वड्याचे तेल वांग्यावर

मराठीत अनेक म्हणी आणि वाक्प्रचार आहेत. पहिलीपासूनच तीन भाषा शिकविण्याबाबतची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतरच्या काळात या म्हणी आणि वाक्प्रचार कालबाह्य होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. नव्या शैक्षणिक धोरणाबरोबरच म्हणी आणि वाक्प्रचार तसेच जुन्या कविता असा मराठी भाषेला लाभलेला समृद्ध ठेवा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांकडे आहे, त्यांच्याकडूनही त्याबाबतीत घोर निराशा होत आहे; मात्र याच शिक्षकांच्या संघटनेने वड्याचे तेल वांग्यावर या एका जुन्या म्हणीचा प्रत्यय आणून देणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी येथे एक अपघात झाला. गॅसवाहू टँकरची खासगी मिनीबसशी टक्कर झाली. या बसमधून चिपळूणहून रत्नागिरीकडे प्रशिक्षणासाठी निघालेले शिक्षक होते. अपघातात ते जखमी झाले. अपघातात कोणाचाही बळी गेला नाही हे त्यातल्या त्यात सुदैव. हे शिक्षक प्रशिक्षणासाठी रत्नागिरीकडे निघाले होते. अशा तऱ्हेच्या प्रशिक्षणाची मुळापासून आणि मनापासून आवड त्या शिक्षकांना नव्हतीच, असे जाणवण्यासारखे निवेदन त्यांनी प्रसिद्धीला दिले आहे. अपघातात २६ शिक्षक जखमी झाले. अपघातात जखमी होणे ही दुर्दैवी घटना आहे. त्यात गंभीर जखमी झालेल्यांना तर सहानुभूतीची आणि वैद्यकीय तसेच प्रत्यक्ष मदतीची खूपच गरज आहे. त्यामुळे हा किंवा कोणताच अपघात कधीही घडूच नये; पण शेवटी अपघात हा अपघात असतो. तो अचानक घडतो म्हणूनच त्याला अपघात म्हटले जाते. पण या अपघाताला शिक्षकांच्या संघटनांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे, ही खूपच हास्यास्पद बाब आहे. मुळात सुट्टीच्या काळात प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे नाराज झालेली शिक्षक मंडळी प्रशिक्षणाच्या कडक नियमांमुळे सैरभैर झाली आहे. त्यात हे अपघाताचे निमित्त घडले. आपल्या नाराजीचे खापर त्यांनी परस्पर काहीही संबंध नसताना प्रशासनावर फोडले आहे. अपघातात जखमी झालेल्यांबद्दल सहानुभूती नक्कीच वाटते; पण त्याचे खापर प्रशासनावर फोडणे अत्यंत अयोग्यच आहे.
कोणे एके काळी शिक्षकांना गावागावांमध्ये मान होता. किंबहुना ही शिक्षक मंडळी म्हणजे त्या त्या गावांची शान होती. गावाच्या साक्षरतेचे प्रतीक होते. कौटुंबिक समस्यांपासून गावाच्या विकासकामांबाबत शिक्षकांचा शब्द अंतिम मानला जात असे. लोकमानसावर शिक्षकांचा एवढा प्रचंड पगडा होता. दुर्दैवाने आता ती स्थिती राहिलेली नाही. शिक्षक अभ्यासक्रमाप्रमाणे शिकविण्याचे काम एक काम म्हणून करतात. त्यामागील व्रताची भावना कधीच नष्ट झाली आहे. शिक्षक मुलांना वाचायला किंवा चांगल्या छंदांना प्रवृत्त करताना दिसत नाहीत. कारण मुळातच शिक्षक स्वतःच वाचत नाहीत. अनेक शिक्षकांनी करोनानंतरच्या काळात घरी येणारे रोजचे वर्तमानपत्रही बंद करून टाकले आहे. त्यामुळे शिक्षकांनी आपण होऊनच एकेकाळची समाजातील आपली प्रतिमा डागाळून टाकली आहे. तरीही शिक्षकांनी पुढची पिढी चांगली घडवावी यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जातो. वेळोवेळी आयोजित केलेले प्रशिक्षण हा त्याचाच एक भाग असतो. अशा एका प्रशिक्षणाकरिता निघालेल्या शिक्षकांच्या वाहनाला अपघात झाला. मात्र या प्रशिक्षणाकरिता नेमून दिलेले नियम शिक्षकांना आक्षेपार्ह वाटतात. प्रत्येक सत्रानंतर हजेरी घेणे, पाच मिनिटे विलंब झाला तरी गैरहजेरी लावणे, प्रत्येक सत्रानंतर चाचणी घेणे शिक्षक संघटनांना आक्षेपार्ह वाटते. प्रशिक्षणाला वेळेवर पोहोचण्यासाठी खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. मात्र ही पळवाट आहे. प्रशिक्षणाचे नियम कडक करायला शिक्षकांच्या वर्तनानेच प्रशासनाला भाग पाडले असले पाहिजे, हेही संघटनांनी लक्षात घ्यायला हवे. प्रशिक्षणाबद्दलची नाराजी व्यक्त करताना वड्याचे तेल वांग्यावर काढून काय उपयोग?

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १३ जून २०२५)
    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply