लोकनाट्य, लोककलांमधूनच अभिनय क्षेत्राला धडे : ओंकार भोजने

रत्नागिरी : नमन, जाकडी या लोककला केवळ कोकणातच आढळतात.अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच थिएटर, म्युझिक, स्टोरीटेलिंगचे धडे लोकनाट्य किंवा लोककलांमधूनच मिळतात, अशी भावना कोकणचे सुपुत्र प्रसिद्ध अभिनेते ओंकार भोजने यांनी व्यक्त केली.

कोकणातील विविध लोककलांचे सादरीकरण करून त्यांची पारंपरिकता जपणाऱ्या आणि त्यातून विविध सामाजिक उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याच्या पंचशतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त विशेष प्रयोग रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात पार पडला. त्यावेळी श्री. भोजने बोलत होते.

कोकणची लोककला अशीच गुगलवरही नमन, जाकडी या कोकणातील लोककलांची वेगळी ओळख आहे. या लोककला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपले आयुष्य घालवले आहे. या लोककला जपण्यासाठी व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असेही श्री. भोजने म्हणाले.

संगमेश्वरी बोली जपायला हवी, सांगत आज ही बोली जगभर लोकप्रिय होत आहे, त्यामुळे या बोलीचे एक संमेलन घ्यायला हरकत नाही, अशी कल्पना या लोकनाट्याचे मूळ उद्गाते आनंद ब्रोंद्रे यांनी मांडली.

कार्यक्रमाला अभिनेते प्रभाकर मोरे, संजय बोरकर, नेपथ्य-प्रकाशयोजनाकार सुनील देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. समर्थ कृपा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या लोकनाट्याला मुसळधार पावसातही रसिकांची झालेली तुडुंब गर्दी हेच या लोकनाट्याचे यश असल्याची कौतुकाची थाप मान्यवरांनी दिली. यावेळी ‘कोकणचा साज…’ला नेहमी सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचा फुलझाड देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी कोकणातील लोककलावंतांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये कोकणची लोककला जपण्यासाठी आयुष्य वेचलेल्या जिल्ह्यातील चंद्रकांत रामचंद्र घवाळी (पानवल-घवाळीवाडी), जयराम पांडुरंग गावडे (पांगरी, ता. संगमेश्वर), अनिल किसन जाधव (नारदखेरकी, ता. चिपळूण), संतोष गंगाराम मोरे (रानपाट, ता. रत्नागिरी), शांताराम रत्नू होरंबे (पानवल-होरंबेवाडी) यांचा समावेश होता. त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सतीश शेवडे, बाबू म्हाप, सौरभ मुलुष्टे, सतीश दळी, सनातन रेडीज, डॉ. शेखर निमकर, जयू पाखरे, भाग्येश खरे आदी मान्यवर उपस्थित होते. याचे सूत्रसंचालन सौ. दीप्ती कानविंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी यंग 08 ग्रुप आणि ऑफबिट कॅमेरा टीमचे सहकार्य लाभले. या लोकनाट्याच्या या ५२८ व्या प्रयोगाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply