नेहमीच्या वेळेपेक्षा आधीच दाखल झालेल्या पूर्वमोसमी आणि मोसमी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली आहे. जून-जुलै महिन्यासारखा पाऊस मे महिन्याच्या उत्तरार्धात बरसला आहे. आता तो मोसमी पाऊस असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यामुळे यापुढे नेहमीप्रमाणेच पडत राहणार आहे. आकाशवाणीच्या बातमीनुसार १०७ वर्षांनंतर मे महिन्यात असा पाऊस पडला, तर वृत्तपत्रांमध्ये ६५ वर्षांपासून गेल्या २५ वर्षांमध्ये मे महिन्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी देण्यात आली आहे. याचा अर्थ याच वर्षी पाऊस लवकर आला आहे, असे नाही तर यापूर्वी अनेक वेळा पाऊस मे महिन्यात पडला आहे. हा अनुभव घेऊन आपण मात्र काहीही शिकत नाही. अगदी पावसाळ्याच्या तोंडावर आढावा बैठकांचा उपचार पार पाडला जातो. काही नियोजन केले जाते; पण अचानक येणारा पाऊस या नियोजनाच्या आढावा बैठकांचा चुथडा करून टाकतो. या वर्षीही तेच झाले आहे. पाऊस लवकर आला, म्हणून त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात धनिष्ठानवकारंभ नावाचा एक संकेत पावसापूर्वीच्या नियोजनासाठी पारंपरिक पद्धतीने अमलात आणला जातो. ‘धनिष्ठानवकारंभ’ म्हणजे दिवेलागण होते. या दिवशी दिवे लागतात, म्हणजे या दिवसाच्या आधी सर्व कामे उरकून घ्यावी, असा प्रघात आहे. सर्व कामे म्हणजे प्रामुख्याने पावसाळी हंगामाशी संबंधित कामे लवकर उरकावी, असा संकेत आहे. यावर्षी १९ मे रोजी धनिष्ठानवकारंभ, तर २७ मे रोजी धनिष्ठानवक समाप्ती झाली. वैशाख कृष्ण पक्षातील धनिष्ठा नक्षत्रापासून रोहिणी नक्षत्रापर्यंतच्या नऊ नक्षत्रांना ‘धनिष्ठा नवक’ म्हणतात. हा काळ अशुभ आणि त्रासदायक मानला जातो. यामागे धार्मिक कारणे काय असायची ती असतील. पण त्यामागील व्यावहारिक कारणे लक्षात घ्यायला हवीत. हे दिवस म्हणजे वळवाचा पाऊस पडायचे दिवस. एखाद्या दिवशी जोरदार पाऊस झाला तर सरपण भिजेल, बेगमीच्या धान्याची नासधूस होईल, जनावरांचे गवत खराब होईल, कौलारू घरात गळती सुरू होईल. त्यामुळे धनिष्ठा नक्षत्रापूर्वीच मृग नक्षत्राच्या आगमनाची पूर्वतयारी म्हणून करण्याची ही प्रथा आहे. ही सर्व कामे या वर्षीचा विचार करता १९ मेपूर्वी पूर्ण करण्याचे संकेत होते.
सर्वसामान्य लोकांनी अमलात आणलेले अशा तऱ्हेचे नियोजन शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर का योजले जात नाही, हा प्रश्न आहे. नाही म्हणायला आढावा बैठका घेतल्या जातात. पण त्या बैठकांमध्ये केवळ नैसर्गिक आपत्ती, संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून बचाव एवढेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवलेले दिसते. वास्तविक त्यापलीकडे जाऊन विचार करायला हवा. अवकाळी पाऊस आणि अवेळी आलेल्या मोसमी पावसाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. भाताच्या पेरणीच्या वेळी भाताच्या लावणीसारखा पाऊस पडला आहे. चिखल झाला आहे. याचा पिकावर आणि संभाव्य पाणीसाठ्यावर होणारा परिणाम लक्षात घ्यायला हवा. यापूर्वी जेव्हा मे महिन्यात पाऊस पडला, त्या वर्षी पावसाळा कधी संपला, पाणीटंचाईची काय स्थिती होती, याचा अभ्यास करून नियोजन व्हायला हवे. ते न करता केवळ आढावा बैठका घेतल्या गेल्या. भातशेतीबरोबरच विकासाच्या महामार्गावर चिखल झाला आहे. त्याचा वापर करणाऱ्यांना जीव नकोसा झाला आहे. यावर मे महिन्यात पाऊस येणार हे गृहीत धरून योग्य ती उपाययोजना त्याआधीच करणे जरूरीचे होते. पण बैठकाच मे महिन्यात होत असल्यामुळे नियोजनापेक्षाही आयत्यावेळी आलेल्या समस्यांना तोंड देण्यातच प्रशासनाचा वेळ खर्च होतो. त्याला इलाज एकच आहे, तो म्हणजे धनिष्ठानकारंभाचा संकेत पाळून एप्रिल महिन्यातच योग्य ती काळजी घेणे. पण हे सुचवायचे कोणी आणि अमलात आणायचे कोणी, हा अनुत्तरित प्रश्न आहे.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ३० मे २०२५)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

