आढावा बैठकांचा चुथडा

सर्वसामान्य लोकांनी अमलात आणलेले अशा तऱ्हेचे नियोजन शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर का योजले जात नाही, हा प्रश्न आहे. नाही म्हणायला आढावा बैठका घेतल्या जातात. पण त्या बैठकांमध्ये केवळ नैसर्गिक आपत्ती, संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून बचाव एवढेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवलेले दिसते. वास्तविक त्यापलीकडे जाऊन विचार करायला हवा. यापूर्वी जेव्हा मे महिन्यात पाऊस पडला, त्या वर्षी पावसाळा कधी संपला, पाणीटंचाईची काय स्थिती होती, याचा अभ्यास करून नियोजन व्हायला हवे. ते न करता केवळ आढावा बैठका घेतल्या गेल्या.

आढावा बैठकांची औपचारिकता

नेहमी येणाऱ्या पावसाळ्याच्या आसपास दरवर्षी आढावा बैठकांचा पूर येतो. प्रशासनाने किंवा यंत्रणेने जी कामे जबाबदारीने करणे अपेक्षित असते, तीच कामे करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या जातात. महामार्गांच्या कामांची सद्यस्थिती, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीचा उडालेला बोजवारा, पावसाळ्यात अनेक ठिकाणांची होणार असलेली गंभीर स्थिती अशा किती तरी त्रासदायक बाबी सर्वसामान्यांच्याही लक्षात येतात; मात्र त्याबाबतचा आढावा घेतला जात नाही, हे नागरिकांचे दुर्दैव. त्यामुळे नियमाप्रमाणे आढावा बैठकांची औपचारिकता पार पडेल. अधिकारी सुस्कारा सोडतील. नागरिकांचे हाल सुरूच राहतील. ते सारेसुद्धा पावसाळ्याप्रमाणे नेमेचि होणार आहे.