अहमदाबाद : अहमदाबादमध्ये आज दुपारी अपघातग्रस्त झालेल्या विमानातील ‘११ ए’ या सीटवर बसलेला प्रवासी आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे. अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे. या अपघाताची भीषणता पाहता त्यातील सर्व २४२ जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता; मात्र एक प्रवासी जिवंत असल्याचे आढळले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रमेश विश्वकुमार असे त्या प्रवाशाचे नाव असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृतांची नेमकी संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही; मात्र सर्व प्रवासी मृत झाले असावेत, असा अंदाज आहे. तसेच, हे विमान निवासी भागात कोसळल्याने मृतांची संख्या वाढू शकते, असेही यंत्रणेने म्हटले आहे. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेदेखील प्रवास करत होते. दोन पायलट्स, १० केबिन क्रू यांच्यासह १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनडियन नागरिक असे एकूण २४२ जण या विमानात होते. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गॅटविक (लंडन) इथे जाण्यासाठी दुपारी एक वाजून ३९ मिनिटांनी आकाशात झेपावलेले एअर इंडिया फ्लाइट १७१ हे विमान बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर प्रकारचे होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच ते खाली आले आणि कोसळले. अहमदाबादचे बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टर्सच्या निवासी क्वार्टर्सवर हे विमान कोसळले. लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघालेले असल्याने या विमानात मोठा इंधनसाठा होता. तसेच, नागरी वस्तीत विमान कोसळल्याने अपघाताची भीषणता वाढली.
मृतांची ओळख पटवण्यासाठी विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी डीएनए तपासणीसाठी आपले नमुने देण्याचे आवाहन यंत्रणेने केले आहे. अहमदाबाद विमानतळावर मदत आणि माहिती कक्ष उभारण्यात आला आहे.
एअर इंडिया कंपनी ज्या टाटा ग्रुपची आहे, त्या टाटा ग्रुपने या अपघातातील प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील, तसेच जगभरातील अनेक देशांतील नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्राकडूनही नागरिकांसाठी मदत आणि माहिती सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी 022-22027990, 022-22794229 आणि 9321587143, तसेच 1070 हे आपत्कालीन मदत क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

