रत्नागिरी : ‘आमचा राजकीय प्रवास कसाकसा बदलतो हे पत्रकार पाहत असतात, त्याप्रमाणेच पत्रकारितेत कसे बदल होत आहेत आणि आपण राजकीय नेता म्हणून त्यांच्याशी कसं जुळवून घेतलं पाहिजे, याकडे आम्ही पाहत असतो. आमच्याकडून चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी पत्रकारितेची असते. बाळशास्त्री जांभेकर, बाबूराव पराडकर, लोकमान्य टिळक आदींच्या रूपाने कोकणात पत्रकारितेचा जन्म झालेला असल्यामुळे मला पत्रकारांबद्दल वेगळी आपुलकी आहे. कोकणाचा कॅलिफोर्निया नव्हे, तर कॅलिफोर्नियापेक्षाही अधिक सरस करू. त्यामुळे कोकण पाहायला परदेशी पर्यटक येतील. कोकणची सरसता, समृद्धता आणि होत असलेला विकास सर्वदूर पोहोचवण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावं,’ असं आवाहन राज्याचे मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केलं.
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालय यांच्यातर्फे रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या कोकण विभागीय पत्रकार कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक आणि प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, संचालक हेमराज बागुल, माहिती उपसंचालक अर्चना शंभरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेला मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधले सुमारे २०० पत्रकार उपस्थित असून, एक जून रोजी कार्यशाळेचा समारोप होणार आहे.
‘पत्रकारांना आपण जे शब्द दिले आहेत, ते पूर्ण करणं ही शासन म्हणून आपली जबाबदारी आहे. पत्रकारांचे प्रश्न विभागनिहाय सोडवले, तर पत्रकारांना शासन आपल्यासोबत आहे, याची प्रचीती येईल,’ असं प्रतिपादन सामंत यांनी ब्रिजेश सिंह यांना उद्देशून केलं. पुढच्या वर्षी राज्य पातळीवरची पत्रकार कार्यशाळा रत्नागिरीत आयोजित करण्याचा मनोदयही सामंत यांनी बोलून दाखवला.
या कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर ‘एआय आणि पत्रकारिता’ या विषयावर ब्रिजेश सिंह यांचं व्याख्यान झालं. ‘एआयचा वापर १९६०पासून होत आहे; मात्र जनरेटिव्ह एआयचा वापर आता होऊ लागला आहे. मानवाने लिहून तयार केलेल्या साहित्यापेक्षा अधिक साहित्य आता एआयद्वारे तयार होणार आहे. शोधपत्रकारिता, तसंच माहितीचं वेगाने विश्लेषण करण्यासाठी एआय हे अत्यंत उत्तम साधन आहे; मात्र त्याचा वापर जबाबदारीने करणं गरजेचं असून, त्यासाठी नियम तयार करणं आवश्यक आहे,’ असं मत ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केलं. माध्यम क्षेत्रामध्ये होत असलेल्या बदलांच्या अनुषंगाने हेमराज बागुल यांचं व्याख्यान झालं. त्यानंतर पत्रकारांना रत्नागिरीत नव्याने उभारण्यात आलेल्या पर्यटनस्थळांवर सैर घडवण्यात आली.
डॉ. उदय सामंत यांचे मनोगत
कोकण निसर्गसौंदर्याने आणि विविधतेने नटलेला आहॆ. कोकणातील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याने, मोठ्या प्रमाणावर बदल दिसत आहे. कोकण कॅलिफोर्नियापेक्षाही अधिक सरस करू, जेणेकरून कोकण पाहायला परदेशी पर्यटक येतील. कोकणची सरसता आणि समृद्धता आणि होत असलेला विकास सर्वदूर पोहोचविण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे.
महाराष्ट्र राज्यात पत्रकारिता ही कोकणाने जन्माला घातली आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक अशा पत्रकारांचा वारसा असलेल्या क्षेत्रात ही कार्यशाळा होत आहे.
आधुनिकीकरण आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. माझ्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत माझे काम जनतेपर्यंत नेण्याचे महत्त्वाचे काम पत्रकारांनी केले आहे. हे माझ्या परोक्ष पत्रकारांनी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आहेत. त्यामुळे मला पत्रकारांबद्दल आत्मीयता आहे. कोकणचा विकास संपूर्ण महाराष्ट्राने पाहावा, त्याची प्रसिद्धी करावी. या माध्यमातून परदेशातील पर्यटकांनी मोठ्या संख्येने कोकणात पर्यटनासाठी यावे, यासाठी अशी कार्यशाळा राज्यभरातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात येईल.
समाजमाध्यमांमुळे मोठमोठ्या घडामोडी कळतात. बातम्यांचा प्रभाव इतका असतो की, बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण होते. हे सर्व होत असताना राज्यकर्त्यांकडून चांगले काम करून घेण्याची जबाबदारी पत्रकारांची असते. कोकणातील पत्रकारितेमध्ये वेगळी क्षमता आहे. कोकणातील पत्रकारांना बाळशस्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांचा वारसा आहे. हिंदी पत्रकारितेचे जनक बाबूराव पराडकर हेदेखील कोकणातलेच. मी स्वत:ला सुदैवी मानतो कारण माझा जन्म या भूमीत झाला आहे आणि मी सध्या या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पत्रकारितेचे जन्मस्थान असलेले कोकण आम्ही कसे विकसित केले, कसे जपून ठेवले आहे, हे महाराष्ट्रातील सर्व पत्रकरांनी पाहावे यासाठी पुढील कार्यशाळा ही संपूर्ण राज्यातील पत्रकारांसाठी आयोजित करण्याचा मानस आहे.
आपत्कालीन परिस्थितीत पत्रकार काम करतात. अशा पत्रकारांच्या मागे राज्यकर्त्यांचा राजाश्रय शंभर टक्के उभा करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज ज्याप्रमाणे ही कार्यशाळा घेतली आहे, त्याप्रमाणे पत्रकारांसाठी आवश्यक सेवासुविधांची निर्मिती करण्यात येईल महाराष्ट्रात पत्रकारांचा फक्त सन्मान नाही, तर पत्रकारांसाठी आवश्यक सेवासुविधांची निर्मितीही केली जाते, हे चित्र देशात निर्माण झाले पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असं पालकमंत्री म्हणाले.
पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यशाळेला सुरुवात झाली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती, प्रशासन) हेमराज बागुल, कोकण विभागाच्या माहिती उपसंचालक अर्चना शंभरकर, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, वरिष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्य श्रीमती जान्हवी पाटील, कोकण अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रणव पोळेकर, मराठी पत्रकार राज्य परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत वणजू, जिल्हाध्यक्ष अनंत तापेकर, मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष मेहरून नाकाडे, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष मोहन जाधव, अलिबाग प्रेस क्लब असोशिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, ठाणे जिल्हा शहर दैनिक पत्रकार संघाचे सचिव नीलेश पानमंद, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहार संघाचे कोषाध्यक्ष विनोद यादव, टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशन (महाराष्ट्र) चे अध्यक्ष उदय जाधव, रायगड जिल्हा प्रेस फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समीर मालोदे, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी दिलीप शिंदे, दीपक दळवी, डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष मुश्ताक खान यांच्यासह ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक हेमराज बागुल, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
उपसंचालक श्रीमती अर्चना शंभरकर यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी सूत्रसंचालन केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

