शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काही शाळांना भेट दिली आणि शालेय शिक्षण विभागाचीही शाळा घेतली. पालकमंत्र्यांनीच शालेय शिक्षण विभागाचे कान टोचले हे खूपच चांगले झाले. त्यातून काही चांगले घडेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तरीही पालकमंत्र्यांनीही जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांच्या मागण्या आणि आंदोलने हा विषय पूर्णपणे वेगळा आहे; पण भावी नागरिकांचा पाया ज्या शाळांमध्ये तयार होतो आणि ज्या शिक्षकांकडून तो तयार करून घेतला जातो, त्या शिक्षकांकडून मुलांच्या मनाची पुरेशी मशागत केली जाते का आणि ती केली जात नसेल तर त्याला नेमकी कोणती कारणे आहेत, याचाही शोध घ्यायला हवा.