राज्य शासनाने वर्षभरापूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना ही योजना सुरू केली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही योजना राबविली जात आहे. सर्वसामान्य लोकांना आरोग्याबाबतच्या सुविधा मिळाव्यात, त्यांची होणारी गैरसोय टाळावी, त्यांना योग्य उपचार मिळावेत, औषधांचा पुरवठा व्हावा, अशा उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमध्ये ही योजना सुरू झाली. पण सध्या ही योजना सुरू असल्याचे कोणतेच लक्षण दिसत नाही. आरोग्य सेवेच्या बाबतीत रत्नागिरी जिल्हा तसा अजूनही दुर्लक्षितच आहे.
लोकांच्या आरोग्यासाठी म्हणून खूप काही केले जात असल्याचा दावा राज्य सरकार अधूनमधून करत असते. रत्नागिरी जिल्हाही त्याला अपवाद नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना अधिक चांगले उपचार देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक वर्षांच्या मागणीनंतर रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. ते झाल्यानंतर दरवर्षी साठ वैद्यकीय पदवीधर या महाविद्यालयातून बाहेर पडतील आणि ते लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले. या महाविद्यालयाची पहिली तुकडी अजून बाहेर पडलेली नाही. त्याला आणखी दोन वर्षांचा कालावधी लागेल, पण शिक्षणाचा एक भाग म्हणून अद्ययावत सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने काहीही झालेले नाही. आजही अत्यवस्थ रुग्णांना, अपघातग्रस्तांना कोल्हापूर, मिरज किंवा पुणे-मुंबईकडे जावे लागते, अशा तऱ्हेच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात, अधिक उपचारांसाठी रुग्णांना इतरत्र हलविण्यात आल्याचे बातम्यांमध्ये म्हटले जाते. आरोग्य यंत्रणा सुसज्ज असल्याचे सांगितले जात असेल तर अशा रुग्णांना याच ठिकाणी उपचार का मिळत नाहीत, त्यांना का हलवावे लागते, असा प्रश्न पडतो. रुग्णांना इतरत्र हलवावे लागते, याचाच अर्थ जिल्ह्यात आवश्यक ते उपचार करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही, असा होतो. मंडणगडमध्ये एका गर्भवती मातेचा बाळासह मृत्यू झाला. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्यामुळे हा मृत्यू ओढवला. मंडणगड तालुक्यातील एका छोट्याशा गावातील ही महिला सुरुवातीला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली होती. तेथे आवश्यक ती सुविधा, पुरेसे कर्मचारी नसल्याने तेथून तिला मंडणगडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. याच दरम्यान झालेली फरपट तिच्या जीवावर बेतली. आपला दवाखाना योजना अस्तित्वात असती तर त्या महिलेला मंडणगड या तालुक्याच्या ठिकाणी निश्चितच उपचार मिळाले असते, पण ते मिळू शकले नाहीत, राजापूर तालुक्यातील जैतापूर आरोग्य केंद्राच्या परिसरात काही महिन्यांपूर्वी सर्पदंशाने एका महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेला जैतापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते, पण तेथे सर्पदंशावरील लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. हे हकनाक गेलेले बळी आहेत. आरोग्य यंत्रणा कुचकामी असल्यामुळे त्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. सत्तारूढ पक्षाचे वेगवेगळे नेते, पालकमंत्री आणि मंत्री मात्र रुग्णसेवा किती सुधारली आहे, याची आकडेवारी जाहीर करत असतात, वस्तुस्थिती फारच वेगळी असते, याचा अनुभव सर्वसामान्य लोकांना येत असतो. म्हणूनच आपला दवाखाना योजना आहे कुठे असा प्रश्न पडतो. जाहीर होणारी आकडेवारी काहीही सांगत असली तरी डॉक्टरांचा अभाव, सहकारी मदतनिसांचा अभाव, यंत्रणेचा अभाव, यंत्रसामग्रीचा अभाव अशा अभावांनीच जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला ग्रासून टाकले आहे. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. मोठमोठ्या इमारती आणि वेगवेगळे कक्ष थाटामाटात सुरू झाले, म्हणजे सर्व काही होत नाही. ज्यांच्यासाठी ते सारे उभारलेले असते, त्या लोकांना त्याचा उपयोग होतो का, हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडूनही पाहिले जात नाही, हे दुर्दैव आहे.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १६ मे २०२५)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

