कोकणात गटशेती होण्याची गरज : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरीत प्रतिपादन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (एक जून २०२५) रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते. ते तीन कार्यक्रमांना उपस्थित राहिले. त्यांचा हा संक्षिप्त वृत्तांत…

रत्नागिरी : ‘कोकणात भरपूर क्षमता आहे. कोकणातलं शेतीक्षेत्र छोटं आहे. म्हणूनच इथल्या शेतकऱ्यांना गटशेतीकडे वळवलं पाहिजे. त्यातून शेतीमालाचा ब्रँड तयार होतो आणि विपणन सोपं होतं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. म्हणूनच शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण काम केलं पाहिजे. शेतकरी अन्नदाता आहे. त्याला कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे. तरच शेतकरी समृद्ध होईल. इथे उदरनिर्वाह होत नाही म्हणून इथला तरुण बाहेर जातो. त्याला रोजगार इथेच मिळाला पाहिजे, असं नियोजन केलं पाहिजे,’ असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीत केलं. तीन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ८० ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी सीएनजी घंटागाड्यांचं वितरण करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा नियोजन निधीमधून शेतकऱ्यांना भात आणि नाचणीच्या बियाण्याचं मोफत वाटपही या कार्यक्रमात करण्यात आलं. या वेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

‘सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. जी वचनं दिली आहेत, त्यात आमचं सरकार कुठेही मागे राहणार नाही. आम्ही ज्यासाठी निधी दिला, ती विकासकामं राबवली. महाराष्ट्र देशात अग्रेसर असून, देशाच्या ४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. स्वच्छतेमध्ये महाराष्ट्राला पहिला क्रमांक मिळाला आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाची लोकचळवळ झाली आहे. ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला धुण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं. कोकणाचा अनुशेष भरून काढण्याचं काम आमचं सरकार करील. पावसाचं पाणी अडवलं पाहिजे. मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड रस्ता कोकणासाठी वरदान ठरेल,’ असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

मोफत रुग्णालयाचं उद्घाटन
नीलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने रत्नागिरीत उभारलेल्या भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचं उद्घाटनही एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या संस्थेने उभारलेलं हे राज्यातलं तिसरं आणि रत्नागिरीतलं पहिलं रुग्णालय आहे. ‘सरकार आरोग्य क्षेत्रात काम करत आहेच; पण अशा संस्थेने मोफत रुग्णालय उभारणं ही मोठी गोष्ट असून, संस्थेला जी काही मदत लागेल त्यासाठी सरकार पाठीशी उभं आहे,’ असं उपमुख्यमंत्री शिंदे या वेळी म्हणाले. ‘वडिलांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मोफत रुग्णालय उभारणारा मुलगा विरळाच,’ अशा गौरवोद्गारांनी शिंदे यांनी नीलेश सांबरे यांचं कौतुक केलं.

पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचं आश्वासन
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचं कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या पत्रकार कार्यशाळेलाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. पत्रकार सन्मान निधीत वाढ, पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरं, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी असे विविध प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून तातडीने मार्गी लावू, असं आश्वासन शिंदे यांनी या वेळी दिलं.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply