दोन्ही हात जोडलेल्या गरुडाच्या चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव आहेत. गरुडाच्या जोडलेल्या हातात गदा आणि दंडाभोवती सर्पवेढा आहे. श्रीविष्णू आणि लक्ष्मी सालंकृत आहे. भगवान श्रीविष्णू सायुध सिद्ध आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे.
दरम्यान, चिपळूणला आलेल्या महापुरात २०२१ साली लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे वस्तुसंग्रहालयाचे मोठे नुकसान झाले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या सहकार्यामुळे लवकरच संग्रहालय पुन्हा सुरू होणार आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

