सर्वसामान्य लोकांनी अमलात आणलेले अशा तऱ्हेचे नियोजन शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर का योजले जात नाही, हा प्रश्न आहे. नाही म्हणायला आढावा बैठका घेतल्या जातात. पण त्या बैठकांमध्ये केवळ नैसर्गिक आपत्ती, संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून बचाव एवढेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवलेले दिसते. वास्तविक त्यापलीकडे जाऊन विचार करायला हवा. यापूर्वी जेव्हा मे महिन्यात पाऊस पडला, त्या वर्षी पावसाळा कधी संपला, पाणीटंचाईची काय स्थिती होती, याचा अभ्यास करून नियोजन व्हायला हवे. ते न करता केवळ आढावा बैठका घेतल्या गेल्या.